स्मृती पाखरे ८ : चूलमाय
हो चूलमायच ती.
पोटात जाळ घेऊन लेकरांसाठी भाकरी भाजते तिला मायच म्हणतात ना. किती कोंडी करतोय ना तिची आपण ! तिच्या तिन्ही बाजू बंद करून एकुलत्या एक उघड्या बाजूत जळती लाकडे घालून तिचे तोंड बंद करतो. आणि मग तिच्यातल्या धगधगत्या जाळावर आपण आपली भाकरी भाजून घेतो. आणि हे कर्मही एका मायलाच करावे लागते, नाही का?
मला अजूनही आठवते, आमच्या स्वयंपाक घरातील एका कोपऱ्यात जराशा उंचवट्यावर मांडलेली चूल आणि त्या चुलीच्या कुशीत असलेली छोटीशी उलचूल (शेगडी). सकाळी दिवस उगवण्याच्या आधीच हिच्या पोटातला शांत झालेला निखारा व त्याची राख काढून तिला शुचिर्भूत करण्याचे काम घरातील गृहिणी करत असे. ठराविक पांढर्या मातीच्या पाण्याचा बोळा तिच्यावर फिरवून घेत असत म्हणजे चूल सारवली जात असे. त्यानंतर घरातली गृहिणी शुचिर्भूत होऊन तिला हळद-कुंकू लावून पूजा करत असे व तिच्या पुढ्यात छोटीशी रांगोळीही काढे. त्यानंतर तिच्या पोटात रॉकेलमध्ये भिजवलेल्या गवरीचे खांड ठेवत असे. ते पेटवून त्यावर दोन चार लाकडे रचत असे. लाकडं रसरसून पेटली म्हणजे त्यावर चहाचं आधण ठेवलं जाई. घरात दहा-पंधरा माणसे, त्याबरोबर दोन चार गडी. यांच्या चहापाण्याबरोबर लहानग्याचं दूध-पाणी होत असे.
सकाळचं चहापाणी आटोपलं म्हणजे दुपारच्या जेवणाची तयारी सुरू होई. तेव्हा आतासारखा कुकर नसायचा. त्यामुळे सर्वांत आधी वरणाच्या डाळीसाठी आधण ठेवलं जाई. डाळ शिजत आली की तिची रवानगी चुलीच्या कुशीतल्या शेगडीवर होई. तिथे मंद आचेवर डाळ मऊ होत असे. त्यानंतर भाताचे आधण व भाजी केली जात असे. पापड भाजण्यासाठी चुलीतला थोडासा विस्तव बाहेर काढला जाई. त्यानंतर पोळ्या-भाकरी करण्यासाठी तवा तापत ठेवला जाई. पोळ्या भाकरी करणे एकट्या स्त्रीचे काम नसायचे. मदतीला कोणीतरी असायचेच. कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त गडी माणसांच्या भाकरी तर होतच, पण शेतातल्या कुत्र्यांसाठी सुद्धा भाकरी कराव्या लागत. शेवटी शेतीचे खरे राखणदार तेच तर होते. आम्ही मुले आईजवळ चुलीच्या उंचवट्यावर ताट ठेवून गरमागरम जेवणाचा आस्वाद घेत असू.
चुलीत घालायची लाकडे प्रत्येक वेळी कोरडी असतीलच असे नाही. ओली लाकडे असतील तर बिचाऱ्या स्वयंपाक करणारीचा जीव मेटाकुटीला येत असे. फुंकणीने फुंकर घालून घालून श्वास तर फुलायचाच पण त्याचबरोबर होणार्या धुराचा डोळ्यांना प्रचंड त्रासही होत असे. धूर बाहेर जाण्यासाठी छताला साने असले, तरीही डोळ्यातून पाणी गळायचे. कैक वेळा त्या पाण्यात मायमाऊलीच्या काळजातील दुःखाचे कढही लपवले जात असत.
घरात आई, आजीबरोबर दोन-तीन काकू असत. मला आठवतं त्यांनी कामे वाटून घेतली होती. आज दोघींनी स्वयंपाक केला तर दुसर्या दिवशी त्या दोघी केर-सारवण व धुणीभांडी करत असत. आजच्यासारखी फरशी वगैरे नसायची घरात. रोज मधलं घर व मागचं घर शेणाने सारवले जाई. शेणाने घर सारवणं ही एक कलाच होती. गाईच्या शेणाचा एक गोळा घेऊन त्यावर थोडे पाणी शिंपून आडवा हात फिरवून घर सारवले जाई. तळहाताने सारवलेल्या घरात एकाखाली एक असे अर्धगोलाकार पट्टे तयार होत व ते खूप आकर्षक दिसे. आमच्या बैठकीत लाल कोबा व स्वयंपाक घरात शहाबादी फरशी बसवली होती.
घरातल्या स्त्रिया दुपारच्या दोन-अडीच वाजेपर्यंत स्वयंपाकच करत असत. त्यानंतर त्यांचे जेवण होई. तोपर्यंत बिचाऱ्या सकाळच्या कपभर चहाच्या पाण्यावरच राहत. घरातल्या स्त्रियांच्या पोटात दोन घास पडत तेव्हा कुठे या चूलमायच्या पोटात थोडी शांती नांदे.
