स्मृती पाखरे ७ : धाब्यावरील गमतीजमती
आमच्या ओसरीला (बैठक खोली) लागूनच धाब्यावर जाण्यासाठी एक लाकडी जिना होता. बारा-पंधरा पायऱ्या चढून गेल्यावर जिना संपतो त्या ठिकाणी तीन चार फुटाची जी चौरस जागा होती तिला आम्ही 'जिन्याची ताटली' म्हणत असू. तिच्या दोन्ही बाजूला धाब्यावर जाण्यासाठी दरवाजे होते. जिन्याची ताटली व माझा असा खास जिव्हाळ्याचा संबंध होता. शालेय जीवनात अभ्यासासाठी लागणारी शांतता व एकाग्रता मला हिच्या सान्निध्यात लाभत असे. माझ्या प्रत्येक परिक्षेच्या पूर्वतयारीची साक्षीदार म्हणजे ही ताटली होय. हिच्या संगतीत राहिल्यामुळे मी नेहमीच उच्चतम श्रेणीत उत्तीर्ण होत गेली.
या जिन्याच्या वर अजून एक उघडा जिना होता व तशीच जिन्याची ताटली होती. त्याचा काय उद्देश होता माहित नाही पण फक्त आमच्या धाब्यावर असा जिना होता. त्यामुळे तिथे उभे राहिल्यावर 'आज मै उपर' ही भावना मनात असायची. ह्या ताटलीत आम्हा बच्चे कंपनीचा गप्पांचा फड रंगत असे. याच्या दोन्ही बाजूच्या उतरत्या भिंतींचा उपयोग आम्ही घसरगुंडी म्हणून करत असू. त्याच्या खडबडीत पृष्ठभागामुळे प्रसंगी आमचे कपडेही फाटत.
उन्हाळ्याच्या सुटीत आम्हा मुलांना धाब्याइतकी प्रिय जागा दुसरी कोणतीही नव्हती. मे महिन्याच्या सुट्टीतच घरात बेगमी पदार्थ तयार करण्याची धांदल असे. वडे-पापड, कुरडाया म्हणजे आामच्यासाठी खास पर्वणीच असे. किती किती प्रकारचे वडे, पापड व कुरडाया होत असे त्याची गणतीच न केलेली बरी. गव्हाचे, बाजरीचे, मठा-मुगाचे वडे व पानेपापड सुकविण्यासाठी धोतरावर घालत. संध्याकाळी आई- काकूंच्या सान्निध्यात वडे-पापड गोळा करण्याचे काम पार पडत असे. वाळलेले वडे-पापड धोतरापासून सुटे करणे सोपे नसायचे. अशावेळी धोतर उलटे करून त्यावर पाण्याचा सपका मारत असू. धोतर भिजल्यावर वडे-पापड धोतरापासून सहज विलग होत असे. हे ओलसर वडे, पापड खाण्याची मजा काही औरच होती. एकमेकांना खेटून असलेल्या घरांमुळे शेजारच्या धाब्यावर कोणते पापड वाळत घातले हे सहज दिसायचे.
ह्या दिवसांत यमुनाबाई नावाची बाई आमच्याकडे रोजाने काम करायची. तिच्या देखरेखीखाली नागली (नाचणी), बाजरी, ज्वारी व चिकनीचे पायली पायली पीठाचे पापड होत असत. पीठ घेरून, त्याच्या लाट्या करून, त्याचे पापड लाटून डालक्यावर टाकत. ते पापड उन्हात टाकण्याची जबाबदारी आम्हा बच्चे कंपनीची असे. ती आम्ही आनंदाने पार पाडत असू. सकाळी ऊन वाढण्याच्या आत गव्हाच्या चिकाच्या कुरडाया धाब्यावर घातल्या जात. कुरडायांचा चीक आमच्यासाठी जीव की प्राण असे.
याशिवाय उपवासासाठी लागणाऱ्या साबुदाणा-भगरीच्या कुरडाया, बटाट्याचे पापड, वेफर्स, किस खाण्याची अगदी रेलचेल असे.
आताच्या आया बेगमीचे पदार्थ विकतच आणणे पसंत करतात, त्यामुळे आजची पिढी या सुखाला वंचित झाल्याचे पाहून खेद वाटतो.
दुपारच्या वेळी घरातली वडिल मंडळी वामकुक्षी घेत असताना आम्हा मुलांचा मुक्काम धाब्यावरच्या सान्यात असे. साने म्हणजे लांबलचक घरांमध्ये प्रकाश येण्यासाठी छताला केलेली खिडकी म्हणजेच झरोका. त्यातून पाऊस येऊ नये म्हणून त्यावर कायमस्वरूपी जरा उंचावर पत्र्याचे आच्छादन केलेले मधल्या घरात एक मोठे साने होते. त्यातल्या गजांवर आम्ही गोधडी घालून भातुकलीचा डाव मांडत असू. त्यामुळे मधल्याघरात अंधार होत असे. अशा वेळी आम्हाला तिथून हाकलण्यासाठी वडिल व काका मंडळी खालून काठ्या टोचत. ते आठवले की अजूनही नकळत ओठांवर हसू उमटतंय.
