पाहुणे-रावळे (भाग 1)

काल हॉलच्या खिडकीत बसलेली असताना पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे कोणकोण भेटायला आले ते मी तुम्हाला सांगितलंच. आज बेडरुमच्या खिडकीत बसायचे ठरवले. बराच वेळ बसली, परंतु कोणाचाच पत्ता नव्हता. वाट बघून कंटाळा आला. 'आता पुरे ही प्रतीक्षा' म्हणून उठणार तेवढ्यात समोरच्या हिरव्याकंच चाफ्याच्या पसरट पानाच्या टोकावर 'श्रीमती शिंजीर' तोल सावरताना दिसल्या. त्यानंतर 'बाळदयाळ' अगदी पुढ्यात वाळक्या फांदीच्या धनुकलीवर येऊन बसला. त्याच्या पाठोपा त्याची ताईही घाईघाईने आली. दोघांनी एकमेकांच्या नकला करत माझे मनोरंजन केले. 'खवलेधारी मुनिया' घरट्यासाठी हिरवीगार गवताची पाती इवल्याशा चोचीत घेऊन आपल्याच धुंदीत लगबगीने येरझारा घालताना दिसला. चिंचेच्या झाडावर गर्द पिवळ्या 'सुगरणने' हजेरी लावली. तो निघून जाताच 'शेंडीवाल्या बुलबुल' सोबत 'सुगरणबाई' आल्या. घरट्याचे विणकाम कसे चालू आहे, हे बघण्याची घाई असल्यामुळे त्या आल्या पावली परत गेल्या. चिंचेच्या महिरपीत एक 'चिऊताई' बसली होती. अंगात आळस भरलेला असल्याने ती लवकर उठण्याचे नावच घेईना. शेजारच्या टेरेसवर ठुमकत ठुमकत 'मैनाराणी' आली व सुबाभुळच्या चौकटीत उभ्यानेच डोकावून गेली. तेवढ्यात शेपटीचा झोक सांभाळत 'भारद्वाज' येताना दिसला आणि हिरव्या पडद्याआडून चौकशी करून दिमाखात निघून गेला. उंटावरचा शहाणाच जणू तो.
'सुभग' - तो एक छुपा रुस्तम. शीळ घालून आल्याची फक्त वर्दी देतो. नजरेच्या टप्प्यात अजिबात येत नाही. पण माझे वेडे मन त्याला शोधत राहिले. वडिलधारी 'कावळा' पितृपक्ष असल्याने काव-काव असा आशीर्वाद देत दुरूनच निघून गेला. तेवढ्यात हॉलसमोरच्या झाडावर कोकीळच्या कार्ट्यांनी आरडाओरडा सुरू केला. कर्णकर्कश आवाजात कोकिळाताई गाणे गात होत्या. तर कोकीळदादा तिला सुरात गायचे प्रशिक्षण देत होता. त्यांचा गोंधळ चालू असतानाच मी जेवण आटोपले. वामकुक्षी घेऊन जरा खिडकीत विसावले तर शिंजीरच्या दोन जोड्या शिवाशिवीचा खेळ खेळत होत्या. त्यातल्या एकीने माझ्याकडे साफ दुर्लक्ष करत व्यवस्थित पिसे साफ केली. विशेष म्हणजे आज जोडी जोडीने बहुतेक पाहुणे भेटायला येत होते. मधेच 'लालबुड्या' व 'लालगाल्या बुलबुल' लालचुटुक तोंडलीवर लोंबकळताना दिसत होते. कधी नव्हे ते आज तोंडलीच्या मिष्टान्नावर दोन मोठ्या 'माशा' (bee) ताव मारत होत्या. याचवेळी उंच तारेवर बसून हळदी-कुंकवाचा मळवट भरलेला 'तांबट' कौतुकाने सारे न्याहळत होता. तिकडे उंबराच्या झाडावर 'वटवाघूळ' कसरत करताना दिसले.  त्याच्याशेजारी च्यॉव च्यॉव करत 'मैनाराणीने'  बैठक मारली. एव्हाना धीम्या पावलाने सांज येऊ लागली होती. नेमक्या त्याच वेळी इटुकला, पिटुकला, धिटुकला 'फुलटोचा' नाजूक साजूक वेलीच्या हिरव्या पाळण्यात बसून ऐटीत तोंडलीची लालबुंद फळं खाण्यात मशगुल झाला. त्याच्या इवल्याशा फिकट गुलाबी चोचीत लालबुंद घास पाहून तोंडातून अहा! असे उद्गार निघाले. खातानाची त्याची मोहक हालचाल, पिटुकला घास इवल्याशा चोचीत सांभाळत शेजारच्या डहाळीवर बसून निवांत खाण्याची लकब बघून काय आनंद झाला ते काय वर्णू!
हा 'फुलटोचा' म्हणजे दिवसभरच्या मैफिलीतला जणू शो-स्टॉपरच. 
आता सांजही शामल रंगात बुडू लागल्याने जराशा जड अंतःकरणाने मी खिडकी बंद केली. आणि उद्या सकाळी लालभडक पिकलेली तोंडली खायला खूप सारे पाहुणे येतील या स्वप्नरंजनात मी बुडाली.

#वंदना लोखंडे 
16/09/22
------------------------------------

टिप्पण्या

  1. संपूर्ण पक्षावळच आली की हो दर्शन द्यायला.... शकून गे माये सांगताहे 🙏🏻

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर पक्षी पाहण्यास मिळाले.धन्यवाद.आता तुझा पाय कसा आहे. स्वतःची काळजी घे.

    उत्तर द्याहटवा
  3. ज्ञ्यान असेल तर अर्थ नाहीतर फक्त कलकलाट,
    माहीत असेल तर ओळख नाहीतर फक्त गर्दी,
    नजर असेल तर कवी नाहीतर फक्त माणूस,
    कवी असेल तर साहित्य नाहीतर फक्त लिखाण....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझी विठाई

स्मृती पाखरे ९ : उखळ -मुसळ

माझी वारी