स्मृती पाखरे ९ : उखळ -मुसळ

स्मृतीपाखरे ९ : उखळ-मुसळ

 'उखळ पांढरे होणे' हा वाक्प्रचार शाळेत असताना पाठ केलेला आपणा सगळ्यांना आठवत असेलच. परंतु आजच्या पिढीला हे 'उखळ' म्हणजे काय हे माहितही नसणार. स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांमुळे याच्याशी ताकापुरता संबंध आहे असे म्हणायला हरकत नाही. 
उखळ पांढरे होणे म्हणजे भरपूर संपत्ती असणे. 
उखळ म्हटले म्हणजे मुसळ येणारच. एकमेकांशिवाय ते अपूर्णच. उखळ-मुसळ नावातील साधर्म्यामुळे दोघे आवळी जावळी असल्याचा भास होतो परंतु दोघे अगदी विभिन्न स्वभावाचे व रंगरूपात जरासेही साम्य नसलेले. उखळाची खडबडीत दगडाची काया तर मुसळ म्हणजे खैर,बाभूळ वा शिसमच्या टणक काष्ठातून निर्माण केलेली एक सुबक कलाकृती. एक हळुवारपणे घाव घालतोय तर दुसरा तितक्याच मायेने तो सहन करतो. ह्या दोघांच्या देवाणघेवाणीतून कधी लाल मिरच्यांचे भुकटीत रूपांतर होई तर कधी भगर (वरई) व राळेच्या अंगावरचे नाजूक  सालपट गळून पडत असे.
मला आठवते, आमच्या मधल्या घरात स्वयंपाकघराच्या भिंतीलगत एक दगडी उखळ होते. उखळ म्हणजे दगडाची एक भली मोठी वाटीच जणू. वरून जेवढी दिसे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जमिनीच्या आत याचा चौकोनी विस्तार होता. 
आमची आजी व आई एका दिवसात तीन-चार पोते मिरची यांत कांडत असत. मिरची कांडताना त्या तोंडाला पदर बांधून घेत. त्यामुळे मिरची कांडताना जी खाशी उठत असे त्यापासून बचाव होई. 
एका हाताने मुसळ धरून दुसऱ्या हाताने उखळात मिरच्या टाकून कुटायला सुरुवात होई. कुटताना एक हात कांडण वर खाली करण्यात गुंतलेला असे.
आमची घरची शेती असल्यामुळे भगर व राळ ही पीके थोड्या प्रमाणात घेतली जात असत. भगरेचे चमकदार कवच काढण्यासाठी हलकेच घाव घालत. ह्या भगरेची चव खूप छान असायची.  आता विस्मरणात गेलेली राळ्याची खिचडी अप्रतिम चवीची असे. 
आता उपवासाला व इतर दिवशीही भगर खाल्ली जाते पण राळेचे दर्शन होणेही दुरापास्त झाले आहे. 
कांडण सहसा पारोशा अंगानेच होत असे कारण त्यानंतर स्नान करणे क्रमप्राप्तच असायचे. नाहीतर मिरचीमुळे अंगाची आगआग व भगर, राळेची तुसं अंगाला टोचत असत. 
या मुसळाचा अजून एक मजेशीर उपयोग होत असे, लग्नप्रसंगी नवरदेव जेव्हा मांडवात येत असे तेव्हा नवरीची मैगारीन (पहिली सवाष्ण किंवा करवली) नवरदेवाची वाट मुसळ आडवं करून अडवत असे. नवऱ्या मुलाने तिच्या हातावर काही ठराविक रक्कम ठेवली तरच त्याची वाट शुभमंगल होण्यासाठी मोकळी होत असे. 
आता हे उखळ फक्त शोभेचा भाग बनून राहिले आहे. काही हॉटेल, रिसॉर्टमध्ये सजावटीसाठी त्यात पाणी भरून फुलांची आरास केलेली बघायला मिळते. अशावेळी ह्या पारंपरिक वस्तू बघूनच मन प्रसन्न होते.
आम्ही आमच्या वडिलांचा अशीतिपूर्ती समारोह 'ढेपेवाड्यात' केला तेव्हा तिथे या उखळाशी गाठ पडली. त्याबरोबर तिथे इतरही अनेक पुरातन वस्तू होत्या. तेव्हा दळण-कांडणाची खोटी खोटी का होईना आम्ही सगळ्यांनी अनुभूती घेतली होती. त्या प्रसन्न मुद्रा कॅमेऱ्यात बंदिस्त करायला अजिबात विसरलो नाही.
सासरच्या घराचे नूतनीकरण करताना सासऱ्यांनी जपून ठेवलेले अनेक मुसळ अडगळीत बघायला मिळाले. आता त्याचा काही उपयोग नाही हे माहीत असूनही त्यातले एक मुसळ उचलून आणण्याचा मोह टाळू शकले नाही. यातून पूर्वजांचा वारसा जपल्याचा आनंदही आहेच.
बहुधा पूर्वीच्या काळी घरात उखळ असणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण असावे. त्यातूनच 'उखळ पांढरे होणे' ह्या वाक्प्रचाराचा जन्म झाला असावा.
माझ्या दोन्ही घरात उखळ होते हे महत् भाग्यच म्हणायचे की!

वंदना लोखंडे
    
-----------------------------------

टिप्पण्या

  1. किती सहजसुंदर लिखाण ताई😊👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान लेख. विस्मरणात गेलेल्या यासारख्या घरगुती बहुउपयोगी वस्तू जसे जाते, हौद, मोठा माठ, शेवयाचे पाट, वड्यांचा झारा वगैरे यांची आठवण यामुळे झाली.

    उत्तर द्याहटवा
  3. नविन पिढीला कळेल अशी खूप छान माहिती .

    उत्तर द्याहटवा
  4. मामी आहेत .त्या आठवं वं।वंदऩ वणी आहेत. खास।

    उत्तर द्याहटवा
  5. सुंदर वर्णन केले आहेस. आठवणी ताज्या झाल्या.

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान वर्णन केले ग! फोटो पण खूप सुरेख👌

    उत्तर द्याहटवा
  7. Beautifully written Aai! You take us back in your time. It’s actually fun to read this series.

    उत्तर द्याहटवा
  8. Best atu photo pn chan ahe purvi chya kali sriya jashya distat tasa poshakh ukhal musal vishyi writing must

    उत्तर द्याहटवा
  9. अरे वाह,खूपच सुंदर वर्णन वंदना ताई

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझी विठाई

माझी वारी