पोस्ट्स

पाहुणे -रावळे (भाग ७) : ग्रेट भेट

इमेज
तो आला... तो आला. तो आल्याची वार्ता एका व्हाट्सअप ग्रुपवर कळली आणि सगळीकडे आनंदाला उधाण आलं. आम्हाला त्याला भेटायची फार उत्सुकता होती. मागच्या वर्षी भेटीचा योग आला नव्हता, म्हणून यावर्षी भेटायचेच हे मनाशी पक्के ठरवले होते. 2022 मध्ये तो 31 मे ला आला होता. 2023 मध्ये 3 जूनला आला होता आणि आत्ता यावर्षी 30 मे लाच आला. त्याच्या या नियमित व नियोजित भेटीचं आम्हाला नेहमीच अप्रूप वाटते. बरं हा पाहुणा दुरून येणार म्हणून त्याच्या भेटीचे जरा विशेष कौतुक. थेट नैऋत्य भारतातून मजल दर मजल करीत हे महाशय ताम्हिणीला सुखरूप पोहोचले होते. श्रीलंका व बांगलादेशातही यांचा अधिवास असतो. एवढ्या लांबचा प्रवास करून यायचं म्हणजे काय चेष्टा आहे का! एवढी मोठी भरारी घ्यायची म्हणजे तुमच्या पंखांत बळ असायला हवे. म्हणूनच त्याच्याबद्दल जरा जास्तच आदर वाटतो. बरं याची भेट घ्यायची म्हणजे तारीख व वेळ निश्चित करावी लागते. त्यासाठी त्याचे यजमान म्हणजे 'रामदास येनपुरें'शी संपर्क साधला. हे यजमान म्हणजे धडाडीचे कार्यकर्ते बरं का! आलेल्या पाहुण्यांची सरबराई करण्यात त्यांचा हात कोणी धरणार नाही. आमच्या ह्यांना शनिवार, रवि...

पाहुणे_रावळे : भाग 6

इमेज
आज चार आठवड्याच्या कैदेतून पायाची सुटका होण्याचा दिवस. सुटका करून घ्यायची तर कारागृहाच्या भिंतीवर करवत फिरवणारा कोणीतरी निष्णात हवाच ना. त्यासाठी हॉस्पिटल गाठले. बर्‍याच प्रयत्नांती त्यात यश आले व बिचाऱ्या पायाची सुटका झाली. घरी यायला जरा उशीरच झाला. जेवण करून जरा कुठे सोफ्यावर टेकले तोपर्यंत रेणुकाने (माझी मदतनीस) आवाज दिला, "ताई, ताई, इकडे या ना. नवीन पक्षी दिसतो." भांडे घासता घासता नवीन पाहुण्यावर तिची नजर गेली होती. माझ्या सानिध्यात राहून तिचेही  पक्षी ज्ञान चांगलेच विकसित झाले आहे,  त्यामुळे मी तिच्यावर विश्वास ठेवून नुकत्याच स्वतंत्र झालेल्या पायाला गोंजारून किचनच्या खिडकीकडे कूच केली. जाता जाता टेबलावरचा कॅमेरा गळ्यात घालायला विसरले नाही. खिडकीतून डोकावून पाहिले तर समोरच्या टेरेसवर निळा कस्तूर (Blue rock thrush) मिश्कील हसत होता. कालच तर याची आठवण काढली होती. ARAI च्या टेकडीवर लोकांना दिसतो आहे म्हटल्यावर आपल्याकडे हा नक्कीच येईल असे वाटले होते. दरवर्षी हिवाळ्यात येणारा हा पाहुणा यावेळी जरा लवकर आला हे पाहून आश्चर्यचकित झाले. माझी चौकशी करायला तर आला नसेल न...

