स्मृतीपाखरे 13 : खानदेशचा बैलपोळा
आज श्रावण अमावास्या.
सकाळी सकाळी मन वाऱ्याच्या वेगानं खानदेशातल्या जुन्या धुळ्यातील माहेरच्या घरी धावत गेले. आज पोळ्याचा सण. लहानपणी बैल केव्हा येणार याची दहावेळा वडिलांजवळ चौकशी करत असू. "आता बैल काय करत असतील? त्यांना शेतातून घरी यायला किती वेळ लागेल?" अशा प्रश्नांची लांबलचक भेंडोळी वडिलांपुढे टाकत असू. "सकाळी नानाभाऊ, लुक्या यांनी बैलांना मनसोक्त पाण्यात डुंबू दिले. त्यानंतर त्यांना साबण लावून स्वच्छ आंघोळ घातली. भरपूर चारा, वैरण खाऊ घातले. मानावर जोखड ठेवून कुठल्याही कामास जुंपले नाही. चार वाजता बैल घरी पोहोचतील", अशी माहिती वडिलांकडून आम्हाला मिळत असे. मग चार कधी वाजतील हे समजण्यासाठी घड्याळावर सतत लक्ष ठेवून असत.
बरोबर चार वाजता आठ-दहा बैल व एखाद्या तरण्याबांड गोऱ्ह्यासहित चार पाच सालदार अंगणात येऊन उभे राहत. त्यांच्या येण्याची दादांनी सांगितलेली वेळ किती अचूक होती याचे आश्चर्य वाटत राही. बरोबर तीनच्या भोंग्याला शेतातून निघण्याची सूचना दादांनी सालदारांना केलेली असे.
बैल अंगणात आल्याबरोबर पायरीवर एक लांबलचक खाट ठेवली जाई. त्यावर एक सतरंजी अंथरून गहू पसरले जात. तीन-चार बैलांना धरून गहू खाण्यासाठी सालदार तिथे उभे राहत. त्यांचे खाऊन झाल्यावर दगडी ओट्याच्या लोखंडी कड्यांना त्यांचे दोर बांधले जात. तिथे त्यांना बादलीत पिण्यासाठी पाणी ठेवलेले असे. मग उर्वरित बैलांना गहू खाण्यासाठी पुढे आणले जाई. गहू खाऊन झाल्यावर उरलेले गहू गव्हाच्या कणगीत बैलांचा प्रसाद म्हणून मिसळत. त्यामुळे धान्याला बरकत मिळेल हा विश्वास सर्वांच्या मनात असे.
आता लाल किंवा निळ्या शाईत लाकडी शिक्का बुडवून बैलांच्या अंगावर अलगद ठसे उमटवत. दादा चारधाम यात्रेला गेले होते तेव्हा तिथून एक मखमली रंगीबेरंगी झुलीचा जोड आणला होता. ती झूल खिल्लारी बैलांच्या अंगावर चढवली जात असे. त्यांच्या आकर्षक शिंगावर पितळी टोप्या घालून त्यावर पिवळे रसरशीत लिंबू खोचत. आमच्या कामडीच्या खोलीतील मोठ्या लाकडी पेटीतील दोन तीन गाठोडे बाहेर काढले जाई. त्यात बैलांच्या पितळी घुंगुरमाळा, कपाळावर, नाकावर व पायांना बांधायचे रंगीबेरंगी गोंडे , चामड्याच्या पट्ट्यात अडकवलेली पितळी मोठी घुंगुरघंटी असे अनेक शोभिवंत आभूषणे त्यात पहावयास मिळत असे.
बाहेर अंगणात बैलांना सजवण्याची धावपळ असे तर माजघरात आई-काकू यांची स्वयंपाकाची धांदल उडत असे. वरण-भात, पुरणाची पोळी, सार असा साग्रसंगीत स्वयंपाक होई. मागच्या घरात चुलीवर भलेमोठे खापर ठेवून त्यावर पुरणाच्या पोळ्या होत असत. किमान दोन जणी त्यात गुंतलेल्या असत.
