स्मृती पाखरे 4 : बंब्याभाऊ
ओळखलंत का याला?
हा आमचा बंब्याभाऊ. आम्ही पाहिला, आमच्या मुलांनी पाहिला. परंतु आमच्या मुलांच्या मुलांना याचे दर्शन घडणे केवळ अशक्य. याचं रूप तरी किती लोभस! रसरशीत तांबूस लाल रंग, कारण तो बनलाच मुळी तांब्याचा. त्याचा देह म्हणाल तर दंडाकृती गोल. सतत पाणी पिणारा. पिऊन पोटात साठवणार, आच मिळताच तापवणार व कोणी मागितले तर उदार अंत:करणाने गरम पाणी पुरवणार. बदल्यात फक्त थंडगार पाण्याची अपेक्षा. त्याचा स्वभाव म्हणजे अगदी तुमच्या आमच्या वडिलांसारखा. प्रचंड ताप सोसून, प्रत्येकाला उब देणारा. थंडीच्या दिवसात याचा सहवास मिळावा यासाठी आम्ही मुलं त्याच्याभोवती कोंडाळं करून उभी राहत असू.
याला पेटवायचा म्हणजे त्याच्या दंडाकृती देहातल्या गोल पोकळीत अग्नी पोहोचवायचा. ते प्रकरणही जरा मजेशीरच असे. त्याच्या बुडाला एक झारा मोठ्या खुबीने अडकवलेला असे. तो बाहेर काढून त्याच्यावर रॉकेल मध्ये भिजवलेला गवरीचा तुकडा ठेवायचा व झाऱ्या आतमध्ये सरकावयाचा. नंतर त्याच्या पोकळीच्या मुखात एक जळती काडी टाकली की हा भडकणार. मग हळूहळू एकेक लाकूड त्याच्या मुखात घालायचं. लाकूड घालताना त्याचा श्वास कोंडणार नाही एवढी काळजी मात्र घ्यावी लागे. लाकूड जळाले म्हणजे राख होणारच. ती राख मुकाट्याने पठ्ठ्या बुडाच्या झाऱ्यावर टाकत असे. झारा हलवला की राखेचा निचरा होऊन बंब्याभाऊचा श्वास मोकळा होई व त्याचा प्रज्वलित होण्याचा उत्साह वर्धित होई.
त्याच्या ओटीपोटावर एक पितळी तोटी असे. ती फिरवताच गरम गरम पाण्याची धार घंगाळात पडे. त्या ऊन ऊन पाण्याने आंघोळ करताना तन -मन प्रसन्न होई व अंगातले चैतन्य प्रवाहीत होई.
या बंब्याभाऊला मात्र कोरड्या लाकडाचाच घास आवडे. चुकून ओलसर लाकूड पोटात गेले तर प्रचंड धूर सोडून हा आपला निषेध जाहीर करत असे. तेव्हा त्याला पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी यायचं.
सततच्या तापाने व हवेच्या संपर्कात त्याचा तांबूस लाल रंग काळपट होई. तेव्हा त्याला घासून पुसून स्वच्छ करणे म्हणजे एक दिव्यकर्मच म्हणायचे. भरपूर मीठयुक्त चिंचेचं उटणं त्याला लावायचं. त्यानंतर त्यानेच टाकलेल्या राखेने जरा जास्त जोर लावून मालिश करायची. त्यामुळे त्याचा शिणवटा दूर पळून जाई. पण मालिश करणारीला शीण येई. बादलीभर स्वच्छ थंडपाणी अंगावर पडल्यावर बंब्याभाऊ दिलखुलास हसे. त्याचे ते रूप पाहून सारेच खुश होत असू.
पुढे घराचे नूतनीकरण झाल्यावर याची जागा हीटर नामक विद्युत उपकरणाने घेतली व बंब्याभाऊची रवानगी अडगळीच्या खोलीत झाली.
लग्न करून सासरी आले, तिथे पहाते तर हा बंब्याभाऊ स्वागताला उभा होता. त्याला पाहून माहेरचा माणूस सासरी भेटल्याचा आभास झाला. घराच्या मध्यवर्ती भागातील चौकात एक भला मोठा हौद होता. त्याच्याशेजारी बंब्याभाऊ डौलात उभा होता. त्याला रोज सकाळी पेटवण्याची जबाबदारी सासरेबुवांची होती. एकदा त्याच्या पोटात अग्नी सरकवल्यावर चौकातच सासरेबुवांची गानमैफल रंगत असे. 'साधो मन का मान त्यागो', 'वाट पाहुनी जीव शिणला' (ज्यामुळे पुण्यात असणाऱ्या नवऱ्याची मला प्रकर्षाने आठवण येई) त्याचबरोबर 'केवढे हे क्रौर्य', 'पडू आजारी मौज वाटे' अशा जुन्या कवितांची सुरांत आळवणी होई व सकाळही प्रसन्न होई. पुढे ह्या घराच्या नूतनीकरणासाठी बंब्याभाऊची रवानगी एका गोडावून मध्ये झाली. तेव्हा इतर तांब्यापितळीच्या भांड्यांबरोबर ह्याचीही चोरी झाली. हे ऐकून मन फार विषण्ण झाले.
