माझी वारी

मी कोथरूडला राहत असतांना ज्ञानेश्वर-तुकाराम माऊलींच्या पादुका पुण्यात जेव्हा जेव्हा यायच्या तेव्हा तेव्हा नवऱ्याला ऑफिसमधून घरी यायला वेळ लागायचा. रस्ते बंद असल्यामुळे  इकडून, तिकडून, लांबचा वळसा घालून  घरी यावं लागायचं. त्यामुळे मी वैतागायची. उगाच रस्ते बंद करतात, पाण्याची कपात करतात, गोंधळ घालतात, घाण करतात वगैरे वगैरे 

पण असं म्हणतात, 'गंगेच खरं स्वरूप बघायचं असेल तर गंगोत्री जवळच गेलं पाहिजे.' तसंच वारीच खरं रुप बघायचं असेल तर वारीमध्येच गेलं पाहिजे.
'आळंदी ते पुणे' हा वारीचा पायी प्रवास मी दोन वेळा अनुभवला. त्याविषयीचे अनुभवकथन मी आज करत आहे.
माझ्यात देवाची आवड निर्माण झाली ती माहेरच्या संस्कारांमुळेच. सव्वाशे/दीडशे वर्षापूर्वीचा राममंदिराचा वारसा आम्हाला मिळाला आहे. तिथे रामजन्म, कृष्णाष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होतो. अशाच वातावरणात वाढलेल्या मुलीला पांडुरंगाचा मोह झाला नाही तर नवलच.
साधारण 2011/12 मध्ये मला  'आळंदी ते पुणे' ह्या वारीत सहभागी  होण्याचा योग आला. त्याला निमित्तही तसेच घडले. आमची एक काकू नेहमी वारी करत असते. तिच्याजवळ मी इच्छा व्यक्त केली आणि ते शक्य झाले. माहेरच्या कुटुंबातील पाच सहाजणी आम्ही वारी निघणार त्याच्या आदल्या दिवशी आळंदी मध्ये मुक्कामाला गेलो. तिथल्या एका पाठशाळेत आमची राहण्याची व्यवस्था होती. आळंदीमध्ये आमच्या गाडीने प्रवेश केला तेव्हा ध्वज- पताकांनी सजलेले रस्ते व माऊली-माऊली, ग्यानबा- तुकारामचा जयघोष सगळीकडे ऐकायला येत होता. ते उत्साहाचं वातावरण पाहून मन भारावून गेले. अाम्ही रात्रीचे जेवण आटोपून प्रथम इंद्रायणी काठावर गेलो. तिथल्या घाटावर सगळीकडे माणसांची अमाप गर्दी. एका मंडपात प्रसिद्ध गायकाचा अभंगाचा कार्यक्रम चाललेला होता. इंद्रायणीच्या पाण्यात पाद प्रक्षालन करून थोडावेळ घाटावरच्या पायऱ्यांवर बसलो. वाऱ्याच्या लहरीवर येणारे अभंगाचे सूर, आजूबाजूच्या दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघालेले इंद्रायणीचे पाणी, मृदुंगाच्या तालावर ताल धरणाऱ्या हळुवार लाटांचं झुळझुळणारं संगीत सारंच काही मनाला भुरळ घालत होतं.  एका वेगळ्याच जगात वावरत असल्याचा प्रत्यय येत होता.
माऊलींच्या पादुकांचा मुक्काम त्यांच्या आजोळच्या घरी असतो. म्हणून पादुकांच्या दर्शनासाठी आम्ही तिथं गेलो. वाडा तसा जुनाट असला तरी आपले पावित्र्य राखून होता.शिस्तीत लोक दर्शन घेऊन बाहेर येत होते. एवढी गर्दी असूनही कुठेही ढकला-ढकली नाही की धक्का-बुक्की नाही. प्रत्येकात एक स्वयंशिस्त दिसत होती. त्यानंतर पाठशाळेत आल्यावर छान गाणी, अभंग म्हटले व सकाळी लवकर उठायचे या विचारात निद्राधीन होण्याचा प्रयत्न केला. परंतु कानावर सततचा विठू माऊलीचा जयघोष येत असल्यामुळे झोप तशी लागलीच नाही. पहाटे साडेतीन-चारला जाग आली. प्रातर्विधी आटोपून माऊलींच्या दर्शनाला मंदिरात गेलो. दर्शन झाल्याचे आठवत नाही. दिंडीतल्या वारकऱ्यांचे जेवणाचे डबे त्यांच्या हवाली करून बरेचसे ट्रक पुढच्या गंतव्य स्थानी मार्गस्थ झाले होते. त्यानंतर सहा साडेसहा वाजता आम्ही आमच्याजवळचे सामान पाठीवर घेऊन वारीबरोबर चालायला लागलो. ह्या वारीचं एक वैशिष्ट्य असतं, माऊलींच्या पादुका घेतलेला रथ वारीच्या अग्रभागी असतो. त्याचं सारथ्य माऊलींचा अश्व करत असतो. माझ्या माहितीप्रमाणे एका विशिष्ट घराण्यालाच त्या अश्वाचा मान आहे. पालखीच्या मागे दिंड्या चालत असतात.  