संध्याकाळ झाली की पुन्हा आम्हा मुलांचा मोर्चा धाब्यावर वळत असे. माझ्या दोघं भावांना पतंग उडवण्याची भारी हौस होती. त्यासाठी लागणारे वेगवेगळ्या रंगांचे पतंग, मांजा, चक्री... बाप रे बाप! अगदी धमाल. त्या पतंगांचा ताव तपासून त्याला सुत्रुंग बांधायचा. सुत्रुंग बांधणे हे येरा गबाळ्याचे काम नव्हते. त्यात भावांनी मास्टरकी मिळवली होती असे म्हणणे वावगे होणार नाही. पतंगाने गोता खाऊ नये म्हणून त्याला शेपूट बांधली जाई. त्यासाठी कापडाच्या चिंध्या शोधून आणण्याची जबाबदारी माझी असे. पतंग फाटल्यावर त्याला जुन्या पतंगाचा कागद खळीच्या साहाय्याने चिकटवून दुरुस्त केले जाई. भावांच्या मागे हातात चक्री धरून, ढील देताना, काटाकाटीची मजा बघण्यात किती आनंद होता ते काय वर्णू ! (आमच्या कॅनडाच्या अण्णाकाकांनी तिथून एक फुलपाखराच्या आकाराची पतंग आणल्याचे आठवते. पण देसी पतंगीसारखी ती काही उडली नाही.) पतंग उडवतांना गल्लीतली दोन चार मुलेही आमच्यासोबत असत. या सर्व उडवाउडवीच्या प्रकरणात आमची धाब्यावर पळापळ होत असे. त्यामुळे आजी-आजोबांचा फार ओरडा खावा लागत असे. पावसाळ्यात घरात गळते ही त्यांची तक्रार असे. धाबे गळू नये म्हणून त्याचीही खास काळजी घेतली जात असे. लाकडाच्या पटाईवर खाऱ्या मातीचा थर दिला जाई. प्रत्येक पावसाळ्याअगोदर दाराशी खाऱ्या मातीच्या बैलगाड्या भरून येत. चार-पाच गडी-माणसे तगारी भरून धाब्यावर ती माती वाहून नेत. पहिली माती काढून नवीन माती पसरवली जाई. आज विचार केला तर मनात प्रश्न उठतो असा कोणता गुणधर्म असावा त्या खाऱ्या मातीचा की पावसाचे पाणी शोषून न घेता त्याचा व्यवस्थित निचरा होत असे. पाणी धाब्यावर न साचता पंढाळातून अंगणात बाहेर टाकले जाई. अर्थात त्यासाठी विचारपूर्वक ढाळ (उतार) दिली जाई.
उन्हाळ्यात घरात प्रचंड उकाडा होत असे. अशावेळी आमचा सर्वांचा बिछाना धाब्यावर घातला जाई. चंद्राच्या शीत प्रकाशात वडिलधाऱ्यांकडून उत्तरेचा ध्रुव तारा, सप्तर्षी, चोरखाटलं (मृगनक्षत्र) अशा अनेक ग्रह ताऱ्यांची माहिती घेत, भुता-खेताच्या गोष्टी ऐकत थंडगार हवेत केव्हा डोळा लागायचा ते कळतही नसे.
सकाळी जाग यायची ती सूर्यदेवाच्या सोनेरी उबदार बाहूतच. आणि नवचैतन्याने भरलेला दिवस समोर दिसे.
अशाप्रकारे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आमचा दिवस या धाब्याच्या कुशीतच जात असे.
आता मागे फिरून बघतांना लक्षात येते
'गेले ते दिन गेले'.
वंदना लोखंडे
---------------------------------------
आज सांगितले ते छान
उत्तर द्याहटवा😊🙏
हटवाया लेखातून त्या दिवसांचे चलचित्र झपकन डोळ्या समोरून गेले. लहान सहान गोष्टींतून जो आनंद मिळायचा ती अनुभूती प्रत्ययास आली. असेच लिहीत रहा व आनंद देत रहा.
उत्तर द्याहटवाधन्यवाद मनीष 😊🙏
हटवाखूप छान आठवणी
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवाअप्रतिम. वंदू तुझी ओघवती वाणीने सर्व जुन्या आठवणींना उजाळा दिला.
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद 😊🙏
हटवावंदना,
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर हुबेहूब चित्र तू रंगवले आहेस मला देखील ते वाचतांना परत एकदा त्या सुवर्ण दिवसांचे मोर पीसाचा हळुवार स्पर्श,
मी पण जे लहानपणी अनुभवले आनंद घेतला त्या सर्व गोष्टींना आणि प्रसंगांना उजाळा दिलास अत्यंत छान शब्दांकन केले👍. तुझ्या आणि माझ्या बालपणात खूप साम्य आहे.तू अशीच लिहित जा आणि गत गोष्टींना उजाळा देत राहा.👌🌹
वंदना
हटवाआपण नशिबवान आहोत, जुने दिवस आपण अनुभवले, तुझया या लिखनामुले आठवनी ज।ग्या झाल्या.
भाषा छान आहे.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
हटवाखूप छान मांडल्या आहेस आठवणी.
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद 😊
हटवाखूप छान लिहिले आहेस वंदना..
उत्तर द्याहटवातुझी भाषा... वर्णन करण्याची कला..
साक्षात सर्व प्रसंग डोळ्यासमोर येतात..
GREAT..
Ranjana.. Lodha
खूप खूप धन्यवाद भाभी 😊🙏
हटवाExcellent!! Fortunately we cousins have also experienced most of these things and it certainly bought a smile on my face.
उत्तर द्याहटवा
हटवाThanks dear 😘