स्मृतीपाखरे १२ : आमचं गोकुळ
शेती म्हटलं म्हणजे गाई-म्हशी, बैल आलेच. त्यामुळे लहानपणी काळ्या आईची प्रीति व गोधनाच्या वात्सल्याची अनुभूती लाभली. या वात्सल्यातून घरात गोरसगंगा वाहत होती. दूध, दही, ताक, लोणी व तूप हे पुर्णान्न मनमुराद खाल्ल्यामुळे सुदृढ शैशव जपलं गेलं.
घरातल्या लहान मोठ्यांची गरज भागवून उरलेल्या गोरसाची विक्री होई. आमची आजी 'नानीमाय' ह्या दुग्धव्यवसायात स्वत:हून लक्ष घालत असे. दुपारच्या वेळी नातवांना पुढे घालून गोठ्यावर घेऊन जाई. त्यामुळे कळत नकळत त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण मिळत होते.
पुढे आमच्या काकांनी या व्यवसायाला विस्तृत स्वरूप दिले. काठेवाडहून गाई-म्हशी खरेदी करून त्यांची जोपासना करायला सुरुवात केली. त्यामुळे दुधाचे प्रमाण वाढले. अशाप्रकारे 'श्रीकृष्ण दुग्धालय'च्या रूपाने आमच्या घरात गोकुळ वसले. या व्यवसायामुळे आमच्या घरी काठेवाडी लोकांचा राबता वाढला. मनीभाई, जेठाभाई, कांदाभाई, दानाभाई, नाथाभाई अशा काठेवाडी माणसांचा प्रेमळ सहवास लाभला. काठेवाडी भाषेचा लहेजा कर्णमधुर असे. आम्हा बहिणींना ते 'बेन' म्हणून हाक मारीत. (आजही वडिल खूप आनंदात असले की मला त्याच नावाने संबोधतात.) या लोकांचा पोशाखही आम्हाला नाविन्यपूर्ण वाटे. झग्यासारखा आखूड कुडता व त्याला साजेसा घोळदार चुडीदार. मनीभाई व जेठाभाई मात्र जरा आधुनिक होते. ते पँट-शर्ट परिधान करीत. त्यांनी आणलेल्या टेपरेकॉर्डरवर आमचे संवाद, गाणी रेकॉर्ड करत. एकदा काठेवाडहून गायी घेऊन येणार्या ट्रकला छोटासा अपघात झाला. त्यात दोन गायी जखमी झाल्या होत्या. काय ऋणानुबंध असावा माहित नाही पण या अनामिक गोमातांसाठी आमच्या डोळ्यांतून आसवांच्या धारा वाहत होत्या. पांजरपोळच्या दवाखान्यात जाऊन त्यांना बघून आल्याचेही आठवते.
काकांच्या तालमीत दुग्धव्यवसायात आम्ही भावंडं चांगलेच तयार झालो होतो. पुढे काकांनी प्लॉट विक्री व्यवसाय सुरू केला. तेव्हा ह्या व्यवसायाची जबाबदारी त्यांनी माझ्या वडिलांकडे सोपवली.
आमचा दिवस पहाटे पाचलाच सुरू होई. 'दिलीप' नावाचा मदतनीस होता. पहाटे पाचला बर्फाच्या कारखान्यातून दुधाच्या कॅन्स घेऊन हजर होई. आम्ही भावंडं अंथरूणातून उठून डोळे चोळतच ओट्यावर दुधाचा रतीब घालायला बसत असू. या दुधाचा थोड्या फार प्रमाणात बर्फ झालेला असे. तो ठिसूळ बर्फ वाटीत घेऊन खायला खूप मजा येई. ४०-४५ लीटर क्षमता असलेल्या मोठ्या पितळी पातेल्यात दूध ओतले जाई. छटाकपासून ते दीड-दोन लिटरपर्यंत दूध घेणारे गिऱ्हाईक असायचे. कोणी कार्ड दाखवून तर, कोणी नगद दूध घेत असे. तर काही कुपनधारक असत. दिलीप, मोठा भाऊ, वडिल सायकलवर तर कधी मोटारसायकलवर लांबच्या गिऱ्हाईंकांना रतीब घालायला जात. या व्यवसायात एक मदतीचा हात आमच्या मामाचाही होता. कुंडाण्याच्या शेतातून घरच्या गाई-म्हशींचे दूध येई. तसेच जवळच्या खेड्यावरून (दळवेल) एक दोघंजणं दूध घेऊन येत असत. दुधाची शुद्धता तपासून बघण्यासाठी पाव लिटर दूध आटवून खवा केला जाई. त्याचं वजन १८ तोळ्याच्या पुढे असलं तर उत्तम दर्जाचे दूध समजले जाई. हा खवा खाण्यासाठी आम्ही तेथेच आशाळभूताप्रमाणे बसून राहत असू. जास्तीचे दूध लाखेने सीलबंद केलेल्या कॅन्समधून बर्फाच्या कारखान्यात पाठवले जाई. मागणीपेक्षा जास्त दूध झाले तर त्याचे क्रीम काढून आणत. क्रीमला व क्रीम काढलेल्या दुधाला तापवून, कोमट करून त्याला विरजण लावले जात असे. विरजण लावणे ही सुद्धा एक कलाच आहे, असे माझे मत आहे. आई-वडिलांनी ही कला छान आत्मसात केली होती. क्रीमच्या दह्यापासून लोणी व तूप करत असू. इतर दही मोठ्या रवीने घुसळून ताक करत असू. घुसळलेल्या ताकावर येणारा लोण्याचा भला मोठा गोळा आई अलगद काढून घेई. हे ताजे ताजे लोणी ब्रेडला,थालीपीठांना लावून खाण्यात केवढा आनंद होत असे! सर्व संस्कारांनी केलेले हे लोणी कढवून साजूक तुपाचे डबेच्या डबे भरले जात. डब्यातील शुभ्र, रवाळ तुपाच्या वासाने चमचाभर तूप हातात घेऊन चाखण्याचा मोह अनावर होई. गाई-म्हशींचा खरवस खाणे ही सुद्धा आमच्यासाठी एक पर्वणी असे. या खरवसाचे विविध प्रकार आम्हाला मनसोक्त चाखायला मिळाले. ज्या गिऱ्हाईकांनी खरवसाची मागणी केली त्यांना खरवस विनाशुल्क पुरवले जाई. वासरांसाठीच्या या कोवळ्या दुधाप्रती असलेली निर्मळ भावना आज लक्षात येते.
