स्मृतीपाखरे 10 : वारसा तांब्या-पितळाचा

माझ्या आई-वडिलांना वेगळी चूल मांडावी लागली तेव्हा आमच्या आजोबांनी एक मोठी तांब्याची डेग दिली होती. हेतू हा की ती मोडून आम्ही स्वयंपाकासाठी लागणारी भांडी खरेदी करायची. पण खरं सांगू का तसे करण्याचा अविचार आम्ही कोणीच केला नाही. ती प्रचंड मोठी डेग तेव्हा आम्हाला पाणी भरण्यासाठी उपयोगी पडली आणि खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी ठरली. पाण्याने भरली असली तरी तिला महिन्या - दोन महिन्यातून बाहेरून चिंच मीठ लावून घासून-पुसून लख्ख ठेवत असू. हे काम एकाच बैठकीत करणे अशक्य असे. या डेगबरोबर चुलीवर पाणी तापविण्यासाठी तांब्याचा सुबक हंडा होता, त्याला उचलण्यासाठी दोन कान (कड्या) देखील होत्या. पिण्याचं पाणी भरण्यासाठी तांब्याचा गुंडा होता आणि आंघोळीसाठी सुंदर घाटाचे गंगाळ. प्रमाणित भाषेत 'घंगाळ' म्हणत असले तरी मला 'गंगाळ' शब्द जास्त उचित वाटतो.  कारण त्यामुळे प्रत्यक्ष गंगेत न्हायल्याइतके स्नान पवित्र होई.
आईची रामावर अतोनात श्रद्धा असल्यामुळे वाटणीत आई-दादांच्या हिश्श्याला घराऐवजी आमच्या पणजीने बांधलेले राममंदिर आले. त्यावेळी नाममात्र शुल्क घेऊन साखरपुडा, विवाह, बारसे अशा मंगल प्रसंगासाठी मंदिर उपलब्ध करून दिले जात असे. त्याबरोबर स्वयंपाकासाठी व वाढण्यासाठी लागणारी तांब्या-पितळीची भांडीही देत असू. ही भांडी आमच्या पणजीच्या काळातील होती. त्यातल्या काही भांड्यावर मोडी लिपीत नाव लिहिलेले होते. ह्यांत पितळी डेग, पितळी तपेले, तांब्याची डेग, तीन-चार बोघणे (पातेले), पितळी मोठा पळ, लोखंडी खुरपी (उलथणे), तूप वाढण्यासाठी सुरेख पितळी वाढण्या, पातळभाज्या वाढण्यासाठी पितळी सारपात्र, मोठमोठ्या तीन चार पितळी पराती व एक तांब्याची परातही होती. अर्थात ही सर्व भांडी ठेवण्यासाठी एक स्वतंत्र खोलीही होती.
साधारण १९७८ च्या सुमारास वडील प. पू. पांडुरंगशास्त्री आठवलेंच्या स्वाध्याय कार्यात जोडले गेले. तेव्हा वडिलांना खऱ्या अर्थाने मंदिराची संकल्पना समजली. मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांनी लग्नकार्यासाठी मंदिर देणे बंद केले. अडचणीच्या काळात थोड्या फार प्रमाणात उत्पन्न मिळवून देणारी बाजू त्यांनी अशाप्रकारे स्वतःहून बंद केली. त्यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचा मला आजही अभिमान वाटतो. 
मंदिर देणे बंद केले तरी विनाशुल्क लोकांना भांडी देणे सुरूच होते. हळूहळू लोकांना हिंडालिअमची भांडी उपलब्ध झाल्यामुळे लोकांनी या भांड्यांकडे पाठ फिरवली असे म्हणायला हरकत नाही. तांब्यापितळीची भांडी स्वच्छ करणे जरा मेहनतीचे काम असायचे.