स्त्रियांनी थोडी वामकुक्षी घेतल्यानंतर पुन्हा दुपारच्या चहासाठी चुलीच्या पोटात लाकडं ढकलली जात. चहापान आटोपले की लगेच रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागत. बिचारी चूलमाय. तिला थोडीपण विश्रांती मिळत नसे. स्वतः जळत राहून इतरांच्या पोटातील जाळ शांत करण्याचा तिने जणू वसाच घेतला होता.
रात्रीच्या जेवणानंतर आजोबांसाठी खास बाजरीचा घाटा होई. सर्व कुटुंबाचे हे आवडते पेय. गरम गरम घाट्याचा सगळेच जण आस्वाद घेत. एव्हाना रात्रीचे दहा वाजलेले असायचे. मग घरातील गृहिणी हळूवार हाताने चुलीच्या पोटातील लाकडे बाहेर काढून पाणी टाकून विस्तव विझवित असे. अस्तनीतल्या बाळ-निखाऱ्यांना जोजवत चूलमाय उद्या सकाळी पुन्हा पोटात जाळ घ्यायचाच आहे ह्या विचारात निद्राधीन होत असे.
काळाच्या ओघात हिचे रूप बदलले पण स्वभाव तोच राहिला, पोटात जाळ घेऊन इतरांसाठी भाकरी भाजण्याचा. केरोसिनवर चालणाऱ्या स्टोव्हनंतर एल.पी.जी. गॅस आला. आतातर झट की पट अन्न शिजवणारे मायक्रोवेव्ह, इन्स्टापॉट सारखी विद्युत उपकरणेही मी स्वयंपाकासाठी वापरते. धुराची समस्या नाही व वेळेचीही बचत. परंतु मनात कुठेतरी त्या चुलीवरच्या स्वयंपाकाची चव अजूनही रेंगाळत आहे. त्यामुळे सुटीत कुठे आडवळणाच्या गावात भटकंतीस गेलो तर तिथे चुलीवरची गरमागरम भाकरी, पिठलं व विस्तवावर भाजलेल्या मिरचीचा ठेचा कुठे मिळेल याचा शोध घेत असतो.
अशी ही चूलमाय कधीही न विसरण्याजोगी. मुलीच्या लग्नात पहिली वऱ्हाडीण म्हणून तिलाच घेऊन आले. तिची पूजा-अर्चा केली. पिवळे वस्त्र देऊन किचन ओट्यावर रोजच्या गॅसच्या शेगडी शेजारी तिला सन्मानाने बसवले. फक्त देखरेखीसाठी. वडिलधारी माणसांचे शुभप्रसंगी आशीर्वाद हवेच ना.
वंदना लोखंडे
---------------------------------------
सुंदर पोस्ट! बालपणीच्या गावाकडील अनेक आठवणी जाग्या झाल्या.
उत्तर द्याहटवाधन्यवाद प्रमोददादा 🙏
हटवाअतिशय सुंदर, हळवे लेखन
उत्तर द्याहटवाधन्यवाद प्राजक्ता 🙏
हटवाआता परत चुलीवरची भाकरी ,चुलावरचे मटन या गोष्टींना महत्व यैत आहे. मला माझे बालपण व चुलीसोबत बसलेली आई आठवली. वंदनाताई जुन्या आठवणींना छान उजाळा
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद 🙏
हटवावंदना,
उत्तर द्याहटवाचुलीला मायची उपमा देऊन तू केलेलं वर्णन अप्रतिम आहे. चुली चे वर्णन या दृष्टीने मी कधीही केले नव्हते आज मला त्यात सुंदर कल्पना रेखाटलेली दिसलली.खरं सांगू माझ्या हृदयासती अतिशय भीडली. 💐💐💐
मनापासून धन्यवाद 😊🙏
हटवालेख वाचून पोटात कालवाकालव झाली..
उत्तर द्याहटवानिःशब्द 😊🙏
हटवाछानच वंदना! माझ्याघरी चूल नव्हती वा मला चुलीचे एवढे जवळून दर्शनही नव्हते झाले ते तुझ्यामुळे मिळाले. अगदी खरं सांगू का, मला माझ्या एका कथेसाठी चुलीबद्दल माहिती हवी होती पण तू तर अनुभवच दिलायेस इतकं छान वर्णन! भारी!👌
उत्तर द्याहटवाअरे वा!
हटवाकथा वाचायला मिळेल आता 😊
धन्यवाद गं 🙏
Very nice mumma 😘 I agree that the taste cannot be met with the electronic development. But hats off to the ladies of that era who spent almost their entire life in kitchen working on the chulmaay 🙏🏼
उत्तर द्याहटवाYes Indeed!
हटवाThanks dear
वंदना खूप सुंदर लिखाण वाचताना बालपणात हरवून गेली सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद 😊🙏
हटवाआता ह्या फक्त आठवणी पण काही ठिकाणी खास चुलीवरचे जेवण म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटते.
हटवाहोय. तसंच होतं
हटवा