माझी विठाई

#माझीे_विठाई मला अजूनही मागील वर्षाची आषाढी एकादशीची पहाट लख्ख आठवते. ह्युस्टनमधल्या मंदिराचा तो एक छोटासा गाभाराच म्हणा की. तिथे ब्रह्ममुहूर्तालाच विठाईच्या येण्याचे वेध आम्हाला लागले होते. तिच्या स्वागतासाठी आम्ही सर्वजण उत्सुक होतो. खूप मंगलमय वातावरण होते. बघता बघता ती वेळ येऊन ठेपली. प्रत्यक्ष सूर्यदेवही तिच्या आगमनासाठी आतुर झाले होते. त्यांनीे आपल्या सहस्र करकमलांनी गुलालाची उधळण केली होती. गाभाऱ्यात श्रीरामरक्षास्तोत्राचे मधुर स्वर गुंजत होते. सगळ्यांची लगबग चालली होती. सर्वजण माऊलीच्या स्वागताची जोरदार तयारी करत होते. मीही माझ्यापरीने तिच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. मी मनाने केव्हाच पंढरपुरच्या देवळात जाऊन पोहोचले होते. पूर्वी आषाढी एकादशीला अनुभवलेल्या पुण्यातल्या निवडुंग्या विठोबाच्या अभ्यंगस्नानाचे चित्र डोळ्यासमोर तरळत होते. ते क्षण मनात साठवत पंढरपूरच्या गाभार्यात एका कोपऱ्यात बसून विठाईचे मुखमंडल न्याहाळत, तिच्या अभ्यंगस्नानाच्या सोहळ्याची पुनःश्च अनुभूती घेत होते. माझ्या मनाच्या गाभाऱ्यात खोल खोल 'विठ्ठल विठ्ठल' चा अभूतपूर्व नाद गुंजत होता. प...