स्मृती पाखरे 5 : पाटा-वरवंटा

पाटा-वरवंटा हे आहेत सख्खे भाऊ. मोठा भाऊ रुंद खांद्याचा, भरदार छातीचा तर धाकटा अतिशय बुटका व गोल-मटोल. दगडाचे हृदय असले तरी दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम. 'दो जिस्म पर एक जान है हम' अशातलं यांचं प्रेम. खायला जे मिळेल ते दोघे वाटून खाणार. कधी तक्रार नाही. त्यांच्या कचाट्यात जो कोणी येईल त्याला रगडून रगडून त्याची चटणी होणार हे निश्चित.
एके काळी ही जोडगोळी स्त्रियांची विशेष लाडकी होती. अगदी थेट स्वयंपाक घरात त्यांना विशेष स्थान होते. 
आमच्या स्वयंपाक घरातील मोरीजवळ हे पठ्ठे निवांत पहुडलेले असत. भाज्यांसाठी मसाला, शेंगदाण्याची चटणी किंवा डाळी बारीक करायच्या असतील तर आई-काकूंना यांचाच मोठा आधार असे. हे पठ्ठे पाणी प्यायल्याशिवाय  कुठलाही पदार्थ वाटायला राजी होत नसत. एकदा पोटात पाणी पडले की पदार्थांची मऊ-मुलायम चटणी करून देत. 
आमच्या लहानपणी आम्ही कधी बाहेर हॉटेलात गेलो नाही की बाहेरचा पदार्थ कधी घरी आणला नाही, पण तरीही आम्हाला कधीही जेवणाचा कंटाळा येत नसे. 
माझं माहेर म्हणजे खटल्याचं घर. आता हे खाटलं कुठून आलं असा विचार साहजिकच तुमच्या मनात आला असेल. परंतु खटल्याचं घर म्हणजे एकत्र कुटुंब. ज्यामध्ये आजी-आजोबा. आई-वडील, काका-काकू, सख्खी-चुलत भावंडं, सुट्टीच्या दिवसात आत्या व तिची मुलं असे सर्व मिळून  पंचवीस -तीस लोकं घरात गुण्या-गोविंदाने राहत असत. 
एवढी सगळी खाणारी तोंडं असली तरी रात्रीच्या जेवणात एकच पदार्थ होत असे. पण त्यातही वैविध्य राखले जाई. 
खिचडी केली तर साधी खिचडी व फोडणीची खिचडी.  सांज्याचे तीन प्रकार.. साधा, फोडणीचा व गोड सांजा.  चिखल्या (वरणफळ) केल्या तर त्याही साध्या व फोडणीच्या (गोड-आंबट) होत असत. दशम्या केल्या तर गोड दशमी व तिखट दशमी दोन्ही करत.  या दशम्यांबरोबर खाण्यासाठी जी चटणी होत असे ती या पाटा-वरवंट्यावरच.
काय सांगू तिची खुमारी!  
भाजलेले दाणे, लाल तिखट, लसूण, चवीला जिरे, धणे व मीठ व थोडे पाणी. सर्व एकत्र करून रगड रगड रगडायचे. रगडताना येणारा तालबद्ध चिक् चिक् असा आवाज ऐकण्याजोगा असे. गुलबट केशरी रंगाची चटणी व त्यावर चमचाभर तेल...अहाहा! खाण्याची इच्छा नसणाऱ्याच्याही तोंडाला पाणी सुटत असे.
याच्या खरबरीत अंगामुळे चटणी वाटणे सोपे जाई. सारखं रगडून रगडून हा चिकण झाला की पाथरवटाला बोलवले जाई. तेव्हा याच्या सर्वांगावर छिनी - हातोडीचे हलके घाव घालून त्यांना टाकले जाई.  त्यामुळे त्यांचे सौंदर्य तर वर्धित होईच परंतु पदार्थ वाटायलाही सोपे जाई.  पाटा - वरवंटा टाकून घेतल्यावर त्यावर प्रथम बाजरी वाटून घेत. त्यामुळे कचकच निघून जाई. बाजरीचा घास वाटल्यानंतरच पाटा -वरवंटा रोजचे मसाले व चटणी वाटायला सिध्द होत असे. 
यावरचा अजून एक चवदार, रुचकर पदार्थ म्हणजे शेंगदाण्याचं बट्टं (आमटी).  या गरम गरम आमटीचा भुरका मारण्यातली मजा काही औरच होती.
काही प्रसंगीच हे दोघे भाऊ विभक्त होत असत.  उडदाच्या पापडाचे पीठ मऊ करताना फक्त पाट्याचा उपयोग होई. घट्ट भिजवलेले पीठ तिंबून मऊ करण्यासाठी वरवंट्या ऐवजी  मुसळीबाईंना बोलवले जाई. ही मुसळीबाई दूरच्या नात्यातली बहिण होय. पीठ कुटण्यात हिला भारीच मजा वाटे. 
घरात एखादे लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या बारशाच्या प्रसंगी आपल्या शेंडेफळाचा म्हणजे वरवंट्याचा भलताच मान असे. नवीन कोरं झबलं-टोपडं याच्या अंगावर चढे. गळ्यात एखादी छानशी ठुशीही घातली जाई. बाळाच्या अगोदर सुवासिनी त्याची पूजा करत.  सजलेल्या धजलेल्या वरवंट्याला पाच वेळा पाळण्याखालून काढून बाळाच्या अगोदर पाळण्यात बसण्याचा मान या शेंडेफळाचाच.
असा हा लाडका पाटा-वरवंटा घरात मिक्सर आल्यावर पूर्णपणे दुर्लक्षित झाला.
लग्न करून मी पुण्यात आले तेव्हा माझ्याकडे मिक्सर नसल्यामुळे थोडी पंचाईतच व्हायची. परंतु आमच्या समोर राहणाऱ्या जाधवकाकू माझ्या मदतीला धावून आल्या. त्यांनी त्यांच्याकडचा छोटा पाटा-वरवंटा माझ्याकडे पाठवला. पाठच्या भावाप्रमाणे तो बहिणीची कामे वाटून घेत असे. त्यावर उडदाची डाळ वाटून दहीवडे केल्याचेही मला आठवते. ज्यामुळे नवरोबाची स्वारी भलतीच खुश झाली होती. मिक्सर आल्यावर त्याची रवानगी पुन:श्च काकूंकडे झाली. पण तरीही त्याचा माझ्यावरचा लोभ काही कमी झाला नाही. हट्टी मुलासारखा तो पुन्हा माझ्या घरात आला. 
आमचे 'हे' हमरस्त्याची कामे बघत. रस्त्याच्या बाजूला लावण्यासाठी पाथरवटाकडून दगड घडविले जात. तेव्हा आमच्या 'ह्यांनी' एक खास पाटा-वरवंटा बनवून घेतला. परंतु त्याच्यावर एका सहकाऱ्याची नजर पडली आणि त्याने तो पळवला. आमचे 'हे' पण काही कमी नव्हते, त्यांनी त्याच्याकडे जाऊन तो पाटा-वरवंटा गाडीत घालून घरी घेऊन आले. हा पाटा-वरवंटा आता जवळपास पंचवीस वर्षाचा झाला.  पण फारसा उपयोगात काही आला नाही. मात्र नातीच्या बारशाच्या वेळी शेंडेफळाने पाळण्यात बसायचा मान मिळविलाच. 
आता सध्या टेरेसवर औदुंबर, बहावा, सोनचाफ्याच्या सावलीत बसून मला खुणावत असतो. शेंगदाण्याची चटणी आम्हा भावंडांना कधी वाटून खायला मिळेल याची वाट बघत बसलेला दिसतो. लवकरच त्याची इच्छा पूर्ण होईल असे मिथ्या आश्वासन मी त्याला रोजच देत असते. 

