आमची संक्रांत

मार्गशीर्षातल्या थंडीने काढता पाय घेतला तसे भास्करबुवा मकर राशीत प्रवेश करणार याची कुणकुण आम्हाला घरात सुरू असलेल्या तीळ-आख्यानावरून लागत असे. 
तीळ आख्यान... हो हो... तीळ आख्यानच म्हणायला हवे. कारण ह्या तीळ महाशयांचीच घरात बडदास्त ठेवली जात असे. शेतातून आलेल्या गोणीतल्या मातकट तिळाला भरपूर पाण्याने न्हाऊ माखू घातले जाई. मग पाणी निथळण्यासाठी एका कोऱ्या टोपलीत त्यास ठेवत. जरा ओलसर असतानाच त्यांची रवानगी गोणपाटावर होत असे. तिथे त्यांची रगडून, सालपटं निघेस्तोवर यथेच्छ मालिश केली जाई.  मालिश झाल्यानंतरचे शुभ्र वर्णातले तीळ पाहून पाहणाऱ्याचीही कांती उजळत असे. सुपात पाखडून त्याची सालं अलगद बाजूला काढली जात. त्यानंतर कढईत चटचट आवाज येईस्तोवर त्यांना शेक दिला जाई. आता हे तीळ महाशय गुळाच्या पाकात माखून घेण्यासाठी सज्ज होत. आजी, आई-काकूंसमवेत लाडू करण्याच्या तयारीला लागे.  एका भल्या मोठ्या बोघणात (पातेल्यात) चिक्कीचा गूळ पेलाभर पाणी घालून उकळायला ठेवत. पाक होत आला म्हणजे त्याचा थेंब वाटीतल्या पाण्यात घालत. त्याची पक्की गोळी झाली म्हणजे लाडवांसाठी पाक तयार झाला असे समजत. भाजलेले तीळ पाकात घालून एकसारखे हलवून गरम असतानाच त्याचे छोटे-छोटे लाडू वळत. हे गरम लाडू आम्ही मुले सुपात घालून घोळवत असू. सुपात घोळल्यामुळे लाडू अगदी गोल व्हायचे. या तिळाच्या लाडवांबरोबर चुरमुर्‍यांचे, दाण्यांचे, डाळ्यांचे लाडू  केले जात. हा आम्हा मुलांसाठी एक आनंददायी सोहळाच असे.
दरवर्षी 14 जानेवारीला मकरसंक्रांत येते. त्याचा आधीचा दिवस म्हणजे भोगीचा दिवस. या दिवशी घरातल्या मुली व स्त्रियांची केस धुण्याची गडबड असे. त्यानंतर साधी खिचडी, कढी, तीळाचे कूट घालून गाजराची भाजी व तीळ लावून बाजरीची भाकरी असा खमंग बेत असे.
भोगी नंतर यायची ती संक्रांत. या दिवशी सकाळी मंदिरातले गुरुजी पंचांग घेऊन घरी येत. घरातली सगळी मंडळी त्यांच्या भोवती गोळा होत असे. संक्रांत कशावर बसून आली आहे, तिने काय परिधान केले, तिच्या हातात काय आहे ह्याची सविस्तर माहिती गुरूजी देत.  त्यावरून येणाऱ्या वर्षातल्या महागाईचे अंदाज वर्तवले जात. त्याचबरोबर गुरुजी दानाचे महत्त्व सांगत. आता हे सर्व आठवल्यावर किती मजेशीर प्रकरण होते असे वाटते. 
त्यानंतर घरात पुरणपोळीचा खास बेत असायचा. वाडवडिलांच्या  स्मृतीनिमित्त  गवरणी व पित्तर  जेऊ घातले जात. स्त्रिया ऊस, बोरे, हरभरे, ओंब्या व वाल घातलेल्या करव्यांची पूजा करून त्यांचे वाण लावत. पुरणपोळीचे जेवण झाल्यावर एक वामकुक्षी घेऊन संध्याकाळी येणार्‍या स्नेहीजनांच्या स्वागतासाठी घर सज्ज असे.  घर झाडून-पुसून लख्ख केले जाई. अंगणात रंगीत रांगोळी व पलंगावर नवीन चादरी, नवीन टेबलक्लॉथ घालत असू. आम्ही मुले नवीन कपडे घालून, एका डब्यात तिळसं (कुटलेल्या तिळात साखर) घेऊन गल्लीतल्या प्रत्येक घरी सर्व मुले एकत्र जात असू. "तिळगुळ घ्या गोड बोला", "आमचं तिळसं सांडू नका, आमच्यासंगे भांडू नका", अशा पद्धतीने तिळगुळ वाटला जात असे. आमच्याकडे तिळगुळ घ्यायला येणाऱ्यांचीही खूप वर्दळ असे. आजोबा पलंगावर बसून  मोठ्यांना  तिळाचे लाडू व लहानग्यांना चुरमुऱ्याचे लाडू देत असत. लहानग्यांना चुरमुऱ्याचा लाडू मिळाला तर त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडणारा आनंद  काय वर्णावा! अशाप्रकारे सगळ्या गल्लीभर हुंदडून झालं की रात्री जेवण न करताच हे थकलेले जीव झोपी जात असत. 
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या घरातले लहान काका आपल्या थोरल्या वहिनींना विचारत,  "जाऊन आल्या का?" आपल्याच नादात असलेल्या वहिनी एकदम चमकून विचारत, "कुठे?". "गधडे वाळायला" अशा प्रकारची थट्टामस्करी करेच्या दिवशी या दीर-भावजय नात्यात होत असे. करेच्या दिवशी जेवणात दोन प्रकारची धिरडी करत. कणकेची गोड धिरडी व बेसन पिठाच्या तिखट धिरडींची अक्षरशः चळत लागत असे. तेव्हा ह्या वहिनी आपल्या दिरांना सांगत, "धिरडे खाऊन घ्या आणि गधडे वाळून या." असो.
याच दिवशी घरात किंवा गल्लीत कुठेतरी एखाद्या लहानग्याच्या बोरन्हाणाचं हमखास आमंत्रण असे. तेव्हा आईबरोबर बोरन्हाणाला जात असू. बाळाच्या अंगावरून घरंगळणारी बोरे वेचायला खूप मजा येई. त्यानिमित्त तिथे हळदी कुंकूही होत असे. 
रथसप्तमी पर्यंत चालणारा हळदी-कुंकू स्त्रियांसाठी आनंदाची पर्वणीच असे. त्यानिमित्ताने घराचा उंबरठा ओलांडला जाई, एकमेकींकडे जाणे होई.  दुपारी चार वाजेनंतर गल्लीत स्त्रियांच्या झुंडीच्या झुंडी दिसत.  काही दिवसांनी समाजाची महिलामंडळे स्थापन झाली. त्यांच्या तर्फे सामूहिक हळदी कुंकवाचे समारंभ सुरू झाले. त्यामुळे घरी बोलवण्याची प्रथा थोड्या फार प्रमाणात कमी झाली.
हा बालपणीचा संस्कार अंगात भिनल्यामुळेच लग्न करून पुण्यात आले तेव्हा कॉलनीतील मैत्रिणींकडे त्यांच्या आई-वडिलांना जोडीने संक्रांतीला तिळगूळ द्यायला गेल्याचे आठवते. त्यातून नक्कीच आपसात स्नेह  वर्धित झाला व तो आजतागायत टिकून आहे.  मीही हळदी-कुंकू करायचे. खूप लांबून स्नेही यायचे.  त्यांच्यासाठी स्वत: खपून कधी ढोकळा, कधी इडलीचा बेत आखत असे. 
माझ्या मुलींनीही बालपणी मित्र - मैत्रिणींसमवेत संपूर्ण अपार्टमेंट मध्ये तिळगूळ देण्या-घेण्याचा आनंद लुटला. अजूनही आम्ही परिवारातले लोक एकत्र येऊन संक्रात साजरी करतो. 
आणि हो,  या संक्रांतीची चाहूल घरातल्यांना माझ्या तीळ आख्यानानेच होते. हाच वसा मुलीनेही घेतला. अमेरिकेत असूनही ती स्वतः तिळाचे लाडू  करते हे पाहून कौतुक वाटते व स्नेह वर्धित करण्याची परंपरा जपताना बघून समाधानही लाभते. 

