स्मृती पाखरे 14 : ग्रहणाच्या छायेत
पृथ्वी, चंद्र, सूर्य सातत्याने ठराविक कक्षेत भ्रमण करत असतात. भ्रमण करत असताना कधीतरी ते एकमेकांच्या समोर येऊन उभे ठाकतात म्हणजेच एका सरळ रेषेत येतात. पृथ्वीच्या समोर चंद्र आला तर सूर्य झाकला जातो, आणि पृथ्वीच्या समोर सूर्य आला तर चंद्र दिसेनासा होतो, यालाच शास्त्रीय भाषेत ग्रहण असे म्हणतात. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती ग्रहण म्हणजे खरं तर अभ्यासाचा विषय. सृष्टीतील एक सुंदर घटना, पाहण्याजोगी. परंतु का कोण जाणे लहानपणीच ग्रहण पाहू नये हा विचार मनावर बिंबवला गेला. ग्रहणाचे वेध लागताच त्या काळामध्ये अन्न-पाणी ग्रहण करायचं नाही, हा रिवाज लहानपणी आम्ही पूर्णपणे पाळत होतो. चंद्रग्रहण झोपेत जायचंय, परंतु सूर्यग्रहणासमयीच्या काही गोष्टी आठवतात. ग्रहणकाळात दारे खिडक्या बंद करून घरातच बसायचो. ग्रहण सुटल्याबरोबर सर्व जण स्नान करत असू. एवढेच नव्हे तर घरातल्या देवांनाही स्नान घातले जाई. आमच्या मंदिरातील रामालाही अभिषेक केला जाई. त्यानंतर आम्ही भावंडं ओट्यावर एका मोठ्या तगारीत बाजरी घेऊन बसत असू. तेव्हा "दे दान सुटे गिरान" अशी आरोळी देत गल्लीतून भीक मागणाऱ्यांची वर्दळ सुरू ह...