एव्हाना बैलांची सजावट पूर्ण झालेली असे. दाराशी ढोल-ताशा वाजवणारी दोन-तीन माणसे मोठ्या आशेने येऊन उभी राहत. मारुतीच्या दर्शनाला जाण्याची वेळ आलेली असे. वाजत-गाजत सर्व सालदार, वडील, काका सगळेजण बैलांना घेऊन मारुतीच्या दर्शनाला जात असत. मंदिराला मोठी प्रदक्षिणा मारून घरी येत. आमच्या घराजवळच मारुतीचं मंदिर असल्यामुळे पूर्ण जुन्या धुळ्यातील बैलजोड्या आमच्या घरावरून जात असत. त्यामुळे कोणाचे बैल कसे सजवले आहेत हे बघण्याची उत्कंठा लागलेली असे. काही मुले बैलांना खूप जोरात पळवतांना पाहून त्यांचा प्रचंड राग येत असे.
बैल मारुतीच्या मंदिराकडे निघाले की घरात वर्दी दिली जाई. आजी, आई- काकू सगळ्याजणी औक्षणाचे ताट घेऊन बैलांची प्रतीक्षा करत ओट्यावर येऊन उभ्या राहत. बैल आल्यावर त्यांना रांगेत उभे करून त्यांचे औक्षण केले जाई. त्यात पहिला मान आजीचा असे. त्यानंतर मोठी सून म्हणून आई औक्षण करीत असे. माझ्या धन्याचा सखा, माझ्या घराचे लालन-पालन करणारा व लाख जीवांचा पोशिंदा अशी कृतज्ञतेची भावना तिच्या डोळ्यात बघायला मिळत असे. औक्षण केल्यावर बैलांच्या पायांना सोन्याची नथ लावली जात असे. त्यांना पुरणपोळीचा घास भरवला जाई. त्यानंतर काकू व आम्ही बहिणी बैलांचे औक्षण मोठ्या आनंदाने करत असू. काही बैल खूप शांत असत, तर काही खूपच रागीट असायचे. त्यामुळे ते लगेच शिंगं उगारत. अशावेळी जवळ उभा असलेला सालदार त्याला शिताफीने काबूत ठेवत असे.
ज्यांच्याकडे बैल नाही असे जवळपासचे लोक बैलपुजेसाठी येत असत किंवा त्यांच्या घरी बैलांना बोलवत असत.
ते जाऊन येईस्तोवर दादा, काका व भावंडं मधल्या घरात जेवणाची पानं वाढायला घेत. या पंगतीत पहिला मान सालदार मंडळींचा असे. दादा पंगतीत जेवायला सर्वांबरोबर कधी बसले नाहीत. स्वत: सालदारांना आस्थेने गरम गरम पुरणपोळी वाढत असत. त्यांचे जेवण झाल्यावर मग उर्वरित मंडळी जेवायला बसत असे. सालदारांच्या प्रती असलेला वडिलांचा आदरभाव नकळत आमच्या मनात माणुसकी रुजवत असे.
रात्रभर गोठ्यात मुक्काम करून ही मंडळी दुसऱ्या दिवशी सकाळी शेताकडे मार्गस्थ होत असे.
माझे लग्न झाल्यानंतर हा सोहळा बघायला वंचित झाले. तरीपण आजही मातीच्या बैलांची पूजा करून ही माहेरची परंपरा मी माझ्यात, माझ्या घरात जोपासत आहे. शेतकऱ्याची मुलगी असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. परिणामी गायी, बैलांच्या प्रती नितांत प्रेम व आदर सुध्दा आहे.
त्याच भावनेतून बैलपोळ्याचे वर्णन करणारी पुष्पदाम वृत्तातील कविता सादर करते.