या व्यवसायात जसे प्रामाणिक मदतनीस मिळाले तसे बनवाबनवी करणारे पण भेटले. दूध वाटप करणारा एक मुलगा कधी सायकल घसरून दूध सांडले गेल्याची बतावणी करत असे, तर कधी दुधात पाणी मिसळे. अशावेळी त्याची चोरी पकडून त्याची हकालपट्टी केल्याचेही आठवते. दूध नासू नये यासाठी दुधाच्या कॅन्स, मापं रोज गरम साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवून ठेवत असू. एवढी सगळी काळजी घेऊनही कधीतरी दूध नासल्याने आर्थिक झळ सोसावी लागत असे.
साधारण दहा वाजेपर्यंत ओट्यावरचा दुधाचा सर्व पसारा आवरला जाई, परंतु त्यानंतरही दिवसभर घरी गिऱ्हाईंकाची वर्दळ सुरू असे. महिना अखेरीस कार्डधारकांचा हिशेब होई. कुपनधारक आगाऊ रक्कम देत असत. हा हिशेब वडिल विना कॅल्क्युलेटर फटाफट करीत असत.
म्हशीच्या दुधाबरोबर गाईचे दूधही मुबलक प्रमाणात असे. परंतु म्हशीच्या दुधाला गिऱ्हाईकांची जास्त पसंती असे. फक्त लहान बाळांसाठी गाईच्या दुधाची मागणी असे. म्हशीच्या दुधात हे दूध मिसळून विक्री करणेही अशक्य होई. कारण दुधाची साय पिवळी आली तर गिऱ्हाईक ओरडत. त्यामुळे हे गोरस घरात वापरले जाई. आमच्याकडे स्वाध्यायी लोकांचा राबता असे. येणाऱ्या प्रत्येकाला कोऱ्या दुधाचा चहा होई. उन्हाळ्यात थंडगार रोझ मिल्कशेक देत असू. मंदिरात व घरातील दिव्यात गाईचे तूप वापरले जाई. त्याचे सर्वांनाच अप्रूप वाटत असे.
ह्या व्यवसायामुळे आमच्या घरात खऱ्या अर्थाने लक्ष्मी नांदत होती. कधी आर्थिक चणचण भासलीच नाही.
पुढे वडिलांनी बांधकाम क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे हा व्यवसाय, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मदतनीसाला सोपविण्यात आला. त्यानेही मेहनतीने तो टिकवला.
आज हा व्यवसाय नसला तरी त्या दुधाळ आठवणी मनात घर करून आहेत. आज हक्काचे गोरस नसले तरी गोधन मात्र आहे. आमच्या शेतात अजूनही दूध न देणार्या भाकड गाईंची काळजी घेतली जात आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. जणू 'श्रीकृष्णाच्या गोकुळात' आपले बालपण गेल्याची सय आजही मनाला सुखद अनुभूती देते.
🙏 वंदना लोखंडे
२८/०८/२०२१
-----------------------------------
Surekh likhan kartes tai tu 👌👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद प्रांजू 😊
हटवाजय श्री कृष्ण... गोकुळची सहल अप्रतिम
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद 🙏
हटवावंदना..... आमचा सुध्दा दुग्ध व्यवसाय होता.हे सर्व मी कॉलेज मध्ये असे पर्यंत करत होतो........छान शब्दात या व्यवसायाबद्दल लिहिले......सर्व आठवणी जागृत झाल्या... पोळा च्या दिवशी तर फारच मज्या असायची...या निमित्ताने परिसरातील बालगोपाल ते वयस्कर लोकांचा सहवास लाभायचा...
हटवाखूप छान आठवणी ! छान लेख !!
उत्तर द्याहटवाआभार 😊
हटवावंदना, छान लिहिले आहेस.आठवणीही स्मृतीत राहण्याजोग्या. दुधातुपाने समृद्ध असणारे तुझे घर गोकुळासारखेच वाटले. लिहीत रहा.तुला आणखी लिखाणासाठी शुभेच्छा !
उत्तर द्याहटवाकीर्ती मुळीक.
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
हटवासुंदर आठवणी...
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर लिखाण केले वहिनी तुम्ही , आजही या धावपळीच्या जीवनात जुन्या आठवणींना उजाळा देत आहात , पुढील लिखानास हार्दिक शुभेच्छा ।
उत्तर द्याहटवाछान लिहिलंय दुग्ध व्यवसायाची पण माहिती कळली.
उत्तर द्याहटवावंदना तुझ्या आठवणींचा खरवस आणि शब्दांना गुळाची गोडी. लेख खरवसाच्या वडीसारखा मस्त जमून आला आहे. 👍
उत्तर द्याहटवा