स्मृती पाखरे 14 : ग्रहणाच्या छायेत
पृथ्वी, चंद्र, सूर्य सातत्याने ठराविक कक्षेत भ्रमण करत असतात. भ्रमण करत असताना कधीतरी ते एकमेकांच्या समोर येऊन उभे ठाकतात म्हणजेच एका सरळ रेषेत येतात. पृथ्वीच्या समोर चंद्र आला तर सूर्य झाकला जातो, आणि पृथ्वीच्या समोर सूर्य आला तर चंद्र दिसेनासा होतो, यालाच शास्त्रीय भाषेत ग्रहण असे म्हणतात. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती ग्रहण म्हणजे खरं तर अभ्यासाचा विषय. सृष्टीतील एक सुंदर घटना, पाहण्याजोगी. परंतु का कोण जाणे लहानपणीच ग्रहण पाहू नये हा विचार मनावर बिंबवला गेला. ग्रहणाचे वेध लागताच त्या काळामध्ये अन्न-पाणी ग्रहण करायचं नाही, हा रिवाज लहानपणी आम्ही पूर्णपणे पाळत होतो. चंद्रग्रहण झोपेत जायचंय, परंतु सूर्यग्रहणासमयीच्या काही गोष्टी आठवतात. ग्रहणकाळात दारे खिडक्या बंद करून घरातच बसायचो. ग्रहण सुटल्याबरोबर सर्व जण स्नान करत असू. एवढेच नव्हे तर घरातल्या देवांनाही स्नान घातले जाई. आमच्या मंदिरातील रामालाही अभिषेक केला जाई.
त्यानंतर आम्ही भावंडं ओट्यावर एका मोठ्या तगारीत बाजरी घेऊन बसत असू. तेव्हा "दे दान सुटे गिरान" अशी आरोळी देत गल्लीतून भीक मागणाऱ्यांची वर्दळ सुरू होई. त्यांच्याजवळच्या झोळीमध्ये आम्ही वाडगाभर बाजरीचे दाणे घालत असू. पूर्वापार चालत आलेली परंपराच ती. पुराणात पांडवांनी कुरूक्षेत्रावर ग्रहणकाळात दान केल्याचे ऐकिवात आहे. इतिहासात पानिपतच्या मोहिमेतही मराठ्यांनी ग्रहणकाळात दानधर्म केल्याचे वाचनात आहे.
आपल्या घरावर, कुटुंबावर ग्रहणाची जी बाधा झाली असेल ती पूर्णपणे नष्ट व्हावी अशा भावनेने बहुधा हे दान केले जात असावे. प्रसंगी जुने कपडे सुद्धा त्यांच्या झोळीत घातले जाई.
स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याची भांडी रिती करून ताजं पाणी भरलं जाई. आंघोळ करून आई स्वयंपाक करत असे व देवाला नैवेद्य दाखवून आम्ही सर्वजण जेवायला बसत असू.
शालेय अभ्यासक्रमात ग्रहण म्हणजे काय हे कळल्यावर दिव्याच्या काजळीवर काच काळी करून किंवा एक्स-रेच्या फिल्ममधून ग्रहण पाहायला सुरुवात केली. एकदा कंकणाकृती ग्रहण (diamond ring eclipse) पाहण्यासाठी खूप उत्सुक होतो, परंतु ढगांनी आकाश झाकोळल्यामुळे सगळा विरस झाल्याचे आठवते. मात्र दूरदर्शन आल्यावर त्यावर दुर्मिळ ग्रहण पाहण्याचा आनंद घेऊ लागलो.
या ग्रहणाच्या छायेत वावरतानांच्या काही आठवणी उद्धृत करते.
