पंढरपूर - विठूदर्शन

'सुखाचे आगर भक्तांचे माहेर'  
'ओढ लागे जीवा तेचि पंढरपूर'

असे हे पंढरपूर. या पंढरपूरला जाण्याचा मला चार वेळा योग आला.
पहिल्यांदा गेले सासू-सासऱ्यांसोबत. दुसर्‍यांदा गेले आई-वडिलांसोबत. दोन्ही वेळा त्यांना काही त्रास होऊ नये या काळजीतच माझे दर्शन पार पडले. परत दर्शनाचा योग येईल अशी कधी अपेक्षाही धरली नव्हती. परंतु म्हणतात ना एखादी व्यक्ती जीवनात येण्याचा किंवा देवदर्शन होण्याचा हा ही एक योग असावा लागतो.
त्याचे असे झाले.  माझी मोठी बहिण कल्पनाताई. तिने चातुर्मासात लहानपणी मंदिरात ऐकलेला 'भक्तिविजय' हा ग्रंथ स्वतः वाचायला घेतला. त्यात तिला नामदेव, चोखोबा, दामाजीपंत, कान्होपात्रा जनाबाई अशा अनेक संतांचा परिचय झाला. ह्या सर्वांचे चित्त ज्याच्या चरणी लागले होते त्या पांडुरंगाच्या दर्शनाची तिला ओढ लागली. एके दिवशी तिने फर्मान सोडले, "वंदना, आपल्याला पंढरपूरला जायचे आहे, तेही नवरात्रात." कारण दसरा-दिवाळीच्या दिवशी ह्या सावळ्या विठ्ठलाला अनेक सुवर्ण व रत्नजडित अलंकारांनी सजवले जाते. तेव्हाचं त्याचं साजिरे-गोजिरे रूप खूप छान असते, असे बऱ्याच जणांकडून ऐकून होते.
दर्शनासाठी दोन-चार तास उभे राहावे लागणार ह्या भीतीपोटी ऑनलाईन पास काढता येईल का हे बघितले. परंतु त्यात अडचण आली. आम्ही दुसरा मार्ग शोधला. आमचे 'हे' सरकारी खात्यात असल्याचा फायदा झाला. दर्शनासाठी घेऊन जायला आम्हाला एक वाटाड्या मिळाला. अगदी थोड्याच वेळात आम्ही  गाभाऱ्यात पोहोचलो. पुढे-मागे प्रचंड भक्तगण  शिस्तीत उभे होते. 'जय जय राम कृष्ण हरी', 'विठ्ठल-विठ्ठल', 'ज्ञानबा-तुकाराम' असा गजर कानात घुमू लागला. समोरच्या गरुड खांबाला भक्तगण कडकडून मिठी मारत होते. चांदीच्या वेष्टनातील गरुड खांबाबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. परंतु बरोबरच्या वृद्ध भाविकांनी आम्हाला खांबाला मिठी घालण्याचा आग्रह केला. आम्हीही गरुड खांबाची भेट घेऊन तसेच पुढे गेलो. गाभार्‍याच्या चौकटीसमोर आलो आणि खरोखर त्या सावळ्या विठ्ठलाचे रूप बघून काय आनंद झाला सांगू. दोन्ही हात आपोआप जोडले गेले व नतमस्तक झाले. त्याच आनंदात गाभार्‍याचा उंबरठा ओलांडून आत गेले. माऊलीच्या चरणाशी येताच त्या माऊलीच्या चरणावर स्वतःला झोकून दिले. माझ्या माहितीप्रमाणे असे एकच देवस्थान आहे की जेथे देवाच्या चरणाला स्पर्श करून दर्शन घेता येते. बहुधा म्हणूनच दर्शनासाठी एवढा वेळ लागतो. विठूमाऊलीचा पदस्पर्श करण्याचे भाग्य लाभले. नजर वर उचलून ते भगवंताचे रूप डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला. खरंच काय जादू होती त्या काळ्या पाषाणाच्या मूर्तीत! मंत्रमुग्ध होणे म्हणजे काय हे त्या क्षणी मी अनुभवत होते. ड्युटीवर असलेल्या पोलिसांचा पुढे व्हा, पुढे व्हा असा घोषा चाललेला होता तरीही गाभाऱ्याच्या एका कोपऱ्यात उभे राहून त्या माऊलीला आम्ही दोघी बहिणी न्याहाळत होतो. मनाचे समाधान होत नव्हते, पाय तिथेच रेंगाळत होते. तशाच अवस्थेत आम्ही तिथून बाहेर पडलो. ज्याने हे दर्शन घडवले त्या वाटाड्याचे मनःपूर्वक आभार मानले व आम्ही धर्मशाळेकडे मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ झालो.