असा हा बंब्याभाऊ मला पुन्हा भेटला तो पुण्यात, अगदी माझ्या घराजवळच. या अभूतपूर्व भेटीविषयी सांगायलाच हवे.
लॉकडाऊनच्या काळात विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल जमीनदोस्त होणार अशा बातम्या येऊ लागल्या. मरणापूर्वी त्याची गळाभेट घ्यावी व त्याला कॅमेऱ्यात बंदिस्त करावे या हेतूने मी सकाळी सकाळी घराबाहेर पडले. दोन चार फोटो काढून, त्याचे रूप डोळ्यात साठवून जड अंतःकरणाने घरी परत येताना घराजवळच्या शिवकालीन, खिंडीतल्या गणपती मंदिराजवळच्या वस्तीत बंब्याभाऊचे दर्शन झाले. माझा आनंद गगनात मावेना. पाच-सहा घरांच्या साफसुथऱ्या बैठ्या चाळीत हे महाशय हलकासा धूर सोडतांना दिसले. तेच ते राजबिंडे तांबूस रूप. अगदी तसाच दोन पितळी कानांनी सजलेला त्याचा दंडाकृती देह व त्याच्या मुखावरील तसेच झाकण पाहून मन हरखले. विविध कोनांतून त्याची छबी कॅमेर्यात टिपली. या आनंदात माझी लेकही सहभागी झाली. या बंब्याभाऊला पाहून उड्डाणपुलाचे दु:ख जरा हलके झाले व बालपणीचा सखा गवसल्याच्या आनंदात मी घरी परतले.
वंदना लोखंडे
-------------------------------------
जुन्या आठवणींना उजाळा
उत्तर द्याहटवाबंबाचा होता थाट निराळा
धन्यवाद
हटवाखरंच वहिनी तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिला , मि स्वतः हे अनुभवले आहे , खूपच सुंदर .
उत्तर द्याहटवा😊🙏
हटवाबंब गेला अन सोलर आला.
उत्तर द्याहटवा👌👌
✍
धन्यवाद सर 🙏
हटवाबंब गेला अन सोलर आला.
उत्तर द्याहटवा👌👌
✍
खरं आहे
हटवातु जे काही लिहिलं तसेच्या तसे आणुभवल झारा झटकने, ओल लाकूड, धूर, घासणे म्हणजे दिव्य आसायचे तो स्टार्ट करणे म्हणजे आम्ही एक मेकींवर ढकलायचे 😁 सकाळची शाळा आसायची तेव्हा रात्री सगळी तयारी करायची आणि जो तयारी करेल त्याला १ ली आंघोळ करायला मिळायची तुझे हे वाचल्यावर जुने दिवस आठवले😌
उत्तर द्याहटवाधन्यवाद गं 😊
हटवाताई बालपण आठवले .👍😊😊
उत्तर द्याहटवा😊👍
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाताई , तुमच्या ह्या उपक्रमामुळे कालबाह्य झालेल्या जुन्या भांड्याच्या दुनियेची सफर तर होतेच आहे शिवाय ज्ञानातही भर पडतेय.
उत्तर द्याहटवाधन्यवाद माधुरी 😊🙏
हटवातू ज्याप्रकारे या आठवणी मांडते ना,ते फारच लोभस आहे.. वाचतच रहावेसे वाटते.
उत्तर द्याहटवाधन्यवाद क्रांती 😊
हटवासहज भुतकाळात नेलेत.
उत्तर द्याहटवाखरच या बंब्या भाऊची फार आठवण आली.
घरातल्या आता आपल्यात नसलेल्या सगळ्यांची आठवण तुम्ही करून दिलीत.
*धन्यवाद !!*
💐🙏🏼👌
😊🙏
हटवाखरंच मी पण ह्या भाऊला miss करतो.
उत्तर द्याहटवानाशकात आमच्या वाड्यातला बंब पेटवणे व गवऱ्या लाकडे आणणे माझे काम होते.
वहिनींनी सुंदर लिहिले आहे.
आज गिझर मधून बंबाच्या पाण्याचा आभास झाला.
धन्यवाद 🙏🙏
श्रीरंग देशपांडे
धन्यवाद भाऊजी 😊🙏
हटवाहो, वंदनाताई,मला पण बालपण आठवले.
उत्तर द्याहटवासकाळी सकाळी आई बंब पेटवायची ,अगदी तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे..नंतर पाणी तापले की एकेकाची आंघोळ,परत त्यात गार पाणी टाकणे...मग पुढचा असे चक्र चालू रहायचे.शेवटी जो असेल तर त्याने तो झाऱ्या काढून विस्तव विझवायचा .... प्रत्येकजण आपली कामे अगदी न चुकता आणि आनंदाने करायचा.
😊🙏
हटवाकाकू, खूप छान. !! 👌👌
उत्तर द्याहटवाPallavi
उत्तर द्याहटवाखूप सुंदर बंब्या भाऊ वाचून
माहेरची आठवण आली
धन्यवाद पल्लवी 😊👍
हटवा