मी पहिल्यांदा आई होणार होती तेव्हाचा प्रसंग आठवतो. आम्ही दोघंच पुण्यात राहत होतो, तेव्हा आईने मला येणाऱ्या चंद्र ग्रहणकाळात काय करावे आणि काय करू नये अशा खूप साऱ्या सूचना पत्राद्वारे केल्या होत्या. भाजी कापली तर बाळाचे ओठ कापले जातात... वगैरे वगैरे.... आपल्या पोटातला गर्भ नीट रहावा या काळजीने मी आईने सांगितल्याप्रमाणे ग्रहण लागण्याच्या अगोदरच स्वयंपाकपाणी करून, जेवण आटोपले व झोपी गेले. त्यानंतर अचानक दहाच्या सुमारास दारावरची बेल वाजली. अनाहूत पाहुणे दारात उभे होते. 'अतिथीदेवो भव' हा संस्कार मनावर झालेला. त्यामुळे त्यांच्या जेवणाची विचारपूस केली. अर्थात त्यांनी जेवण केलेे नव्हते. पाहुणे मंडळी सासरची असल्यामुळे 'मी ग्रहण काळात स्वयंपाक करू शकत नाही' हे सांगण्याचे साधे धाडसही झाले नाही. ग्रहण काळात स्वयंपाक करून त्यांना जेऊ घातले. ग्रहणकाळात भाजी कापली तरी माझे बाळ व्यवस्थित जन्माला आले होते, हे आवर्जून सांगावेसे वाटते.
दुसरा एक प्रसंग.
माझी लहान काकू खूप आजारी होती. तिच्या शेवटच्या काळात तिने माझ्या भेटीची इच्छा व्यक्त केली. भावाचा तसा फोन आला. मी ही धावतपळत धुळ्याला पोहोचले. सासर व माहेर एकाच गावात असल्याने प्रथम सासरी गेले. त्यादिवशी मी चार दिवसाची ऋतुमती होते. चवथ्या दिवशी केस धुतल्यावरच देवांव्यतिरिक्त सर्व घरात शिवायला परवानगी असे. त्यामुळे कोणीतरी स्नानासाठी पाणी दिल्याशिवाय मी स्नान करू शकत नव्हते. आठ वाजून गेले तरी कोणी उठण्याची चिन्हे दिसेना. चौकशीअंती ग्रहण असल्याचे कळले. ग्रहण सुटल्यानंतरच मला स्नान करता येईल असे सांगितले. मी खूप काळजीत पडले. आपण इतक्या लांबून आलो, पण मला तिथे जाण्यास उशीर झाला तर?.... शंका - कुुशंकांनी मनास घेरले. कारण काकूची तब्येत तशी गंभीरच होती. सुदैवाने तिची माझी भेट झाली व ती अखेरची भेट ठरली. त्यादिवशी ग्रहणाच्या छायेत मी प्रचंड तणावात होते. असे हे ग्रहण व त्याबाबतच्या गैरसमजुती.
खेड्या-पाड्यात अजूनही या प्रथा पाळल्या जात असतील, यांत शंका नाही. परंतु आता काळ थोडा का होईना बदलला याचे समाधान वाटते. काही हौशी नागरिक खास ग्रहण पाहण्यासाठी दुसऱ्या राज्यातही प्रवास करू लागले आहेत, ही प्रशंसनीय बाब आहे.
२०१८ साली ढगांमुळे चंद्रग्रहण दिसू शकले नाही तेव्हा मी केलेली रचना.
'ग्रहण'
मेघपटल ते जरा सारुनी
दिसू शकेल का निशापती ?
कुठे दडलाय बघा रुसुनी
यत्न शोधण्या करू मी किती?
मेघांची ही धुरकट सेना
वेगामध्ये झरझर धावे
झुंडीमध्ये त्यास दडवती
आपण नुसते त्यास अजमावे
दडला जरि हा जलदामागे
प्रभा पसरवी सभोवताली
गर्द सावळ्या टेकडीवरती
रित्या करीतो तेज पखाली
कुठे चुकारू रानवाघूळे
उंचच उंच उडे अभाळी
असेल बहुधा संभ्रमात ते
कुठे हरवली चंदाराणी
मौन धरोनी बसली वसुधा
खेळ पहाया तो ग्रहणाचा
निशापतीने हट्टच धरला
पडदानशीन राहण्याचा
वंदना लोखंडे
११/१२/२०२१
--------------------------------------
छान लिहिले आहेस.
उत्तर द्याहटवासुंदर!
हटवावा, ग्रहण आणि जुन्या आठवणी 👌👌
उत्तर द्याहटवावा, ग्रहण आणि त्या आठवणी 👌👌
उत्तर द्याहटवासुंदर लिहिलंय!!
उत्तर द्याहटवासुंदर लेख आणि काव्य
उत्तर द्याहटवा