माझी विठाई

 #माझीे_विठाई


मला अजूनही मागील वर्षाची आषाढी एकादशीची पहाट लख्ख आठवते. ह्युस्टनमधल्या मंदिराचा तो एक छोटासा गाभाराच म्हणा की. तिथे ब्रह्ममुहूर्तालाच विठाईच्या येण्याचे वेध आम्हाला लागले होते. तिच्या स्वागतासाठी आम्ही सर्वजण उत्सुक होतो. खूप मंगलमय वातावरण होते. बघता बघता ती वेळ येऊन ठेपली. प्रत्यक्ष सूर्यदेवही तिच्या आगमनासाठी आतुर झाले होते. त्यांनीे आपल्या सहस्र करकमलांनी गुलालाची उधळण केली होती. गाभाऱ्यात श्रीरामरक्षास्तोत्राचे मधुर स्वर गुंजत होते. सगळ्यांची लगबग चालली होती.  सर्वजण माऊलीच्या स्वागताची जोरदार तयारी करत होते. मीही माझ्यापरीने तिच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. मी मनाने केव्हाच पंढरपुरच्या देवळात जाऊन पोहोचले होते. पूर्वी आषाढी एकादशीला अनुभवलेल्या पुण्यातल्या निवडुंग्या विठोबाच्या अभ्यंगस्नानाचे चित्र डोळ्यासमोर तरळत होते. ते क्षण मनात साठवत पंढरपूरच्या गाभार्‍यात एका कोपऱ्यात बसून विठाईचे मुखमंडल न्याहाळत, तिच्या अभ्यंगस्नानाच्या सोहळ्याची पुनःश्च अनुभूती घेत होते. माझ्या मनाच्या गाभाऱ्यात खोल खोल 'विठ्ठल विठ्ठल' चा अभूतपूर्व नाद गुंजत होता. प्रत्यक्ष तीच माऊली आज माझ्या भेटीसाठी येणार होती. कुठेतरी मनावर एका अनामिक भीतीचे सावटही होते. ठरल्याप्रमाणे ह्या माऊलीचे आगमन निर्विघ्नपणे होईल ना? काही गालबोट तर लागणार नाही ना? 
आणि तो क्षण येऊन ठेपला. सर्वांत आधी मला या विठाईचे काळेशार कुरळ नजरेत भरले.बऱ्याच खटपटीनंतर एका अद्भुत क्षणी ही माऊली प्रत्यक्ष माझ्या पुढ्यात अवतरली. काय वर्णू तिचे रुपडे! फिकट गुलाबी वर्णाची नाजूक-नितळ काया,  माशाच्या आकाराचे पाणीदार डोळे, धारदार नासिका, गुलाबी जिवणी, उंच कपाळ, त्यावरचे काळेशार कुंतल व गुलाबाच्या पाकळीगत तिचे हाता-पायाचे तळवे. खूप लोभस, राजस व गोंडस रुपडे, मी अधाशासारखे माझ्या डोळ्यात साठवत होते. या माऊलीने माझ्या छोट्याशा जगात प्रवेश करताच आनंदाने टाहो फोडला. माहित नाही पूर्वजन्माची पुण्याई की पूर्वसंचित म्हणू, म्हणून ही विठाई माझ्या पदरात आली. माझा आनंद गगनात मावत नव्हता. ज्याक्षणी माझ्या हातात हे 'अद्वैताचे लेणे' आले, तेव्हा मी तिच्या मस्तकावर हळूवार ओठ टेकले. तिला छातीशी धरले. नकळत माझ्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. 
हो, माझ्या मुलीला मुलगी झाली होती आणि मी आजी झाले होते. सुखाचा परमोच्च क्षण काय असतो हे त्यावेळी मी अनुभवत होते.
ह्या माऊलीला न्हाऊ-माखू  घालण्याचे सौभाग्य मला लाभले. तिला मांडीवर घेऊन थोपटत होते. कुशीत घेऊन तिच्यासाठी अंगाई-गीत गात होते. इवल्या इवल्या डोळ्यांनी ही विठाई मला कुतुहलाने न्याहळत असे. माझ्या हालचाली बारकाईने बघत असे.
हिच्याबरोबर गप्पाष्टकं चांगलीच रंगत होती. माझ्या प्रत्येक वाक्याला तिच्याकडून मिळालेला हुंकार मला आनंद मिळवून देत होता. तिला झोळीत निजवताना 'श्रीराम जय राम जय जय राम' नामजपाची अक्षरशः पारायणे होत होती. अनेक बडबड गीते व बालगीतांची हिच्यासाठी माझ्याकडून निर्मिती झाली. या सर्व गीतांनी तिच्या 'वंदूआजीची पोतडी' समृद्ध झाली. 
ह्या पाच महिन्याच्या काळात मी भरभरून जगले.
अरे हो, सांगायचे राहिलेच की, ह्या विठाईचे आम्ही नामकरणही केले. 

