पाहुणे -रावळे (भाग ७) : ग्रेट भेट
तो आला... तो आला. तो आल्याची वार्ता एका व्हाट्सअप ग्रुपवर कळली आणि सगळीकडे आनंदाला उधाण आलं. आम्हाला त्याला भेटायची फार उत्सुकता होती. मागच्या वर्षी भेटीचा योग आला नव्हता, म्हणून यावर्षी भेटायचेच हे मनाशी पक्के ठरवले होते. 2022 मध्ये तो 31 मे ला आला होता. 2023 मध्ये 3 जूनला आला होता आणि आत्ता यावर्षी 30 मे लाच आला. त्याच्या या नियमित व नियोजित भेटीचं आम्हाला नेहमीच अप्रूप वाटते. बरं हा पाहुणा दुरून येणार म्हणून त्याच्या भेटीचे जरा विशेष कौतुक. थेट नैऋत्य भारतातून मजल दर मजल करीत हे महाशय ताम्हिणीला सुखरूप पोहोचले होते. श्रीलंका व बांगलादेशातही यांचा अधिवास असतो. एवढ्या लांबचा प्रवास करून यायचं म्हणजे काय चेष्टा आहे का! एवढी मोठी भरारी घ्यायची म्हणजे तुमच्या पंखांत बळ असायला हवे. म्हणूनच त्याच्याबद्दल जरा जास्तच आदर वाटतो. बरं याची भेट घ्यायची म्हणजे तारीख व वेळ निश्चित करावी लागते. त्यासाठी त्याचे यजमान म्हणजे 'रामदास येनपुरें'शी संपर्क साधला. हे यजमान म्हणजे धडाडीचे कार्यकर्ते बरं का! आलेल्या पाहुण्यांची सरबराई करण्यात त्यांचा हात कोणी धरणार नाही. आमच्या ह्यांना शनिवार, रवि...