स्मृती पाखरे 3 : जातं

हे महाशय एका महिन्यापूर्वीच आमच्या घरात दाखल झाले. धुळ्याहून ३५० कि. मी. चा प्रवास माझ्या पायाशी बसून मजल दरमजल करत ते पुण्यात आले. सासऱ्यांनी जमवलेल्या मायेपैकी हे एक.  भंगारात जाण्यापूर्वी याला मी मोठ्या प्रेमाने उचलून माझ्या गच्चीवर स्थान दिले. 
याला बघितल्यावर बालपणीच्या आठवणी मनात रुंजी घालू लागल्या. 
ाझ्या माहेरचं घर ऐसपैस तीन खणी रुंदीचं व १०० फूट लांबीचं. ओटा,  बैठकीची खोली, मधलंघर, स्वयंपाकघर ,  मागचं दार अशा भागात ते विभागले होते. 
मागच्या दारी एका खणात भिंतीलगत दोन जात्यांना (एक मोठे व एक छोटे) अचल स्थान दिले होते. त्यामुळे किमान तीन जणी याच्या दिमतीला बसू शकत. याला घास भरवण्यापूर्वी हळदी-कुंकू लावून सुवासिनी पूजा करत. पुरणपोळीचे किंवा शेवयांचे गहू दळण्याचा मान मोठ्या जात्याला मिळत असे. गहू धुऊन, उपसून, सावलीत वाळत घालत. त्यानंतर एक जण त्याच्या मुखात मूठभर धान्याचा घास भरवत व दुसऱ्या हाताने दांड्याला धरून दोघी-तिघी जणींसमवेत संथ लयीत ओढत असत. त्याचबरोबर आनंदाने ओव्याही म्हणत. कदाचित ह्या ओव्या म्हणजे जाते ओढत असतानाच्या होणाऱ्या कष्टाचा भार हलका करण्याचा रामबाण उपाय असावा. याच्या दोन पाळ्यांमध्ये धान्य चांगल्या पद्धतीने पिसले जाई व त्यातून पीठ होऊन बाहेर पडे. ती गंमत पाहणे हा फार रंजक अनुभव असायचा. 
जात्याच्या त्या दोन दगडी पाळ्यांमध्ये भरडल्या जाणाऱ्या धान्यात आता मला स्त्रीचं प्रतिबिंब दिसते. सासर, माहेरच्या दोन पाळ्यांमध्ये असाच तर तिचा जीव भरडला जात असे. ते दुःख लपवण्यासाठी स्त्रीगीतांचा आधार असे. असो. 
माझं माहेर म्हणजे एक शेतकरी कुटुंब. त्यामुळे घरात ज्वारी, बाजरी, गहू, डाळी, भुईमूग, कापूस, भाज्या त्यात प्रामुख्याने मिरच्या व नंतरच्या काळात कलिंगडांची रेलचेल असे. घरात धान्याची सुबत्ता होती, त्यामुळे घरात आई, काकू, आजी सतत कार्यमग्न असत. निवड-टिपण, शेंगा फोडणे, मिरच्या खुडणे व मुख्यत्वे तूर, मूग, उडीद, हरभरा यांच्या डाळी तयार करणे. रोजच्या स्वयंपाकाव्यतिरिक्तची ही त्यांची महत्त्वाची कामे असत. कडधान्ये रात्रभर पाण्यात भिजवून, सकाळी उपसून त्याला तेल लावून ठेवत. वाळल्यावर छोट्या जात्यावर दोघीजणी ते धान्य भरडत. ती भरड पाखडून, त्यातली चुरी बाजूला करून तयार झालेल्या डाळी डब्यात भरून ठेवत. त्यातली चूर रात्री पाण्यात भिजवून, दुसर्‍या दिवशी पाट्यावर वाटून त्याचे कांदे घालून चविष्ट चानके (थालीपीठ) करत.
वसुबारसच्या दिवशी बाजरीची भाकरी खाण्याचा प्रघात होता. त्याचाही इतिहास मोठा रंजक आहे. शेतात बाजरीची कणसं कापताना काही कणसं हाताने मोडत. त्यांना लाकडी धोपटण्याने धोपटून बाजरीचे दाणे अलग करत.  याला हातमोड्याची बाजरी असे म्हणत. नंतर ही बाजरी लाकडी खुट्टा असलेल्या जात्यावरच दळली जाई. कुठेही लोखंडाचा स्पर्श याला होत नसे. पीठ तयार झाल्यावर पितळी परातीत भाकरी थापून खास ठेवणीतल्या पितळी तव्यावर भाकरी करत असत. गरम गरम भाकरीबरोबर दगडी पाट्यावर वाटलेली शेंगदाणा व हिरव्या मिरचीची चटणी खाण्यातली मजा काही औरच असे. आमच्या घरी लाकडी खिट्टीचं जातं नव्हतं म्हणून दुसरीकडे जाऊन बाजरी दळून आणत. आमच्या घरीही धान्य   दळण्यासाठी, ज्यांच्या घरी जाते नाही अशा शेजारणी येत. तेव्हा त्यांच्याबरोबर दळण दळायला आई-काकू स्वखुशीने बसत. 
या दोन्ही जात्यांव्यतिरिक्त या जात्यांचं बच्चं म्हणता येईल असं एक जातं होतं. आमची आजी मधल्याघरात किंवा ओट्यावर ते घेऊन बसे.  खास लोणच्यासाठीची मोहरीची दाळ यांवर भरडली जात असे. 
पुढे लग्न झाल्यानंतर सासरच्या तीन मजली घरात याच्यासाठीची खास खोली दिसली.  पिंपळपूजेच्या व आदित्य राणूबाईच्या व्रतासाठी लागणारी पीठी या जात्यातूनच बाहेर येई. लग्नानंतर पहिल्या वर्षी सासूबाई व जावेसोबत या जात्यावर गहू दळल्याचे आठवते.  
यानंतर या जात्याची गाठ पडली ती थेट माझ्या मोठ्या मुलीच्या लग्नातली हळद दळताना. लग्नातल्या विधींची सुरुवात हळद फोडून व मीठ दळून झाली. पुण्यासारख्या महानगरातही या काळात याची उपलब्धता झाली, हे विशेष.   माझ्या एका बहिणीच्या संग्रहातील या छोट्याशा जात्याचा उपयोग लग्नाची हळद व मीठ दळण्यासाठी झाला.  हिच हळद व हे मीठ ग्रहमुखच्या दिवशी स्वयंपाकात वापरतात.  तसेच नवरीला लावण्यासाठीच्या चिकसात ह्या हळदीचा वापर केला जातो.
असे हे जातं. आता माझ्या घरातच विराजमान झाल्यामुळे मला सकाळ संध्याकाळ याचे दर्शन होते. याच्या रूपाने जणू माझे बालपणच पुन्हा घरात विसावल्याचे जाणवते. 

वंदना लोखंडे
२७/१२/२०२०
--------------------------------------

टिप्पण्या

  1. स्त्री जीवनाचे प्रतीक असणाऱ्या जात्याविषयी खूपच सखोल केलेले विवेचन ....मनाला भावले

    उत्तर द्याहटवा
  2. खरेच ग! कित्ती आठवणी आहेत त्या जत्यामागे! माझ्या आजोळी अगदी मोठ्ठे जाते होते. आम्ही त्याला राक्षसाचे जाते म्हणायचो!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझी विठाई

स्मृती पाखरे ९ : उखळ -मुसळ

माझी वारी