वंदना लोखंडे
      
--------------------------------------

टिप्पण्या

  1. खूप छान लिहील आहेस.वाचताना मजा आली. माझा पाटा आठवला.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खूप छान ...आई कडच्या जुन्या आठवणी उजळल्या....आता वरवंटा एकीकडे तर पाटा कपडे धुण्यासाठी ठेवला होता..तोही आता वाशिंग मशीन आल्यामुळे एकटा पडला...

      हटवा
  2. वरवंटा पाटा नाही आठवणीला तोटा
    आला मिक्सर आता आवरा पटा पटा

    उत्तर द्याहटवा
  3. वंदना तुझा पाटा-वरवंटा लेख वाचला खुपच सुरेख लिहिलं आहे परत जुन्या काळात गेल्यासारखे वाटले तुझ्याकडे तर आहे पाट आणि वरवंटा आम्ही तर त्याकडे कधीच पाठ फिरवली आहे. लेख वाचून गतकाळात गेल्यासारखेच वाटले. तुझे लिखाण अतिशय उत्तम आहे.👍🌹

    उत्तर द्याहटवा
  4. अवलोकन व भाषेवरील प्रभुत्व याचा सुंदर मिलाफ

    उत्तर द्याहटवा
  5. Just admire the way you share the necessary information in a very lucid way!! Your words have power to give the experience of time travel !! 👍👍

    उत्तर द्याहटवा
  6. खूप सुंदर लिहिलय...हळूहळू अनेक जुन्या गोष्टी लोप पावत चालल्या आहेत..अशा लेखांमुळे गतकाळात मन रमते..आणि नव्या पिढीला देखील या जुन्या अनमोल ठेव्याची माहिती मिळते 😍

    उत्तर द्याहटवा
  7. खूपच छान आठवणी लिहिल्यात. पाटा वरवंटा शिवाय खरंच काही पदार्थांना चव येत नाही हे तितकेच खरे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझी विठाई

स्मृती पाखरे ९ : उखळ -मुसळ

माझी वारी