पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाहुणे_रावळे : भाग 6

इमेज
आज चार आठवड्याच्या कैदेतून पायाची सुटका होण्याचा दिवस. सुटका करून घ्यायची तर कारागृहाच्या भिंतीवर करवत फिरवणारा कोणीतरी निष्णात हवाच ना. त्यासाठी हॉस्पिटल गाठले. बर्‍याच प्रयत्नांती त्यात यश आले व बिचाऱ्या पायाची सुटका झाली. घरी यायला जरा उशीरच झाला. जेवण करून जरा कुठे सोफ्यावर टेकले तोपर्यंत रेणुकाने (माझी मदतनीस) आवाज दिला, "ताई, ताई, इकडे या ना. नवीन पक्षी दिसतो." भांडे घासता घासता नवीन पाहुण्यावर तिची नजर गेली होती. माझ्या सानिध्यात राहून तिचेही  पक्षी ज्ञान चांगलेच विकसित झाले आहे,  त्यामुळे मी तिच्यावर विश्वास ठेवून नुकत्याच स्वतंत्र झालेल्या पायाला गोंजारून किचनच्या खिडकीकडे कूच केली. जाता जाता टेबलावरचा कॅमेरा गळ्यात घालायला विसरले नाही. खिडकीतून डोकावून पाहिले तर समोरच्या टेरेसवर निळा कस्तूर (Blue rock thrush) मिश्कील हसत होता. कालच तर याची आठवण काढली होती. ARAI च्या टेकडीवर लोकांना दिसतो आहे म्हटल्यावर आपल्याकडे हा नक्कीच येईल असे वाटले होते. दरवर्षी हिवाळ्यात येणारा हा पाहुणा यावेळी जरा लवकर आला हे पाहून आश्चर्यचकित झाले. माझी चौकशी करायला तर आला नसेल न...