पाहुणे - रावळे (भाग 5)

इमेज
  फेसबुकवर मैत्रिणींनी काढलेले पक्ष्यांचे फोटो बघून मी दोन इच्छा व्यक्त केल्या होत्या. एक म्हणजे मुनियाचं बाळ पाहायला मिळावं आणि दुसरी म्हणजे वर्षातून एकदा येणाऱ्या 'गोरली'  (Rose finch) चं लवकर दर्शन व्हावे.  म्हणतात ना, 'भगवान देता है तो छप्पर फाडके देता है'। तसंच काहीसं आज माझ्या बाबतीत घडले. आज रविवार असल्यामुळे सकाळी जरा उशिराच उठले. काही वेळेस जरा समंजस माणसाप्रमाणे वागायला हवे. माझ्या खुडबुडीने नवऱ्याची झोपमोड होऊ नये म्हणून निमूट अंथरूणावर लोळत पडले होते. साधारण आठ वाजता आयता चहाचा कप हातात आला. एक मात्र खरे, पाय जायबंदी झाल्यामुळे नवऱ्याकडून सेवा करण्याची आयती संधी चालून आली.  हं तर मी काय म्हणत होते?  चहा पीत असताना नेहमीच उंबराच्या झाडावर माझी नजर टेहळणी करत असते. पूर्व दिशेला असलेल्या उंबराच्या झाडावर येणारा पक्षी पटकन लक्षात येत नाही. मगर हमारी पारखी नजर का कमाल देखो। साधारण बुलबुलाच्या आकाराएवढा तो पक्षी डोक्याला गुलाल फासून आला होता. 'अरेच्चा, हा तर  Rose finch!' असे ओरडत मी ओट्याच्या दिशेने धावत सुटले अन् धावता धावता  म्हणजे...

पाहुणे- रावळे (भाग 4) : लग्नमंडप

इमेज
दोन तीन दिवसापासून 'वल्गुली'ची (Cinerous Tit) दोन बाळं इकडून तिकडून हिंडताना दिसत होती. 'अरे बाळांनो, जरा थांबा रे' सांगूनही ऐकत नव्हती. परंतु आज संध्याकाळी पाचच्या सुमारास मी चहापान आटोपून खिडकीतून बाहेर डोकावले आणि दुसऱ्याच मिनिटाला ही दोन्ही बाळं शेजारच्या सुकलेल्या सुबाभुळच्या झाडावर धावत आली. खोडाची साल उकरून त्याखाली असलेले सूक्ष्म जीव वेचून फस्त केले. त्यानंतर वाळक्या शेंगांच्या झुंबराशी मस्ती करून झाडाच्या बेचक्यात चुळबुळ करत उभे राहिले. काळ्या-पांढऱ्या रंगातली ही सुरेख जोडी बघून त्यांची दृष्ट काढाविशी वाटली. इतक्यात 'शिंजीरा'च्या (Purple Sunbird ) जोडीने लक्ष वेधून घेतले. एकमेकांच्या पाठोपाठ धावत वाळलेल्या फांदीवर दोघं आली व संध्याकाळची उन्हं अंगावर घेत अणकुचीदार चोचीने आपली पिसं स्वच्छ करत बसली. त्यावेळी एक बारीक छोटासा पीस त्याच्या चोचीत अडकलेला दिसला. Breeding plumage मधला हा 'शिंजीर नर' जणू गळ्यात काळा टाय व पिवळ्या सदऱ्यावर मातकट, चमकील्या जांभळट   पट्ट्याचा कोट घालून इथे तिथे नवरदेवासारखा मिरवत होता. त्याची हळदुल्या रंगाची मादी...

पाहुणे - रावळे (भाग 3):पितृपक्षातील जेवणावळ

इमेज
कधीपासून परागंदा झालेल्या तीन 'गोसावीं'नी ('सातभाई') आज सकाळी सकाळी दर्शन दिले. हे मोठमोठ्याने गजर करत येतात म्हणून त्यांचे नाव 'गोसावी' पडले असणार. मला तर त्यांचा आवाज अगदी कर्णकर्कश वाटतो.  मोठमोठ्याने भांडण करणारे जणू ते भाऊबंदच. अगोदर या परिसरात 7/8 सातभाई रोज कलकल करत जमिनीवर, झाडावर व टेरेसवर बसायचे. परंतु आता का कोण जाणे, कधीतरी कोलाहल करत अवतीर्ण होतात व लगेच पसारही होतात.  सध्या समोरच्या सोसायटीत गवत काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गवत काढलेल्या ठिकाणी किडे-अळ्या शोधण्यासाठी 'चिमण्या' फिरत होत्या. गवत उपटल्यामुळे झालेल्या भुसभुशीत जमिनीत त्या बसतात. त्यांच्या बसण्यामुळे ठिकठिकाणी खळगे तयार झालेले दिसत आहेत. कोरड्या मातीत कित्येकदा मातीस्नानही त्या करत असतात. परवा पाऊस पडून गेल्यानंतर साचलेल्या डबक्यात तीन चार 'चिमण्या' डुंबून स्नानाचा आनंद घेताना पाहिल्या. आजूबाजूला दुर्मिळ झालेल्या 'चिमण्यां'ची संख्या आमच्या परिसरात बऱ्यापैकी आहे. आजकाल सोसायटीत सिमेंटचे ब्लॉक, टाईल्स बसवून मातीचे नामोनिशाणच मिटवून टाकतात. त्यामुळे बिचारे पक्षी...