वंदना लोखंडे
     
---------------------------------------


टिप्पण्या

  1. वहिनी आता पहिल्या सारखे सण साजरा होतांना दिसत नाही

    उत्तर द्याहटवा
  2. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला अन् नव्या पिढीला माहितीचा खजाना.

    उत्तर द्याहटवा
  3. खुप छान लिहतां ताई बालपण हुबेहुब डोळयासमोर येते👌👌🙏

    उत्तर द्याहटवा
  4. वंदना खूप छान..
    संक्रांतीचे यथासांग वर्णन....
    धिरडी-गधडे ही नवीनच माहिती मिळाली....
    माझ्या लहानपणी आमचे सर जर वर्गात मुलींनी गोंधळ घातला तर म्हणायचे संक्रांत अजून खप लांब आहे ...कारण जर अबोला धरला असेल तर बोलण्यासाठी संक्रांती सारखा मुहूर्त नाही...
    माझ्याही बऱ्याच आठवणींना उजाळा मिळाला तुझ्या लेखामुळे

    उत्तर द्याहटवा
  5. काकू खूप छान. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

    उत्तर द्याहटवा
  6. खुमासदार शैलीतील लेखन आवडले ताई
    मकरसंक्रांतीच्या भरभरून शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझी विठाई

स्मृती पाखरे ९ : उखळ -मुसळ

माझी वारी