गागागागागा ! ललललललगा ! गालगागालगागा
'पोळा'
बैलांचा पोळा सण अजि नवखा रंगतो श्रावणात
राजा सर्जाचे कवतिक करण्या गुंततो सालदार
खिल्लारी जोडी बळकट भलती राबते वावरात
ओझे वाहूनी अतिशय दमते जाणु या ऊपकार
वर्षाकाठी या नवथर वृषभा घालती स्नान शाही
संध्येच्या वेळी अनवट सजवी कौतुकाने अपार
झाकी पाठीचे वळ प्रथम सखा घालुनी झूल भारी
शिंगांना खोचे लसलस पिवळे लिंब जे धारदार
भाळासी शोभे बहु चमचमते आरसे जे बिलोरी
छातीशी माळा किणकिण किणती बोलक्या घुंगराच्या
शिंगांना गोंडे हिरवट पिवळे बांधुनी लोकरीचे
फेरी घालाया चटकन जमती मंदिरी मारुतीच्या
साथीला ताशा पडघम, सनई धुंद जल्लोष होई
बैलांची पूजा अथ-इति करुनी घालती गोगिरास
रांधूनी पोळी पुरण वरण ते वाढती सालदारा
तोषोनी दोघे घरधनि धनिनी जेवती दोन घास
वंदना लोखंडे
वंदना ,
उत्तर द्याहटवाखानदेश मधील धुळ्याजवळ असलेले जळगाव माझे माहेर .मी पण एक शेतकऱ्याचे मुलगी. तुझ्याप्रमाणे माझ्याही माहेरी याच प्रमाणे बैल पोळा साजरा होत होता .आज मी तोच परिपाठ फक्त दोन मातीच्या बैलांनी सजवून सुरू ठेवला आहे . पुरणपोळीचा नैवेद्य .वडिलांकडून मिळालेली पितळी घुंगर माळा आणि चामड्याच्या पट्ट्यात अडकवलेली पितळी मोठी घुंगर घंटी आजही मी जपून ठेवली आहे.
उद्या तुला मी केलेल्या पूजेचा फोटो नक्की पाठविण.
तुझा नेक नेहमीप्रमाणे उत्तम आहे
किती छान ! फोटो नक्की पाठव.
हटवापोळ्याचे छान वर्णन ! कविताही सुरेखच
हटवाखूप सुंदर पोळ्याचे वर्णन आणि कविता ....👌👌👍👍
हटवापोळ्याचे छान वर्णन. आमच्या भागातही श्रावणीपोळा याच पद्धतीने साजरा करतात.
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाखूप छान लेखन आहे
उत्तर द्याहटवावंदना,
उत्तर द्याहटवाखुपच छान लिहीले आहेस.
घरचे आणि गावचे सर्व मिळून
खानदेशी पोळा कसा साजरा केला जातो ते अगदी डोळ्यासमोर आले.
आम्हा मुंबईकरांना काही सण असे अनुभवायला मिळत नाहीत.
छान लिहिलंय लहानपणी आठवण झाली खानदेशी पध्दत ही समजली कविताही छान
उत्तर द्याहटवापोळ्याचे छान वर्णन. 👌
उत्तर द्याहटवाअजूनही धुळयाला श्रावणीपोळा याच पद्धतीने साजरा करतात.
सुप्रभात,
उत्तर द्याहटवास्मृती पाखरे १३ या भागातील बैल पोळ्याचे सुंदर आणि यथार्थ वर्णन वाचून मन भूतकाळात गेले. तू जे लिहिले ते सर्व डोळ्यासमोर उभे ठाकले. तुझी कविता पण खूपच सार्थ आहे. अशीच लिहित जा व लेखणीला बहरते ठेव😊
उज्वल
माझं माहेरचं घर जळगावात जुन्या जळगावात असल्याने आजूबाजूला शेतकरी वस्ती होती.
उत्तर द्याहटवापोळ्याला कितीतरी बैल सजवून आमच्या दरावरून नेले जायचे. इतकं अप्रूप वाटायचं त्या सगळ्या सोहळ्याचं.
आता पंढरपूरला जाते तेव्हा तिथल्या दुकानांमध्ये बैलाच्या झुली, बाशिंग विकायला ठेवलेली दिसली की पाय आपसूक थांबून राहतात.
खूप छान लिहिलेस वंदना. सगळे आठवले.
काकू, नेहमीप्रमाणेच खूप छान लेख..! !
उत्तर द्याहटवामलाही बालपणी आजोळी बघितलेला बैलपोळा हुबेहूब डोळ्यासमोर आला.
वंदनाताई,खूप सुंदर वर्णन
उत्तर द्याहटवाकिती आठवणी ।मामाच्या गाव ।पुरणपोळीचा सुगंध
उत्तर द्याहटवाखूपच छान👍माहेरची आठवण आली
उत्तर द्याहटवावंदनाताई, खान्देशच्या बैल पोळ्याचे सुरेख वर्णन!
उत्तर द्याहटवा