स्मृतीपाखरे 11 : आमचं तळघर
"जास्त त्रास दिला तर कामडीच्या खोलीत टाकेन" ही धमकी ऐकतच आम्ही भावंडं लहानाचे मोठे झालोत. एकत्र कुटुंब पद्धतीत बालपण गेले. आताच्या मुलांसारखे आमचे अवास्तव लाड कधीच झाले नाहीत. कामडीच्या खोलीत जायला नको म्हणून आम्ही निमूट मोठ्यांचं ऐकून घेत असू.
ही कामडीची खोली कशी असेल हे कुतुहल तुमच्या मनात निर्माण झाले असेल ना?
आमच्याकडे मधल्याघराला लागून दोन खोल्या होत्या. एक वडा-पापडची खोली, ज्यात बेगमीच्या पदार्थांचे मोठे मोठे डबे भरलेले असत. जास्तीच्या भांड्यांची एक भलीमोठी पेटी होती. या व्यतिरिक्त आईची एक मध्यम आकाराची लोखंडी पेटी होती. त्यात तिच्या लग्नाचा गर्द जांभळा रेशमी शालू व साखरपुड्याचे फिकट निळ्या रंगाचे व गर्द निळ्या काठपदराचे रेशमी नऊवार पातळ अगदी निगुतीने कापडी बासनात गुंडाळलेले असायचे. याचबरोबर तिचा एकुलता एक दागिना म्हणजे नाकातली मोत्याची नथ. याशिवाय तिच्या ऋतुशांतीच्या वेळचे ओटीतले नारळ होते. जेव्हा मोठा मुलगा नवरदेव म्हणून घोड्यावर बसेल तेव्हा त्याच्या हातात ते नारळ देण्यासाठी तिने काळजीपूर्वक जपून ठेवले होते.
दुसरी खोली म्हणजे कामडीची खोली. या खोलीचे दार वेड्यावाकड्या कामट्यांनी बनलेले होते. ते नीट बंदही करता येत नसे. या खोलीत प्रकाशासाठी सानेही (झरोका) नव्हते. नाही म्हणायला एक अंधुकसा पिवळा प्रकाश देणारा झिरोचा बल्ब असायचा. त्या प्रकाशात ती खोली जास्तच भयावह वाटायची. या खोलीत एक भलीमोठी लाकडी पेटी होती. बैलांच्या झुली, गोंडे, घुंगुरमाळा, गळ्यात बांधायच्या घंटा अशा वस्तुंनी खच्चून भरली होती. या सगळ्या वस्तू बैलपोळ्याच्या दिवशीच बाहेर निघत. काही धान्याचे मोठे गोल डबे (जे गोडेतेलाच्या चौकोनी डब्याच्या पत्र्यापासून बनवलेले) होते.
आऽणिऽऽ एक 'बंद दरवाजा'. त्या बंद दरवाज्याच्या मागे एक खोली होती, जी कधीतरी उघडली जात असे. साधारण सात-आठ फूट लांबीची व तीन फूट रुंदीची ही खोली होती. उंची म्हणाल तर... घरातल्या जिन्याच्या खाली ही खोली होती त्यावरून तिच्या उंचीची कल्पना यायला हरकत नाही. या खोलीत प्रकाशाची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्या खोलीत जाताना कंदील हाच प्रकाशाचा एकमेव साथी असे. बरे एवढ्यावरच या खोलीची गूढता संपत नव्हती बरं का! या खोलीच्या पोटात अजून एक खोली होती. ज्याला आम्ही तळघर म्हणत असू. या तळघराचे साधारण दोन -अडीच फूटाचे प्रवेशद्वार जमिनीवर होते. या खोलीत एकदोन वेळा सफाईसाठी आमचे 'भैय्याकाका' व सालदार 'पंडितभाऊ' उतरल्याचे आठवते.
ही खोली आतून खूपच नीटनेटकी होती. या खोलीची जमीन व भिंती फरसबंदी होत्या. भिंतीत मोठमोठे कोनाडे होते. त्या कोनाड्यात पितळी हंडे पक्के बसवले होते. त्या हंड्यांमध्ये हात घालून बघायचे धाडस करणे म्हणजे... न जाणो एखादा नाग बसला असेल तर... पण तसे काही असण्याचे कारण नव्हते. कारण आम्ही आमच्या आजोबांकडून या तळघराचा इतिहास बऱ्याच वेळा ऐकला होता. हे घर पणजीने बांधलेले होते. जवळजवळ १०० फूट लांबीचे व तीन खण रुंदीचे हे घर होते. घरात ती व तिची विधवा दत्तक सून दोघीच राहत असत. सोन्या-नाण्याने या तळघरातले हंडे भरलेले होते. पुढे एकुलती एक सूनही देवाघरी गेली. चारधाम यात्रा करण्याच्या निमित्ताने पणजी घराबाहेर पडली. जाताना घराची देखभाल विश्वासाने गुमास्त्याच्या हाती सोपवली. गुमास्ता म्हणजे जमाखर्च बघणारा हिशेबनीस. चार महिन्यांनी पणजी परत आली तर सगळे तळघर सफाचट झाले होते. ज्यांच्यावर विश्वास टाकला होता त्यांनीच दगा दिला होता.