पाहुणे - रावळे (भाग 2)

इमेज
नेहमीच शीळ घालून वर्दी देणारा पडदाशीन 'सुभग' चक्क आज पुढ्यात उभा राहून लाजत, मुरडत शीळ घालत होता. त्याचा हळदीने माखलेला देह, त्यास तीट लागू नये म्हणून ओढलेला काळा शेला. अहाहा! काय ते साजिरे रूप! ते पाहून खिडकीत बसल्याचं सार्थक झालं. नेहमीच गवताचं हिरवंगार पातं चोचीत घेऊन फिरणारी 'खवलेधारी  मुनिया'ची जोडी आज चक्क वाळक्या वेलीची लांबलचक काडी चोचीत धरून चाफ्याच्या, त्यानंतर चिंचेच्या झाडात शिरताना पाहिली. त्यातला एक 'मुनिया' समोरच्या वाळक्या फांदीवर येऊन विसावला. ओल्याबरोबर सुक्या गवतपात्यांचा घरट्यासाठी तो वापर करत असावा, हे लक्षात आले. त्याचं घरटं चेंडूसारखं असतं असं म्हणतात. ते पाहण्याची इच्छा मात्र मनात तेवत आहे. सतत उंच आकाशात संथ गतीने फिरणारी 'घारुआज्जी' चक्क समोरच्या निलगिरीच्या झाडावर निवांत पिसे फुलवतांना दिसली. त्यामुळे ती कधी अंगावर घोंगडी पांघरलेली तर कधी झालरीचा झगा घालून बसल्यागत भासत होती. तिचे ते गोंडस रुपडे  बघून मन आनंदीत झाले, परंतु तिचे खोबणीतील भेदक डोळे नाही म्हटले तरी थोडे भीतिदायकच वाटत होते. लक्षवेधक कलरव करत 'राखी धनेश'चा ...

पाहुणे-रावळे (भाग 1)

इमेज
काल हॉलच्या खिडकीत बसलेली असताना पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे कोणकोण भेटायला आले ते मी तुम्हाला सांगितलंच. आज बेडरुमच्या खिडकीत बसायचे ठरवले. बराच वेळ बसली, परंतु कोणाचाच पत्ता नव्हता. वाट बघून कंटाळा आला. 'आता पुरे ही प्रतीक्षा' म्हणून उठणार तेवढ्यात समोरच्या हिरव्याकंच चाफ्याच्या पसरट पानाच्या टोकावर 'श्रीमती शिंजीर' तोल सावरताना दिसल्या. त्यानंतर 'बाळदयाळ' अगदी पुढ्यात वाळक्या फांदीच्या धनुकलीवर येऊन बसला. त्याच्या पाठोपा त्याची ताईही घाईघाईने आली. दोघांनी एकमेकांच्या नकला करत माझे मनोरंजन केले. 'खवलेधारी मुनिया' घरट्यासाठी हिरवीगार गवताची पाती इवल्याशा चोचीत घेऊन आपल्याच धुंदीत लगबगीने येरझारा घालताना दिसला. चिंचेच्या झाडावर गर्द पिवळ्या 'सुगरणने' हजेरी लावली. तो निघून जाताच 'शेंडीवाल्या बुलबुल' सोबत 'सुगरणबाई' आल्या. घरट्याचे विणकाम कसे चालू आहे, हे बघण्याची घाई असल्यामुळे त्या आल्या पावली परत गेल्या. चिंचेच्या महिरपीत एक 'चिऊताई' बसली होती. अंगात आळस भरलेला असल्याने ती लवकर उठण्याचे नावच घेईना. शेजारच्या टेरेसवर ठुमकत ...