पाहुणे - रावळे (भाग 2)
नेहमीच शीळ घालून वर्दी देणारा पडदाशीन 'सुभग' चक्क आज पुढ्यात उभा राहून लाजत, मुरडत शीळ घालत होता. त्याचा हळदीने माखलेला देह, त्यास तीट लागू नये म्हणून ओढलेला काळा शेला. अहाहा! काय ते साजिरे रूप! ते पाहून खिडकीत बसल्याचं सार्थक झालं.
नेहमीच गवताचं हिरवंगार पातं चोचीत घेऊन फिरणारी 'खवलेधारी मुनिया'ची जोडी आज चक्क वाळक्या वेलीची लांबलचक काडी चोचीत धरून चाफ्याच्या, त्यानंतर चिंचेच्या झाडात शिरताना पाहिली. त्यातला एक 'मुनिया' समोरच्या वाळक्या फांदीवर येऊन विसावला. ओल्याबरोबर सुक्या गवतपात्यांचा घरट्यासाठी तो वापर करत असावा, हे लक्षात आले. त्याचं घरटं चेंडूसारखं असतं असं म्हणतात. ते पाहण्याची इच्छा मात्र मनात तेवत आहे.
सतत उंच आकाशात संथ गतीने फिरणारी 'घारुआज्जी' चक्क समोरच्या निलगिरीच्या झाडावर निवांत पिसे फुलवतांना दिसली. त्यामुळे ती कधी अंगावर घोंगडी पांघरलेली तर कधी झालरीचा झगा घालून बसल्यागत भासत होती. तिचे ते गोंडस रुपडे
बघून मन आनंदीत झाले, परंतु तिचे खोबणीतील भेदक डोळे नाही म्हटले तरी थोडे भीतिदायकच वाटत होते.
लक्षवेधक कलरव करत 'राखी धनेश'चा कबिला समोरच्या उंच झाडावर येऊन धडकला. नेहमी चीं चीं करणाऱ्या या कुटुंबवत्सल 'धनेशां'चा आजचा सूर जरा निराळा होता. दोन नर एकमेकांच्या चोचीत चोच घालून हातघाईवर आलेले दिसले. तर गोंधळलेल्या अवस्थेत 'बाळ धनेश' त्यांच्याकडे बघत इकडे तिकडे उड्या मारत विस्फारून नजरेने पाहत होता. थोड्याच वेळात माझ्या पुढ्यात तिघे आले. परत दोघांचे भांडण जुंपले. तेवढ्यात 'कावळेदादा' 'काव-काव' करून मध्यस्थी करू लागले. एका नराच्या शेपटीला चोचीने धरून त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्या पठ्ठ्याने जोराचा हिसका देऊन बेमुवर्तपणे पूर्ववत भांडण सुरू ठेवले. या मारामारीत त्यांचा तोल सुटला व तत्काळ दोघे जमिनीवर पडले. चोचीत चोच अडकवून दोघेही जमिनीवर निपचित पडले. तेवढ्यात चोरपावलाने येत असलेल्या मांजराला बघून दोघांनी दुसऱ्या झाडावर धाव घेतली व ताज्या दमाने पुन्हा भांडायला सुरुवात केली. हा प्रसंग माझ्यासाठी नवीन होता. जसे 'खंड्या' किंवा 'कोकीळ' ललकारी देत आपली हद्द सांगतात, किंवा जंगलातील 'वाघ' मारामारी करून त्या क्षेत्रात आपले वर्चस्व कायम करतात त्याप्रमाणेच 'धनेश' वागत होते का असा प्रश्न मनात आला.
झुंडीने येणाऱ्या 'चष्मेवाल्यां'ची तऱ्हाच न्यारी. बांबूच्या पेरांवर (nodes) त्यांना खाण्यासाठी काय सापडतं, हे त्यांचं त्यांनाच माहिती! ते शोधून काढायला मला त्यांच्यासारखाच चष्मा (भिंग) शोधून काढावा लागेल. ते खाद्य खातानाची त्यांची लगबग अगदी पाहण्यासारखी असते. पाठीला हिरवा, गळ्याला पिवळा, पोटाला पांढरा हा अगदी 'चष्मेबद्दूर' हं! सहजच मनात गाण्याची ओळ गुणगुणू लागले, 'तेरी प्यारी प्यारी सुरत को किसी की नजर ना लगे, चष्मेबद्दूर'.
शेवग्याच्या पांढर्या शुभ्र फुलांतील मधुरस चाखताना 'जांभळ्या पाठीच्या, शिंजीर'ची कसरत लोभस होती.
चिंचेच्या झाडावर आलेली 'छोट्या निखार'ची मादी पुढून बघताना खूप गोंडस दिसत होती. तिच्या गळ्याभोवतीचा पिवळा-केशरी वर्ण तिच्या सौंदर्यात भर घालत होता. इकडे तिकडे चिंचेच्या बुटुकला स्पर्श करून धावताना तिच्या काळपट तपकिरी पाठीवरचा लाल-पिवळा रसरशीत निखार पंखांची फडफड होताना चटकन नजरेत भरत होता. कातरवेळचे हे मादक सौंदर्य कोणालाही नशा आणण्यासारखेच होते. अजून तिला जवळून बघण्याची संधी मिळावी ही मनीषा ठेवून या पक्षावळीचा निरोप घेतला.
वंदना लोखंडे
22/09/22
--------------------------------------
समोर दिसतय हो सगळं 💕.
उत्तर द्याहटवाNever jealous about anybody.... but now I am.
कधीतरी प्रत्यक्ष अनुभव घ्यायची इच्छा झाली.
मनापासून धन्यवाद
हटवावा वा... खूप छान लिखाण... डोळ्यापुढे उभं राहिलं
उत्तर द्याहटवाधन्यवाद ताई
हटवाछान वर्णन केले आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद निवेदिता
हटवावाह खूप सुंदर, पक्षी जगताची मस्त सफर घडवलीस वंदना.
उत्तर द्याहटवालीना धन्यवाद
उत्तर द्याहटवानिसर्ग आपणआस सर्व काही सादर करत असतो पण इतक्या बारकाईने निरिक्षण करुन लिखाण करणए हे तुला छान जमते!
उत्तर द्याहटवा