----------------
पण ज्याच्या साठी केला होता अट्टाहास....
ते साध्य कुठे झाले होते? 
विविध अलंकारांनी शृंगारलेली विठू माऊली पाहायलाच मिळाली नव्हती. आजूबाजूच्या भक्तांना विचारणा केली असता, संध्याकाळी सहानंतर ते रूप पाहायला मिळेल असे सांगितले. ललितापंचमीचा दिवस होता तो. मग आम्ही त्या दरम्यान चंद्रभागेच्या तीरावर जाऊन यायचे ठरवले. त्या वर्षी प्रचंड पाऊस झालेला असल्यामुळे धरणाचे पाणी सोडले होते. चंद्रभागा दुथडी भरून वाहत होती. भक्त पुंडलिकाचे मंदिर अर्धेअधिक पाण्यात बुडाले होते. मागच्या वेळी आई-दादांबरोबर आले होते तेव्हा बोटीतून फेरफटका मारल्याचे आठवले. परंतु आता नौकाविहार करायला मनाई होती. चंद्रभागेच्या पवित्र धारेत पादप्रक्षालन केले.  तिची पूजा करून प्रवाहात दिवे सोडले. तिला वंदन करून तिचा निरोप घेतला. परतीच्या वाटेवरील जुन्या देवस्थानांना भेटी दिल्या. त्यानंतर शेगांव संस्थानच्या धर्मशाळेतील मुक्काम स्थळी पोहोचलो. 
साधारण सहा वाजता आमचे जवळचे नातलग एका धर्मशाळेची व्यवस्था पाहात होते. त्यांची भेट घेतली. तिथे जवळच भक्त पुंडलिकाच्या मंदिरातील मुखवटा आणून ठेवला होता, त्याचे दर्शन घेतले. मग त्यांच्यासोबत पुन्हा विठू माऊलीच्या दर्शनासाठी मंदिराची वाट धरली. यावेळी रांगेत उभे राहून दर्शन घ्यावयाचे होते. सकाळी घेतलेल्या दर्शनाची अनुभूती पुन्हा नव्याने घेण्यासाठी मन आसुसले होते. त्यामुळे बराच वेळ रांगेत उभे राहावे लागेल ही मनाची तयारी करूनच वाट चालत होतो. मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्यावर एक तात्पुरता लाकडी पूल बांधलेला मी प्रथमच पाहत होते. लाकडी जिन्याने त्या पुलावर चढून भराभरा चालू लागलो. पंढरपूरच्या चिंचोळ्या गल्लीतून हा पूल पुढे पुढे सरकत होता. त्यामुळे घराला लागून असलेल्या दोन्ही बाजूंच्या घरांमध्ये सहज डोकावता येत होते. घरे लहान असली तरी तेथील वातावरण मंगलमय होते. अनेक घरांमध्ये विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती दिसत होती. देवापुढे व तुळशीपुढे सांजेचा दिवा लावलेला दिसत होता. बरेच अंतर चालून गेल्यानंतर एका प्रवेशद्वारातून आत जाण्याची वेळ आली. तिथे सुरक्षायंत्रणेतून सामानाची व आमची तपासणी होत होती. रुक्मिणीची ओटी नारळाने भरायची असली तरी तिथे नारळ न्यायला परवानगी नाही. त्या सुरक्षा यंत्रणेतून जाण्याची वेळ आली तेव्हा अचानक प्रवेश बंद करण्यात आला. चौकशीअंती कळले, संध्याकाळची आरती व नैवेद्याची वेळ असल्यामुळे एक तास दर्शन बंद ठेवण्यात येते. सुदैवाने दोन दारांच्या मधल्या जागेत आम्ही बंदिस्त झालो होतो. तीस-चाळीस लोकांचा जथा पायऱ्यांवर बसून विठ्ठलाचे नामस्मरण, अभंग, भजने म्हणत विठ्ठलाच्या पायी आपली भक्तिसेवा रुजू करत होते. आजूबाजूला तरुण मुले, वृद्ध स्त्री-पुरुष सारेच होते. परंतु प्रत्येकजण संयमाने वागत होता. ड्युटीवरच्या पोलिसांशी थोड्याफार गप्पा झाल्या. तोपर्यंत दार उघडले गेले. उत्साहाने दारातून प्रवेश केला. दर्शनाच्या