स्मृती पाखरे 1 : Miss शेवंती
स्मृती पाखरे 1
ही आहे मिस शेवंती. पिवळीधमक, हळदीने माखलेली, जणू बोहल्यावर चढलेली.
हिचा माझा बंध जुना.
कोणाशी, कुठे, कसा, केव्हा ऋणानुबंध जुळतो हे आपण काहीच सांगू शकत नाही.
मार्गशीर्ष महिन्यात नवमीच्या दिवशी आमच्या घरी गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात व्हायची. भल्या पहाटे शांताराम बापू (गुरुजी) घरी यायचे. यथासांग दत्ताच्या प्रतिमेची पूजा करून वाचनाला आरंभ करायचे. आई-दादा भक्तिभावाने श्रवण करायचे. आरतीच्या वेळी आम्हा भावंडांना साखर झोपेतून उठवायचे. आम्हीही डोळे चोळत आरतीचा कागद हातात घेऊन ताला-सुरात आरतीचे स्वर आळवू लागत.
श्री गुरुदत्तराज मूर्ती । ओवाळीतो प्रेमे आरती
ती आरती म्हणताना एक वेगळाच उत्साह अंगात संचारत असे. आरती पाठोपाठ,
पुष्पांजली ही तुला अर्पितो। श्रीगुरू यतिराया
तेव्हा म्हटली जाणारी ही पुष्पांजली अजूनही स्मरणात आहे.
आता तुम्ही म्हणणार, मिस शेवंतीच्या ऋणानुबंधाविषयी सांगता सांगता हे काय भलतेच सांगत आहे.
ऐका ना, तेच तर सांगते. गुरुदत्ताच्या फोटोसाठी रोज एक बट शेवंतीचा हार आणला जाई. दुसऱ्या दिवशी निर्माल्य झालेल्या या हाराचे आम्ही गजरे करत असू. शाळेत जाताना लांबलचक वेणीवर दिमाखात विराजमान झालेला गजरा हे सर्वांसाठी एक आकर्षण असायचे. त्याच्या मंद सुगंधाने भारलेल्या वर्गात आपण कोणीतरी खास असल्याचा भास व्हायचा.
तर अशी ही मिस शेवंती. तिला पाहणारा हमखास तिच्या प्रेमात पडत असे.
माझे लग्न झाले व मी पुण्यात आले. आणि मार्गशीर्ष महिन्यातील त्या मंत्रमुग्ध वातावरणाला, त्या मिस शेवंतीला मी कायमची मुकले. तिचे दर्शनही दुर्मिळ झाले.
काही वर्षांनी पुन्हा भेटली ती ताईच्या बागेत. वीतभर उंचीच्या हिरव्याकंच झुडुपावर झुबक्यांमध्ये विसावलेली ही मिस शेवंती पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पुन्हा तिच्या प्रेमात पडले.
मग हिरव्यागार परकर पोलक्यातल्या त्या सोनपरीला मी अलगद हाताने माझ्या बागेत आणले. तिची आडवे पसरण्याची हौस बघून तिला ऐसपैस चौसोपी वाड्यात (कुंडीत) स्थान दिले. पण बाईसाहेब मनासारख्या फुलल्याच नाहीत. अगदी नावाला एखाद-दोन झुबक्यात आपले अस्तित्व दाखवते. पण तेवढ्यानेही माझे मन प्रसन्न होते. परवाच या हळदुलीचा एक झकास फोटो काढला. म्हटलं दाखवावं हिचं लोभस रूपडं आपल्या मित्र-मैत्रिणीना.
काय आवडली ना आमची मिस शेवंती?
तिला पाहिल्याबरोबर तुम्हीही तिच्या प्रेमात पडलात ना?
जय दत्तगुरू
वंदना लोखंडे
23/12/2020
--------------------------------------
खूप छान वंदनाताई
उत्तर द्याहटवाखूपचं छान तुमची मिस शेवंती.
हटवामनापासून धन्यवाद 🙏
हटवाYes, of course loved reading it and going through those memory lanes...thanks for digging them out🤗
उत्तर द्याहटवावंदना.. खूपच छान..
उत्तर द्याहटवाकिती वेगवेगळ्या angal ने विचार करतेस..
शेवंती जणू मैत्रिणीच... अशा प्रकारे वर्णन करते..
मला ही लहानपणी शेवंतीची वेणी दिमाखात घालायचो ते आठवले.. Great
छान भावबंध!
उत्तर द्याहटवाकाकू, खूपच छान वर्णिले आहे शेवंतीला..
उत्तर द्याहटवाशब्दच नाहीत मजकडे कौतुकाला..
😊🙏🏻🙏🏻