स्मृती पाखरे ६ : आमचा वाडा

कोणी बांधला, कधी बांधला माहिती नाही. भव्य असला तरी त्यात आम्ही कधी राहिलो नाही. त्यात राहत होत्या आम्हाला दूध पाजणाऱ्या गोमाता (गाई-म्हशी) व त्यांच्या समवेत सर्वांचा पोशिंदा वृषभ राजा.
भले प्रमाणभाषेत त्याला गोठा म्हणत असतील पण आम्ही त्याला वाडाच म्हणायचो. 
या वाड्याला आठ-दहा फूट रुंदीचे व बारा-तेरा फूट उंचीचे प्रवेशद्वार होते. त्यालाच दोन-अडीच फुटाचा एक खिडकीवजा दरवाजा होता. त्यातून ये-जा करायला आम्हाला फार मजा वाटे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मध्यम उंचीचे दगडी चौथरे होते. चौथऱ्याच्या अंगाने उभा राहणारा, जणू भालदार-चोपदाराच्या आवेशातच उभा राही.
ह्या प्रवेशद्वारातून वृषभ राजाची गाडी मोठ्या डौलाने बाहेर पडे. त्याच्या गळ्यातील घुंगुरमाळांचा लयबद्ध नाद त्याच्या येण्याची वर्दी देत असे. 
वाड्यात प्रवेश करताच सहा खणी चौरस क्षेत्रातले शिस्तबद्ध रांगेत उभे असलेले गोधन नजरेस पडे.  त्यातली दोन-तीन वासरे आपल्या आईला लुचत असत तर काही माता आपल्या लेकरांना मायेने चाटत बसलेल्या दिसत. आम्हाला पाहताच त्या प्रेमाने हंबरत. आठ-दहा म्हशी, तीन-चार गायी, त्यांची वासरे व दोन बैल येथे गुण्यगागोविंदाने नांदत.
या सर्वांची खाण्या-पिण्याची बडदास्त ठेवली जाई. म्हशींना ढेप व गाई-बैलांना चारा खाऊ घालत. चारा ठेवण्यासाठी दहा फूट उंच जमिनीवर व सहा फूट जमिनीत खोल अशी एक खास खोली होती. व्यायलेल्या गायी-म्हशींना ओवा, म्हशीशोप व गूळ घालून केलेल्या बाजरीच्या घुगऱ्या खाऊ घालत. त्यांचा जार व्यवस्थित पडावा यासाठी लाकडी नळातून त्यांना गोडेतेल पाजत. बैलाचे पोट साफ करण्यासाठी त्यांनाही गोडेतेलाचा डोस पाजला जाई. कधी काळी आजारपणात दवाखान्याची वाट चालावी लागे. तिथे जाणे शक्य नसेल तर पशुवैद्याला बोलावण्यात येई. 
दिवसातून तीन वेळा त्यांना खाऊ घालत व दोन वेळा त्यांचे दूध काढले जाई. 
दूध काढण्याचीही एक विशिष्ट पद्धत होती. दूध काढणारा प्रथम गाई-म्हशींना गोंजारत असे. त्यानंतर त्यांच्या वासरांना दूध प्यायला सोडत. वासराचे तोंड लागताच गाई-म्हशीला पान्हा फुटे. वासरू दूध पीत असतानाच त्याला बाजूला सारले जाई. अशा वेळी त्या वासरांची कीव येऊन जीव हळहळे. त्यानंतर त्यांच्या मागच्या पायांशी उखड बसून दोन पायात बादली घट्ट धरून त्यात आचळांना हळुवार पिळून दूध काढत असे. या दूध काढण्यालाही विशिष्ट लय असे. बादलीत पडतांना त्याचा होणारा सरसर आवाज कानात गुंजे. बघता बघता चार-पाच लिटरची बादली भरून जाई. काही वेळेस एखादं भावंडं हे धारोष्ण दूध सरळ तोंडात घेण्याचा आनंद लुटत असे. 