बारीतून कधी वर चढत तर कधी खाली उतरत, मुख्य मंदिर कोणते असावे याचा अंदाज घेत पुढे चाललो असतानाच मंदिराच्या आवारात येऊन पोहोचलो. मंदिराचा भार भव्य दगडी खांबांनी तोलून धरला होता. खांबावर सुरेख शिल्पे कोरलेली होती. जिना उतरून खाली आलो तिथे एका निर्जीव झाडाचा बुंधा दिसला. त्यास कान्होपात्राचे झाड समजले जाते. त्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो. उजव्या हाताला मोठ्या दानपेट्या व भिंतीत अनेक देवांच्या मूर्ती होत्या. एका काचेच्या पेटीत संत तुकारामांची गाथा ठेवलेली दिसली. नकळत तिच्यापुढे हात जोडले गेले. पुढे गरुडखांबाची भेट घेऊन गाभाऱ्याशी पोहोचलो. रजतपत्रांची दारे व भिंती लक्ष वेधून घेत होत्या. उजव्या हाताला देवाचे शेजघर होते. त्यात डोकावून विठ्ठलाच्या मूर्तीपुढे येऊन पोहोचलो. सोनेरी काठाच्या पांढर्‍या सुती वस्त्रातील शांत, प्रसन्न व तेजस्वी अशा श्यामलकांतीकडे बघतच राहिलो. कपाळावरील चंदनाचा टिळा सावळ्याचे सौंदर्य वर्धित करत होता. नखशिखांत सौम्य तेजाच्या (mat finish) सुवर्ण अलंकारांनी सजवलेल्या मूर्तीकडे पाहिल्यावर एक अभूतपूर्व शांतता मनाला लाभली. त्यात सोन्याचा मुकूट, मत्स्यकुंडलं, कौस्तुभमणी, बोरमाळ, तुळशीमाळ, मेखला, पैंजण याचा समावेश होता. फार प्राचीन काळापासूनच्या दागिन्यांनी समृद्ध असे भांडार कधीतरी दूरदर्शनवर पाहिल्याचे आठवले.
ते सात्विक रूप डोळ्यात, मनात साठवत रुक्मिणीच्या मंदिरात येऊन पोहोचलो. भरजरी वस्त्रालंकारांनी सजलेले ते गोजिरे रूप पाहून अवाक झालो. तिच्या चरणांशी जरा वेळ लीन होऊन बाहेर पडलो. 
सत्यभामा व अजून एका देवीचे (नाव आठवत नाही) दर्शन घेऊन मंदिराच्या ओट्यावर सात्विक समाधानाच्या आनंदात जरा वेळ विसावलो. तेव्हा मंदिराचे भव्य दगडी बांधकाम दृष्टीपथात आले. 
दिव्य अनुभूतीच्या आनंदात धर्मशाळेची वाट चालू लागलो. 
-------------------------------------
दुसरा दिवस 
पंढरपूरात मुक्काम करण्याचा आमचा पहिलाच प्रसंग होता. सकाळी प्रातःर्विधी आटोपून धर्मशाळेतल्या भोजनकक्षात नाश्ता करून बाहेर पडलो. आज पंढरपूरातील इतर मंदिरे पाहण्याचा मानस होता. पण त्याअगोदर पुन्हा विठाईची भेट घ्यावी असा विचार मनात घोळू लागला. रांगेत उभे राहून दर्शन घेणे शक्य नव्हते म्हणून फक्त मुखदर्शन करावे या विचारावर दोघी बहिणींचे एकमत झाले. 
मुखदर्शन करण्या अगोदर चोखोबाच्या पादुकांचे दर्शन घेतले. नामदेवाच्या पायरीशी नतमस्तक झालो. सुरक्षाव्यवस्थेकडून तपासणी झाल्यावर महाद्वारातून अात प्रवेशलो. भव्यदिव्य सभामंडप ओलांडून मंदिरात प्रवेश केला. येथून दूरवर उभ्या असलेल्या विठूमाऊलीचे फक्त मुखदर्शन घेता येते. भरगच्च तुळशीच्या हारात सजलेल्या माऊलीचे हे रूपही खूप लोभस होते. तिथेच थोडा वेळ बसून विठूच्या ठायी चित्त एकाग्र केले. मुखदर्शन घेतल्याचा हा एक फायदा झाला. 
