स्मृतीपाखरे 10 : वारसा तांब्या-पितळाचा

माझ्या आई-वडिलांना वेगळी चूल मांडावी लागली तेव्हा आमच्या आजोबांनी एक मोठी तांब्याची डेग दिली होती. हेतू हा की ती मोडून आम्ही स्वयंपाकासाठी लागणारी भांडी खरेदी करायची. पण खरं सांगू का तसे करण्याचा अविचार आम्ही कोणीच केला नाही. ती प्रचंड मोठी डेग तेव्हा आम्हाला पाणी भरण्यासाठी उपयोगी पडली आणि खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी ठरली. पाण्याने भरली असली तरी तिला महिन्या - दोन महिन्यातून बाहेरून चिंच मीठ लावून घासून-पुसून लख्ख ठेवत असू. हे काम एकाच बैठकीत करणे अशक्य असे. या डेगबरोबर चुलीवर पाणी तापविण्यासाठी तांब्याचा सुबक हंडा होता, त्याला उचलण्यासाठी दोन कान (कड्या) देखील होत्या. पिण्याचं पाणी भरण्यासाठी तांब्याचा गुंडा होता आणि आंघोळीसाठी सुंदर घाटाचे गंगाळ. प्रमाणित भाषेत 'घंगाळ' म्हणत असले तरी मला ' गंगाळ ' शब्द जास्त उचित वाटतो. कारण त्यामुळे प्रत्यक्ष गंगेत न्हायल्याइतके स्नान पवित्र होई. आईची रामावर अतोनात श्रद्धा असल्यामुळे वाटणीत आई-दादांच्या हिश्श्याला घराऐवजी आमच्या पणजीने बांधलेले राममंदिर आले. त्यावेळी नाममात्र शुल्क घेऊन साखरपुडा, विवाह, बारसे अशा मंगल प्र...