त्यांचे क्रम ठरलेले असतात. प्रत्येक दिंडीत वीणाधारी, मृदुंग व पखवाजवादक असतात. मस्तकावर तुळशीवृंदावन व खांद्यावर पताका असणारी एकतरी व्यक्ती असतेच असते. अबीर-केशर-चंदनाचा टिळा लावलेले वारकरी हातात टाळ घेऊन भगवंताच्या नामात तल्लीन झालेले असतात. एका विशिष्ट लयीत त्यांची पाऊले आत-बाहेर करत पुढे पुढे जात असतात. आम्हीही तो आनंद घेतला. दिंडीत चालणाऱ्या प्रत्येकाच्या मुखावर सात्विक तेज व समाधान पाहायला मिळत होते. त्यांची शिस्त वाखाणण्याजोगी असते. आपल्या दिंडीत ते इतरांना येऊ देत नाही. प्रेमाने बाजूने जायला सांगतात. आमच्यासारखे हौसे-गवसे त्यांच्या बाजूने वारीमध्ये चालत असतात. 225/250 कि. मी.चा पायी प्रवास करत पंढरपूरला विठूदर्शनासाठी जाणाऱ्या या भक्तांचे खूप विशेष वाटते.
ही कसली ओढ? हे कोणते प्रेम? ह्या पावलांना कशाची ओढ असते? ऊन-पाऊस-वारा कशाकशाची पर्वा न करता केवळ सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे धावत असतात.
त्यांच्यात जाती-भेद, गरीब-श्रीमंत व शिक्षित-अशिक्षित असा कुठलाच भेद दिसत नाही.
दिसेल त्याला 'माऊली नमस्कार' म्हणत पुढे पुढे चालत असतात.
प्रत्येक माणसात देव पाहायचा, ही भावनाच किती पवित्र आहे. नकळत आपण ह्या पवित्र धारेचा भाग होऊन जातो.
आता पादुकांचे दर्शन घेण्याची वेळ आली. पालखीभोवती बरीच गर्दी होती. त्या गर्दीत जायला मी धजावत नव्हते. परंतु बहिणीने मला प्रोत्साहित केले. माऊलींच्या पादुकांवर नतमस्तक झाले. हृदयात भाव असला तर नक्कीच आनंद मिळतो, याची प्रचिती आली.
पालखीच्या पुढे जो अश्व होता त्याला लांबूनच नमस्कार करत होते, परंतु अश्वपालाने काही होणार नाही हा विश्वास दिला. अश्वाच्या कपाळाला हात लावून नमस्कार करताना अश्वाच्या नजरेत माझी नजर स्थिरावली. ते डोळे मला काहीतरी सांगू बघत होते. माझ्याकडे भावूकतेने, स्नेहाळ आर्द्रतेने बघत होते.  बस तोच एक क्षण मला विठुमाऊली भेटल्याचा आनंद देऊन गेला. या भेटीसाठी अश्वपालाला मनापासून नमस्कार केला. त्याच आनंदात विश्रांतवाडीपर्यंत येऊन पोहोचले. मग मात्र ठिक -ठिकाणी पाणी, केळे, राजगिरा लाडूंची वाटप केंद्रे दिसू लागली. विविध मंडळे वारकऱ्यांचे स्वागत करताना दिसत होतीे. वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली होती. सामान्य जनमाणसात वारकऱ्यांच्या प्रती असलेला सेवाभाव दिसून येत होता.
पाऊल पुढे पडत होते पण मन मात्र मागे पालखीपाशीच रेंगाळत होते. त्याच अवस्थेत होळकर पुलापर्यंत आलो. तिथे गाडी आमची वाट बघत होती.
पुढच्या वर्षी 'पुणे ते सासवड' वारी करायची असा मनाशी निश्चय करून घराची वाट चालू लागले. परंतु तो योग अजून तरी जुळून आला नाही. माऊलींची इच्छा.
पुढच्या वर्षी रामचंद्र देखणेंच्या दिंडीत सामील होऊन *आळंदी ते पंढरपूर* अशी पूर्ण वारी करण्याचा मानस आहे.

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

वंदना लोखंडे
*02/07/2020*
---------------------------------------
--------------------------------------

टिप्पण्या

  1. खुप छान वर्णन.... वंदना..
    मस्त लिहिलेस

    उत्तर द्याहटवा
  2. खुपचं छान अनुभव कथन केला आहे
    जय हरी विठ्ठल

    उत्तर द्याहटवा
  3. प्रत्युत्तरे
    1. वंदना, वारीचा अनुभव खूप साध्या शब्दांत छान कथन केला आहेस,

      हटवा
  4. खूपच छान आणि ओघवती भाषा शैली. वंदना ताई, तुमच्या वारीचा आनंद तुम्ही ऊत्तम रित्या शब्दबद्ध केला आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. खूप सुंदर वर्णन.....👌👌👌👌👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझी विठाई

स्मृती पाखरे ९ : उखळ -मुसळ