त्यानंतर रुक्मिणीच्या मंदिरात येऊन पोहोचलो. रुक्मिणीचेही मुखदर्शन झाले. रुक्मिणीचे अतिशय गोजिरे रूप पहावयास मिळाले. केशरी वस्त्रावर नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांनी विणलेली जाळीदार चोळी अतिशय सुरेख दिसत होती. फुलांचे वस्त्र तयार करणाऱ्या कलाकाराच्या कलेचे विशेष कौतुक वाटले. त्याच आनंदात सभामंडपात येऊन पोहोचलो. तेथे भजन सप्ताह चालू होता.  संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले भजनी मंडळ ठरवून दिलेल्या वेळेत आपली भजनसेवा रुजू करत होते. त्याचाही आस्वाद घेऊन बाहेर पडलो. 
रुक्मिणी मंदिरातून बाहेर पडल्यावर महाद्वारापाशी अनपेक्षितपणे दिंडी दिसली.पंढरपूर म्हटलं म्हणजे दिंडी, वारी आलीच. दिंडी पाहताच खूप आनंद झाला. त्यात खांद्यावर ध्वजपताका व डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेले पांढरेशुभ्र पोषाखातले वारकरी टाळ, पखवाज व तानपुरा अशा सर्व वाद्यांसवे ताला-सुरात भजन गात होते.
विठू माऊली बरोबर वारकऱ्यांचे दर्शन झालं. हे महत्त्वाचं.
त्यानंतर तिथल्या बाजारात टाळ, चिपळ्या, तुळशीमाळा अशी खरेदी करून जवळपासच्या उर्वरित देवस्थानांना भेट देण्यास निघालो. 
त्यात प्रथम दिंडोरवनातल्या रुक्मिणीचे दर्शन घेतले. घरून निघताना आईने चंद्रभागेत स्नान करायला बजावून सांगितले होते, पण ते आमच्या मनात अजिबात नव्हते. परंतु ह्या मंदिरालगतचा प्रवाह खूप स्वच्छ व निर्मळ दिसला. त्यात उतरण्याचा मोह आवरला गेला नाही. सूर्याला अर्घ्यदान करून तिथून निघालो. 
कैकाडे महाराजांच्या मठात गेलो. खूप मोठा मठ आहे. त्यात अनेक देवतांच्या मुर्त्या आहेत. पण का कोण जाणे तिथे आमचे मन रमले नाही. 
अशाच पद्धतीचे मंदिर कानपूर जवळ एका ठिकाणी बघितले होते.
त्यानंतर गोपाळपुराकडे प्रस्थान केले. गोपाळपूरचे मंदिर खूप भव्यदिव्य आहे. परंतु तिथे अनेक टपर्‍या बोकाळल्या होत्या. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य झाकोळले गेल्याचे पाहून खूप वाईट वाटले. तिथे मांडलेला देवांचा बाजार पाहून खूप चिडचिड झाली. 
तिथून पुढे मंगळवेढ्याला दामाजीपंतांच्या समाधीला भेट दिली. तिथल्या मंदिरात भजन- कीर्तन चालले होते. दर्शन आटोपून पुण्याकडे प्रयाण केले.
या पंढरपूर भेटीत विठू माऊलीचे तीन वेळा दर्शन झाले त्याचदर्शनाबरोबर चंद्रभागेच्या पाण्यास भिडल्याचे समाधान मिळाले. भजन-कीर्तन, दिंडी अशा सर्वच गोष्टींचा लाभ झाला.  त्या समाधानात प्रत्येक वर्षी नवरात्रात पंढरपूरला जाऊन विठूमाऊलीची भेट घ्यायची हा मनोमन निश्चय करून घरी पोहोचलो. 

वंदना लोखंडे 
१५/०७/२०२०
--------------------------------------

टिप्पण्या

  1. विठु माऊली चे छान दर्शन झाले वंदना

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्यक्ष भेटीतून देखील अश्या प्रकारे सूक्ष्म बारकावे बघितले नसते...तर तुझ्या वर्णन रुपी भेटीतून ते झालं!! आषाढी एकादशी च्या शुभेच्छा!🙏

    उत्तर द्याहटवा
  3. *खूप सुंदर वर्णन केले आहे वंदना ताई*
    👌👌🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान ताई माऊलीचे दर्शन लाभले

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान वर्णन केले आहे ताई.. 👌👌🙏🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझी विठाई

स्मृती पाखरे ९ : उखळ -मुसळ

माझी वारी