#ओवी 

ज्ञानेशांच्या लेखणीतून अवतरलेली, वारकऱ्यांच्या प्रासादिक वाणीतून समृद्ध झालेली ही 'ज्ञानेशाची_ओवी'

यथावकाश पाच महिन्यांनी या माऊलीचा निरोप घेण्याची वेळ आली. प्रचंड हुरहुर. हातातून काही निसटून जात असल्याची भावना व उपभोगलेल्या आनंदाच्या सोन-आठवणी या संमिश्र भावना घेऊन भारतात परत आले.
त्यानंतर काही दिवसांतच या माऊलीने माझी कुटी आपल्या पावन पद-स्पर्शाने पुनीत केली. तिचे माझ्या घरातील वास्तव्य म्हणजे सुवर्णकाळ होता. तिच्या नजरेत मला ओळखीची खूण दिसत होती. माझ्या इतकाच तिला माझ्या पुनर्भेटीचा आनंद झालेला दिसत होता. 
पुन्हा परत निरोपाची वेळ आली. 'ओवी' आपल्या जन्मगावी परत गेली.
खरेतर यावर्षीही आषाढवारीचा मानस होता. ओवीला भेटण्याचा योग होता, परंतु करोनामुळे ही वारी रद्द झाली. त्यामुळे खूप अस्वस्थता जाणवत आहे. परंतु या माऊलीच्या, विठाईच्या भेटीची आस लवकरच पूर्ण होईल ही खात्री आहे.


तिच्यासाठी कालच लिहिलेली 'हंसमाला' वृत्तातील एक कविता सादर करते.

हासुनी नाचते ती 
बोबडे बोल काही 
सांगते नाव 'ओवी' 
लाघवी पोर भारी 

दाखवी दात छोटे 
वासुनी केवढा आ
वाजवी छान टाळ्या 
गातसे गीत "आ आ"

हासती फार बाबा 
सांगती कौतुकाने 
पोरगी गोड माझी 
रोज गाते तराणे

 वंदना लोखंडे
      ३०/०६/२०२०
---------------------------------------

टिप्पण्या

  1. वा फारच छान! नावही समर्पक आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. This was much awaited!! Finally will get to read more on the blogs! Superb!!

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच छान लेखन केलय काकू ...
    आणि नाव ही साजेस आहे

    उत्तर द्याहटवा
  4. वंदना ताई तुझ्या शब्दांगणात मी रंगून गेले आणि स्वतः अनुभव घेत आहे हे भासले
    फरक ईतकाच की मी विठू माऊलीला अनुभवले.आणि आज नजरेसमोर तो रम्य सोहळा सरकन आला.

    उत्तर द्याहटवा
  5. ओवी फार भग्याशिल आहे, तुझ्यासारखी आजी मिळाली म्हणून!👍

    उत्तर द्याहटवा
  6. खूपच छान लिखाण केले आहे वहिनी तुम्ही

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्मृती पाखरे ९ : उखळ -मुसळ

माझी वारी