पण पणजी खूपच धडाडीची.तिने नात्यातल्या एका तरुणाला दत्तक घेतले. तो तरुण म्हणजेच माझे आजोबा. सोनेनाणे गहाळ झाल्याचा एक फायदा असा झाला की या घराची न बहरणारी वंशवेल बहरू लागली. आमच्या आजोबांना सात मुलगे व एक मुलगी. आज त्यांची पाचवी पिढी सुखाने नांदत आहे.
आमचं घराणं जुनं असूनही आमच्या आजीच्या किंवा आई-काकूंच्या अंगावर जुन्या पद्धतीचे दागिने कधी पाहायला मिळाले नाही. नंतरच्या काळात या घरातल्या मुलांनी स्वतःच्या बळावर खूप भरभराट केली. अर्थात वडिलोपार्जित काळ्या आईच्या मदतीने राबराबून मुलांनी घराण्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून घेतले.
असं म्हणतात, 'धन ज्याच्या नशिबात असतं त्यालाच ते प्राप्त होते.' ह्या घराचे नूतनीकरण करताना माझ्या मोठ्या भावाने कैक वर्षांनी या तळघरात उतरायचे धाडस केले होते. तेव्हा तळघराची सफाई करताना त्याला एक सोन्याची पुतळी सापडली. गाठलेहारातून तुटून पडलेली ती पुतळी असावी. कोणे एके काळी येथे लक्ष्मी नांदत होती याचा सज्जड पुरावाच नव्या पिढीला मिळाला होता. या अगोदर साफसफाई करणाऱ्यांना ती पुतळी कशी सापडली नाही याचेच आजही आश्चर्य वाटते.
आताच्या काळात तळघराची आवश्यकता नाही, म्हणून घराचे नूतनीकरण करताना हे तळघर बुजवण्यात आले. एक सोनेरी आठवण पडद्याआड गुडुप झाली. असे असले तरीही त्याच जागेवर पणजीच्या काळातील तांब्या-पितळाची भांडी मांडून आमची पिढी ती सोनेरी परंपरा जपताना दिसत आहे, हे विशेष.
वंदना लोखंडे
---------------------------------------
माहितीपुर्ण लेख. जुन्या घरांची आठवण ताजी झाली.
उत्तर द्याहटवाधन्यवाद मनिष
हटवाछान लिहीले आहेस. काही आठवणी कितीतरी सारख्या. म्हणजे आमच्याकडे पण पोळ्याच्या सामानाची भली मोठी लाकडी पेटी होती. तिला येरव्ही मोठ कुलूप असायचं. पण पुढचा तुमच्या पणजीचा अनुभव खूपच अनुकरणीय. पुर्वीच्या बायका भोळ्या असल्या तरी करारी असत. म्हणुनच आजीने एवढं सहन करुनही स्वत:ला सावरुन घरालाही सावरले. 🙏
उत्तर द्याहटवापणजीप्रती दाखवलेल्या आदरासाठी मनापासून धन्यवाद
हटवातळघर ही जागा माझ्या साठी सुध्दा खुप अनमोल. माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी आहेत तळघराशी जोडलेल्या. ते सगळे आठवले या लेखाच्या अनुषंगाने.
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद
हटवातुमच्या आठवणींना जागृत केल्याचे समाधान लाभले.
सुरेख लिहिला आहे लेख. जे कधी गावात , वाड्यात राहिलेले नाहीत त्यांना खूपच नवलाई वाटते या सगळ्याची
उत्तर द्याहटवाअगदी खरं
हटवामनापासून धन्यवाद उर्मिला
Sunder lekh. Mala te ghar to ota khamb sagle dolyapudhe ale. Talghar hote tithe aajch kalle. Khupch chan varnan. Khup mast watle wachun. Dhanyawad asech lihit ja.
उत्तर द्याहटवाधन्यवाद शीतल 😊
हटवाछान लिहिले आहेस.चित्र डोळ्यासमोर आले.
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई 😊🙏
हटवा