तांब्यापितळीच्या भांड्यांना नियमित कल्हई करणे आवश्यक असे. त्याकाळी भांड्यांना कल्हई करताना बघणे हा आम्हा मुलांसाठी एक आनंददायी सोहळाच असे. कल्हईवाला अंगणातील माती उकरून त्यात एक छोटीशी लोखंडी नळी बसवत असे. त्याचे हॅन्डल फिरवल्याने त्यात निर्माण होणाऱ्या हवेने काळाकुळकुळीत कोळसा लालबुंद होण्यास मदत होई. त्यावर पितळीचे भांडे तापवून त्यात नवसागरची पूड टाकून कापसाच्या बोळ्याने भांडं स्वच्छ करीत असे. तापलेल्या भांड्यावर कथिलाची तार अलगद फिरवून पुन्हा नवसागरात बुडवलेल्या कापसाने स्वच्छ केल्यावर कळकट भांड्याचा मुखडा अगदी चांदीसारखा चमचम करी. ते बघून नकळत चेहऱ्यावर हास्य तरळत असे. हे तापलेले भांडे पाण्यात बुडवल्यावर चुर्र असा आवाज होई. हे कल्हई केलेले भांडे नंतर बेसनपीठाने स्वच्छ करून स्वयंपाकाला वापरत असू. यांत स्वयंपाक करताना गृहिणीलाही आनंद होई. 
घराचे नूतनीकरण करताना ही भांडी कुठे ठेवायची हा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा  मोठ्या बहिणीने व भावाने जिन्याखालच्या जागेत एक काचेचे कपाट करून ही भांडी त्यात ठेवण्याचा निर्णय घेतला. आज ती भांडी दिवाणखान्याची शान वाढवत आहेत. त्या निमित्ताने पूर्वजांचा वारसा पण सांभाळला गेल्याचे समाधान आहे.
जेवणासाठी पितळीचे ताट, वाट्या, तांब्या ही भांडी तर कधीच कालबाह्य झाली. आधुनिकीकरणात त्यांची जागा स्टेनलेस स्टीलने घेतली. स्वयंपाकासाठी पितळी पातेले न वापरता हिण्डालिअमच्या, नॉनस्टिक कढया वापरू लागलो, पण हळूहळू त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसू लागल्याने पुन्हा एकदा तांब्या पितळाची भांडी वापरण्याचा ट्रेंड आला. परंतु भांड्यांच्या वाढत्या किंमती व कल्हईसाठी अव्वाच्या सव्वा मोजावा लागणारा दाम हे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे आहे. त्यामुळे ही भांडी केवळ श्रीमंतांच्या घराची शान वाढवताना दिसत आहेत.
आजकाल पंचतारांकित हॉटेलमध्ये सुद्धा तांब्याच्या आकर्षक भांड्यांमध्ये अन्न सर्व्ह केले जाते. मुंबई विमानतळावर सुद्धा ह्या आकर्षक भांड्यांचा स्टॉल बघायला मिळाला, परंतु किंमती बघून हौसेला मुरड घालावी लागली.
या भांड्यांचे मला लहानपणापासून आकर्षण होते. आईच्या सोळा सोमवारच्या पुजेला लागणारी सर्व भांडी मी रविवारी घासून ठेवत असे. हे करताना मला खूप आनंद मिळत होता. ह्याच छंदापोटी आजही मी माझ्या घरातला एक कोपरा या भांड्यांसाठी ठेवला आहे. ज्यात देवपूजेसाठीची तांब्या-पितळीची छोट्याशा गंधाच्या ताटलीपासून ते मोठ्या कळशीपर्यंत सर्व भांडी रचून ठेवली आहेत. यांत आई-वडिलांनी, सासू-सासऱ्यांनी व सुहृदांनी धार्मिक व काही नैमित्तिक कारणाने दिलेली भांडी आहेत. ती त्यांची आठवण ताजी करतात. काशी, बिठूर, नासिक, पंढरपूर या पवित्र स्थळांहून आणलेली भांडी देवपूजेचा आनंद द्विगुणित करतात. 
दिवाळीच्या कामात माझी मदतनीस 'रेणुका' खूप मनापासून ही भांडी घासून पुसून देते. 
या घासलेल्या भांड्यांचा रंग काय वर्णावा! गुलबट रंगाचे तांबे व सोनेरी वर्णाचे पितळ पाहून डोळ्यांबरोबर मनही सतेज होते.
काही वर्षापूर्वी मुलीच्या भातुकलीत खास पारोळ्याहून तांब्याचे हंडा, गुंडा, बादली, गंगाळ मागवले होतेे. भातुकलीचा खेळ खेळत मुलींनीही ही आवड जोपासली. 
आता नातीला पितळाची भातुकली भेट देऊन तिच्यातही हा वारसा रुजवणार आहे. 

