स्मृतीपाखरे १२ : आमचं गोकुळ

माझा जन्म शेतकरी कुटुंबातला. शेती म्हटलं म्हणजे गाई-म्हशी, बैल आलेच. त्यामुळे लहानपणी काळ्या आईची प्रीति व गोधनाच्या वात्सल्याची अनुभूती लाभली. या वात्सल्यातून घरात गोरसगंगा वाहत होती. दूध, दही, ताक, लोणी व तूप हे पुर्णान्न मनमुराद खाल्ल्यामुळे सुदृढ शैशव जपलं गेलं. घरातल्या लहान मोठ्यांची गरज भागवून उरलेल्या गोरसाची विक्री होई. आमची आजी 'नानीमाय' ह्या दुग्धव्यवसायात स्वत:हून लक्ष घालत असे. दुपारच्या वेळी नातवांना पुढे घालून गोठ्यावर घेऊन जाई. त्यामुळे कळत नकळत त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण मिळत होते. पुढे आमच्या काकांनी या व्यवसायाला विस्तृत स्वरूप दिले. काठेवाडहून गाई-म्हशी खरेदी करून त्यांची जोपासना करायला सुरुवात केली. त्यामुळे दुधाचे प्रमाण वाढले. अशाप्रकारे 'श्रीकृष्ण दुग्धालय'च्या रूपाने आमच्या घरात गोकुळ वसले. या व्यवसायामुळे आमच्या घरी काठेवाडी लोकांचा राबता वाढला. मनीभाई, जेठाभाई, कांदाभाई, दानाभाई, नाथाभाई अशा काठेवाडी माणसांचा प्रेमळ सहवास लाभला. काठेवाडी भाषेचा लहेजा कर्णमधुर असे. आम्हा बहिणींना ते 'बेन' म्हणून हाक मारीत. (आजही वडिल खूप ...