पाहुणे - रावळे (भाग 3):पितृपक्षातील जेवणावळ
कधीपासून परागंदा झालेल्या तीन 'गोसावीं'नी ('सातभाई') आज सकाळी सकाळी दर्शन दिले. हे मोठमोठ्याने गजर करत येतात म्हणून त्यांचे नाव 'गोसावी' पडले असणार. मला तर त्यांचा आवाज अगदी कर्णकर्कश वाटतो. मोठमोठ्याने भांडण करणारे जणू ते भाऊबंदच. अगोदर या परिसरात 7/8 सातभाई रोज कलकल करत जमिनीवर, झाडावर व टेरेसवर बसायचे. परंतु आता का कोण जाणे, कधीतरी कोलाहल करत अवतीर्ण होतात व लगेच पसारही होतात.
सध्या समोरच्या सोसायटीत गवत काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गवत काढलेल्या ठिकाणी किडे-अळ्या शोधण्यासाठी 'चिमण्या' फिरत होत्या. गवत उपटल्यामुळे झालेल्या भुसभुशीत जमिनीत त्या बसतात. त्यांच्या बसण्यामुळे ठिकठिकाणी खळगे तयार झालेले दिसत आहेत. कोरड्या मातीत कित्येकदा मातीस्नानही त्या करत असतात. परवा पाऊस पडून गेल्यानंतर साचलेल्या डबक्यात तीन चार 'चिमण्या' डुंबून स्नानाचा आनंद घेताना पाहिल्या. आजूबाजूला दुर्मिळ झालेल्या 'चिमण्यां'ची संख्या आमच्या परिसरात बऱ्यापैकी आहे.
आजकाल सोसायटीत सिमेंटचे ब्लॉक, टाईल्स बसवून मातीचे नामोनिशाणच मिटवून टाकतात. त्यामुळे बिचारे पक्षी नैसर्गिक गरजेला मुकतात. असेच आपण करत राहिलो तर पुढच्या पीढीला मातीचे दर्शनही दुर्लभ होईल. तसेच जमिनीत पाणी मुरायला वाव नसल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत जाते ते वेगळेच. 'आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार' अशी परिस्थिती निर्माण होत आहे. असो.
दुपारी साडेअकराची वेळ होती. स्वयंपाकवाल्या मावशी स्वयंपाक करत असताना कावळा खूप मोठ्याने ओरडत होता. पाय फ्रॅक्चर असल्यामुळे तो का ओरडतो हे मी पटकन उठून बघायला जाऊ शकले नाही. मागचा अनुभव जमेस असल्यामुळे कावळा ओरडल्याने आजही कोणीतरी पाहुणे (पक्षी) येतील असा अदमास बांधला.
त्यानंतर मी जेवण आटोपून हॉलच्या खिडकीत येऊन बसले, तर समोर एक चिमणी चोचीत भाताचं शीत घेऊन बसली होती. तेवढ्यात समोरच्या टेरेसवर तीन चिमण्यांची भात खाण्यासाठी लगबग सुरू होती. पितृपक्ष असल्यामुळे समोरच्या टेरेसवर वसंडी (पूर्वजांसाठी वाढून ठेवलेले पान) टाकली होती. बघता बघता एक, दोन, तीन अनेक कबुतरं जमा होऊ लागली. त्यात नेहमीच्या निळसर राखाडी कबुतरांव्यतिरिक्त काळपट तपकिरी रंगाचे एक कबुतर लुडबुड करत होते. या व्यतिरिक्त दोघांचे मिश्रण असलेले एक कबूतर पाहावयास मिळाले. ते सर्व अधाशासारखे अन्नावर तुटून पडले. त्या भाऊगर्दीत 'लालबुड्या बुलबुल'ची जोडी जरा धिटाईने डाळिंबाचे दाणे वेचत होती. शेजारच्या झाडावरून तीन साळुंक्या थाटात उतरल्या. त्यांचा जरा वट असल्यासारखे वाटले. त्या येताच सगळे कबुतर बाजूला झाले. त्यातल्या दोन बाळसाळुंक्या त्यांच्या केशरचनेमुळे वेगळ्या भासत होत्या. खाण्यासाठी त्यांच्यात जणू स्पर्धाच लागली होती. या सर्व मोठ्यांच्या पायात घोटाळणाऱ्या चिमुकल्या चिऊताईंची भाताची शीतं वेचून घेताना तारांबळ उडत होती. तेवढ्यात झूमकन एक मोठा पक्षी तिथे उतरला. त्याने एवढा मोठा पोळीचा तुकडा चोचीत धरला की त्याचा चेहराही दिसेना. 'अरेच्चा, हा तर 'राखी धनेश' असं म्हणता म्हणता तो सुसाट दूरच्या झाडावर पळालासुद्धा. अशाप्रकारे कबुतर (सर्वाधिक संख्येने), साळुंकी, बुलबुल, चिमणी व धनेश या पाच पाहुण्यांनी श्राद्धाच्या जेवणाचा आस्वाद घेतला. परंतु हे सर्व घडत असताना जवळच्या उंबराच्या झाडावर आपले प्रमुख अतिथी 'काकमहाशय' मात्र जोरजोरात ओरडत होते. ते या पाहुण्यांना "जा" म्हणून सांगत होते की अजून इतर पक्ष्यांना "या" म्हणत होते हे माझ्या समजण्याच्या पलीकडले होते.