वंदना लोखंडे
०६/०६/२०२१
--------------------------------------

टिप्पण्या

  1. वंदू तुझा प्रत्येक लेख आठवणीना उजाळा देतो आणि प्रत्यक्ष डोळ्यासमोर चित्र उभे करतो.

    उत्तर द्याहटवा
  2. भांडी मस्त मांडली आहेत. त्यांचा इतिहासही आवडला. माळ्यावर ठेवलेली असतात. तू मांडून समोर ठेवलीत

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर लिखाण अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहते. अप्रतिम 👌,😊👍

    उत्तर द्याहटवा
  4. खूप सुंदर लिखाण अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहते. अप्रतिम 👌,😊👍

    उत्तर द्या

    उत्तर द्याहटवा
  5. माझ्या आजी कडेही तांब्या पितळी भांड्यांचा एकात एक असे पस्तीस भांडे असा सेट होता.त्यातील सगळ्यात मोठे भांडे म्हणजे त्यात दोन तीन लहान मुले आरामत डुंबून आंघोळ करू शकत होते.

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान लेख.. जुन्या आठवणी ताज्या झाल्या...👌👌

    उत्तर द्याहटवा
  7. छान वाटले. मला आमच्या भडगाव च्या घराची आठवण आली.

    उत्तर द्याहटवा
  8. माहेरची आणि तुमच्या घरातली दोन्ही भांड्यांचे सेट प्रेमात पडावे असेच. अशी भांडी वापरायला खुप आवडतात पण आता कल्हई वाला मिळत नाही.‌कल्हईवाले आता लुप्त होत चाललेत.
    आमच्या गल्लीत बाबू कल्हईवाला यायचा. तो कल्हई करुन गेला की तेथे आम्हाला छोटे छोटे बारीक तुकडे मिळायचे. त्याला आम्ही चांदिचे मणी म्हणत असु.
    तुझ्यि वडिलांच्या सुयोग्य निर्णयासाठी आदरपुर्वक नमस्कार. 🙏🏼
    राजश्री सोले

    उत्तर द्याहटवा
  9. खुपच सुंदर
    आमच्याकडेही बरीच अशी जुनी भांडी आहेत मी नेहमी सासूबाईंना म्हणते आपण ही अडचण कमी करू..
    पण आज तुमचा लेख वाचून समजले की ही अमूल्य ठेव आहे
    मी ही आता तुमच्या सारखे कपाट बनवून घेते ह्यासाठी...
    खूपच छान

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मी लेख लिहिल्याचे सार्थक झाले, असे वाटते.
      मनापासून धन्यवाद.
      नक्की जपा तुम्ही तुमचा वारसा 😊

      हटवा
  10. खूपच छान
    आमच्याकडेही अशी बरीच जुनी भांडी आहेत मी नेहमी सासूबाईंना म्हणते आपण ही अडचण कमी करू पण आज समजले की ही अमूल्य ठेव एक सुंदर आठवण म्हणूनही जपता येऊ शकते
    खूपच छान...

    उत्तर द्याहटवा
  11. तुझे हे लेक्स महित्पूर्वक तर आहेतच पण त्यासोबत तू जी परंपरा जोपासत आहे त्याचीही प्रेरणा देणारे आहे...अभिनंदन😘

    उत्तर द्याहटवा
  12. वंदना आपण फक्त मनातच ह्या भांड्यांचा ठेवा जपलेला असतो.. आणि भांडी मात्र अडगळीत ठेवतो. पण तुझी कृती आणि विचार दोन्हीही समांतर चालले आहे..फक्त या लेख पूरते नव्हे..सर्वच लेखांबाबत माझे म्हणणे आहे..याचे पुस्तकरूप झालेले बघायला नक्की आवडेल

    श्रद्धा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. श्रद्धा, मनापासून आभार गं.
      तुझ्यासारखे शुभेच्छुक पाठीशी असल्यावर सहज साध्य होईल.
      😘

      हटवा
  13. Mastch lekha. Mala hee juni bhandi khup awadtat japayla. Sunder rachli ahet tu bhandi

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझी विठाई

स्मृती पाखरे ९ : उखळ -मुसळ

माझी वारी