एखाद्या वेळी दुर्दैवाने जन्मत:च वासरू मेले तर बछड्याला पाहिल्याशिवाय गाई-म्हशी दूध देत नसत. अशा वेळी या मृत वासरांचे शीर किंवा संपूर्ण शरीर भुसा भरून गाई-म्हशींच्या पुढ्यात उभे करत. त्यांना पाहून गाई-म्हशींना पान्हा फुटे. खरोखर आपण त्यांच्या वात्सल्याची चेष्टाच करत होतो असे आज वाटते.
गाई-म्हशी व्यायल्यानंतरच्या पहिला दिवसाच्या दुधाला चीक म्हणत. त्यात थोडे दूध मिसळून वाफवत. वाफवलेला गोळा किसून त्यात साखर घालून केलेल्या वड्यांचा स्वाद अजूनही जिभेवर रेंगाळत आहे. त्यानंतरच्या दोन दिवसाच्या चिकात गूळ घालून, वाफवून वड्या करत. या वड्या मऊ व लिबलिबीत असत. तोंडात घातले की पाणी झालेच समजा. त्यानंतरच्या आठ-दहा दिवसाच्या दुधात गूळ, वेलची घालून उकळत. हा खरवस बशीत ओतून प्यायला खूप मजा येत असे.
माझं माहेर म्हणजे दूध-दुभत्याचं घर.  दूध, दही, ताक, लोणी, तूप यावर यथेच्छ ताव मारायचो. मी लहानपणी एकावेळी अर्धा लिटर दूध प्यायची. त्यामुळे बाळसेदार, गुटगुटीत, सुदृढ बालक ही विशेषणे मला शोभायची. माझे काका म्हणायचे, "हिला लग्नात आपण एक लोखंडी म्हैस देऊ." लोखंडी म्हैस काही दिली नाही, परंतु 'लोखंडे' उपनाम बहाल केले. हे आज आठवले की हसू येते.
पहाटे पाच वाजता व दुपारी चार वाजता दूध काढले जाई. वाड्याबाहेरच्या चौथऱ्यावर बसून दूधाची विक्री केली जाई. पहाटेच्या दुधाची विक्री वडिल करत तर दुपारच्या दुधाची विक्री आमची 'नानी आजी' एखाद्या नातवाला सोबत घेऊन करत असे. आलेले पैसे कमरेला लावलेल्या खात्यांच्या पिशवीत ठेवत असे. त्या काळात दुग्धव्यवसाय सांभाळणाऱ्या आजीचे मला आजही विशेष कौतुक वाटते. 
वाड्याच्या प्रवेशद्वाराला लागूनच सालदारांसाठी दोन खोल्या बांधल्या होत्या. जेणेकरून चोवीस तास या गुरांची काळजी घेतली जावी हा उद्देश तर होताच, परंतु आपल्याकडे असलेल्या सालदाराची व त्याच्या कुटुंबाची जबाबदारी मालक स्वीकारत होता. 
ह्या गोधनाच्या आशीर्वादानेच आमच्या कुटुंबाचा दुग्धव्यवसाय विकसित झाला. शेतीत भरघोस उत्पन्न मिळत गेले. पुढे नवीन व्यवसायही शोधले गेले. परंतु ह्या गोधनाची माती कधी होऊ दिली नाही. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या ट्रकभर गाईंना सोडवून त्यांची शेतात व्यवस्था केल्याचे आठवते. आजही माहेरी भाकड (दूध न देणाऱ्या ) गायींना सांभाळले जाते.
म्हणूनच मला माझे माहेर सदैव गोकुळच भासते. 

वंदना लोखंडे
      
--------------------------------------

टिप्पण्या

  1. हा लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान.हे मी स्वतः १२ वी पर्यंत अनुभवले आहे.जयहिंद कॉलनीतील घरी गाई व म्हशी होत्या.आठवणी जागृत झाल्या.खूप छान मांडले................... पंकज मिस्त्री

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझी विठाई

स्मृती पाखरे ९ : उखळ -मुसळ

माझी वारी