खरंतर कावळ्याने घास घेतल्याशिवाय पितरांनी जेवायला बसू नये, असा रिवाज लहानपणापासून ऐकिवात आहे. परंतु हे महाशय उपस्थितही राहिले नाही.
या अनुषंगाने मनात अनेक प्रश्नांनी गदारोळ केला.
1) पितृपक्षातील जेवण कावळे महोदयांना अजीर्ण झाले म्हणून, की मेलेल्या माणसाची इच्छा पूर्ण झाली नसेल तर कावळे घास घेत नाही या पोथ्या-पुराणातील कथेत तथ्य असावे.
2) कणसातील धान्य, परिसरातील किडे-सरपटे व झाडांवरील ताज्या फळांवर गुजराण करणाऱ्या पक्ष्यांना शिजलेल्या अन्नाचा त्रास होत नसेल का?
3) मागे आम्ही भिगवणला पाणथळीतले पक्षी बघायला गेलो तेव्हा आमच्या गाईडने Gull पक्ष्यांना बोलावण्यासाठी माशांची लालूच दाखवली होती, परंतु प्रयागच्या संगमावर नावाड्याने या पक्ष्यांना चक्क तिखट शेव दिली. ते बघून अक्षरशः जीव जळला. अशा तेलकट, तिखट पदार्थांनी त्यांच्या पचनसंस्थेला हानी पोहोचत नसेल का?
4) आजकाल काही लोक कबुतरांना धान्य खाऊ घालण्यात धन्यता मानतात, किंबहुना पुण्याचे काम समजतात. परंतु आपणांस हे माहिती असायला हवे, कबुतरांची अनावश्यक पैदास झपाट्याने वाढत आहे. निसर्ग संरक्षणाचे कुठलेही काम ते करत नाही. उलटपक्षी त्यांच्या विष्ठेने लोकांना अस्थमाचा त्रास होऊ लागला आहे.
काय चांगले व काय वाईट याचा आपण सारासार विचार करण्याची वेळ आली आहे.
ते काहीही असो, परंतु पक्ष्यांच्या जेवणावळीची गंमत पाहण्यात माझा वेळ भुर्रकन उडून गेला, हे मात्र खरे. क्षुधा शांत होऊन तृप्ततेची ढेकर देऊन हे पाहुणे घरी परतल्यावर मी ही समाधानाची ढेकर देऊन अजून पक्षीजगतातील काय काय गमती जमती पाहायला मिळतील या विचारात शयनकक्षाची वाट चालू लागले.
इति श्राद्ध-पुराण समाप्त
वंदना लोखंडे
24/09/22
एक विनंती - लेख कसा वाटला याबद्दलचा आपला अभिप्राय आपण इथे (टिप्पणी या सदरात) नोंदवू शकतात.
खुपच सुंदर लेख झाला आहे आणि त्यात फोटो एकदम चार चांद लग गये ...
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद 🙏
हटवावा! सुंदर लेख !!
उत्तर द्याहटवामनापासून आभार 🙏
हटवासुरेख लेख
उत्तर द्याहटवाधन्यवाद 😀🙏
हटवासुरेख लेखन 👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद 😊🙏
हटवासुंदर लेख. खरंय गं ! पक्ष्यांची पचनसंस्था माणसांपेक्षा वेगळीच असते. पण हौशी माणसं याचा विचार न करता आपलेच अन्न त्यांना खायला देतात.
उत्तर द्याहटवाअगदी खरं ताई!
हटवामनापासून धन्यवाद 😊🙏
खूप छान 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाजाता जाता उत्तम संदेश दिलात तुम्ही.
उत्तर द्याहटवाकबूतरांबाबत तर एकदम योग्य मांडलं आहे. प्रकाशचित्रे पण सुंदर 💕
खूप छान लेख !
उत्तर द्याहटवासुरेख लेख ❤️
उत्तर द्याहटवाखुप छान वर्णन आणि फोटो सुद्धा!
उत्तर द्याहटवा