स्मृती पाखरे ६ : आमचा वाडा

कोणी बांधला, कधी बांधला माहिती नाही. भव्य असला तरी त्यात आम्ही कधी राहिलो नाही. त्यात राहत होत्या आम्हाला दूध पाजणाऱ्या गोमाता (गाई-म्हशी) व त्यांच्या समवेत सर्वांचा पोशिंदा वृषभ राजा. भले प्रमाणभाषेत त्याला गोठा म्हणत असतील पण आम्ही त्याला वाडाच म्हणायचो. या वाड्याला आठ-दहा फूट रुंदीचे व बारा-तेरा फूट उंचीचे प्रवेशद्वार होते. त्यालाच दोन-अडीच फुटाचा एक खिडकीवजा दरवाजा होता. त्यातून ये-जा करायला आम्हाला फार मजा वाटे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मध्यम उंचीचे दगडी चौथरे होते. चौथऱ्याच्या अंगाने उभा राहणारा, जणू भालदार-चोपदाराच्या आवेशातच उभा राही. ह्या प्रवेशद्वारातून वृषभ राजाची गाडी मोठ्या डौलाने बाहेर पडे. त्याच्या गळ्यातील घुंगुरमाळांचा लयबद्ध नाद त्याच्या येण्याची वर्दी देत असे. वाड्यात प्रवेश करताच सहा खणी चौरस क्षेत्रातले शिस्तबद्ध रांगेत उभे असलेले गोधन नजरेस पडे. त्यातली दोन-तीन वासरे आपल्या आईला लुचत असत तर काही माता आपल्या लेकरांना मायेने चाटत बसलेल्या दिसत. आम्हाला पाहताच त्या प्रेमाने हंबरत. आठ-दहा म्हशी, तीन-चार गायी, त्यांची वासरे व दोन बैल ...