पाहुणे - रावळे (भाग 3):पितृपक्षातील जेवणावळ

कधीपासून परागंदा झालेल्या तीन 'गोसावीं'नी ('सातभाई') आज सकाळी सकाळी दर्शन दिले. हे मोठमोठ्याने गजर करत येतात म्हणून त्यांचे नाव 'गोसावी' पडले असणार. मला तर त्यांचा आवाज अगदी कर्णकर्कश वाटतो. मोठमोठ्याने भांडण करणारे जणू ते भाऊबंदच. अगोदर या परिसरात 7/8 सातभाई रोज कलकल करत जमिनीवर, झाडावर व टेरेसवर बसायचे. परंतु आता का कोण जाणे, कधीतरी कोलाहल करत अवतीर्ण होतात व लगेच पसारही होतात. सध्या समोरच्या सोसायटीत गवत काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गवत काढलेल्या ठिकाणी किडे-अळ्या शोधण्यासाठी 'चिमण्या' फिरत होत्या. गवत उपटल्यामुळे झालेल्या भुसभुशीत जमिनीत त्या बसतात. त्यांच्या बसण्यामुळे ठिकठिकाणी खळगे तयार झालेले दिसत आहेत. कोरड्या मातीत कित्येकदा मातीस्नानही त्या करत असतात. परवा पाऊस पडून गेल्यानंतर साचलेल्या डबक्यात तीन चार 'चिमण्या' डुंबून स्नानाचा आनंद घेताना पाहिल्या. आजूबाजूला दुर्मिळ झालेल्या 'चिमण्यां'ची संख्या आमच्या परिसरात बऱ्यापैकी आहे. आजकाल सोसायटीत सिमेंटचे ब्लॉक, टाईल्स बसवून मातीचे नामोनिशाणच मिटवून टाकतात. त्यामुळे बिचारे पक्षी...