पाहुणे- रावळे (भाग 4) : लग्नमंडप
दोन तीन दिवसापासून 'वल्गुली'ची (Cinerous Tit) दोन बाळं इकडून तिकडून हिंडताना दिसत होती. 'अरे बाळांनो, जरा थांबा रे' सांगूनही ऐकत नव्हती. परंतु आज संध्याकाळी पाचच्या सुमारास मी चहापान आटोपून खिडकीतून बाहेर डोकावले आणि दुसऱ्याच मिनिटाला ही दोन्ही बाळं शेजारच्या सुकलेल्या सुबाभुळच्या झाडावर धावत आली. खोडाची साल उकरून त्याखाली असलेले सूक्ष्म जीव वेचून फस्त केले. त्यानंतर वाळक्या शेंगांच्या झुंबराशी मस्ती करून झाडाच्या बेचक्यात चुळबुळ करत उभे राहिले. काळ्या-पांढऱ्या रंगातली ही सुरेख जोडी बघून त्यांची दृष्ट काढाविशी वाटली.
इतक्यात 'शिंजीरा'च्या (Purple Sunbird ) जोडीने लक्ष वेधून घेतले. एकमेकांच्या पाठोपाठ धावत वाळलेल्या फांदीवर दोघं आली व संध्याकाळची उन्हं अंगावर घेत अणकुचीदार चोचीने आपली पिसं स्वच्छ करत बसली. त्यावेळी एक बारीक छोटासा पीस त्याच्या चोचीत अडकलेला दिसला. Breeding plumage मधला हा 'शिंजीर नर' जणू गळ्यात काळा टाय व पिवळ्या सदऱ्यावर मातकट, चमकील्या जांभळट पट्ट्याचा कोट घालून इथे तिथे नवरदेवासारखा मिरवत होता. त्याची हळदुल्या रंगाची मादी मातकट जांभळी शाल ओढून सूर्यस्नान घेत होती. तिच्या अणकुचीदार चोचीच्या मुळाशी असलेला लाल रंग तिच्या सौंदर्यात भर घालत होता. ह्या देखण्या दांपत्याचे कौतुक करण्यासाठी इतर छोटुकली वऱ्हाडी मंडळीही उपस्थित होती.
आपल्या कोवळ्या शिशुला घेऊन चष्मेबद्दूर ('चष्मेवाला'- Oriental white eye) मंडपात हजर झाला. हुबेहूब आई-वडिलांचा वर्ण त्याने घेतला होता. लालचुटूक जीवणी व पिसांची पुरेशी वाढ न झाल्याने लालचुटूक दिसणारा गळा, यामुळे त्याचे शैशवरूप खुलून दिसत होते. बाल्यावस्थेत असल्याने त्याला अजून ढापण (चष्मा) लागला नव्हता. जेवण आणण्यासाठी गेलेल्या आईची तो वाट पाहत होता. इवल्याशा चोचीत इवलीशी पाकोळी घेऊन आई आली. पिलाला घास भरवताना आईची ममता ओसंडून वाहात होती. सर्व पक्षीप्रेमींसाठी असणाऱ्या या खास क्षणाची मी साक्षीदार होते. पुन्हा धावत जाऊन टणटणीचे निळसर काळुलं पक्व फळ आपल्या चोचीत घेऊन आली. यथेच्छ भोजन झाल्यावर दोघांनी मंडपातून काढता पाय घेतला.
शेवग्याच्या झाडाच्या उंच शेंड्यावर उभा राहून शुभ्र (मध्यभागी पिवळ्या) फुलांतील रसपान करणारा 'जांभळ्या पाठीचा शिंजीर' (Purple Rumped Sunbird) आज आपल्या सहचारिणीला घेऊन आला होता. लांबूनच उभे राहून हजेरी लावणारा हा 'शिंजीर' जरा शिष्टच वाटला.
तेवढ्यात झाडाच्या खालच्या फांदीवर पिटुकला 'फुलटोचा' (Pale billed flower pecker) पिसं फुलवतांना दिसला. आपल्या भारतातील सर्वांत लहान पक्षी म्हणून याची गणना होते. आपल्या बोटभर उंचीचा (8 सें. मी.) सुकलेल्या फांदीवर बसलेला 'फुलटोचा' बघण्यासाठी तुमची नजर तेवढीच तयार असायला हवी. सहसा एका जागी न बसणारा हा गडी निवांत बसून पिसं फुलवत होता. जणू काही 'मी लहान नाही, मी पण मोठा आहे. ' असे मला सांगत होता. त्याची ती विस्फारलेली पिसे बघून माझे डोळे विस्फारले. नेहमी तोंडलीच्या फळावर ताव मारणारा हा पक्षी आज माझ्याकडे पाठ फिरवून बसला होता. त्याने आपली पोझ बदलावी यांसाठी मी खूप विनवण्या केल्या, परंतु पठ्ठ्या आपल्याच नादात रममाण होता.
सुकलेलं झाड पक्ष्यांचं आवडतं विश्रांतीस्थळ असतं, हे नव्याने सिद्ध झाले. पायाला दुखापत झाल्यामुळे मला माझ्याच घरातल्या या खिडकी (hide) शेजारील झाडाकडे लक्ष गेले. किंबहुना मला भेटायला येणाऱ्या पक्ष्यांची तिथे वर्दळ वाढली असावी म्हणूनच लक्षात आले.
वाईटातही चांगले शोधण्याची सत्प्रवृत्ती आपल्याला खडतर जीवनात उभे राहायला मदत करते हा विश्वास पक्का झाला. 😊
वंदना लोखंडे
23/09/22
-------------------------------------
एक विनंती - लेख कसा वाटला याबद्दलचा आपला अभिप्राय आपण इथे (टिप्पणी) नोंदवू शकतात.
खूप खूप छान !! वाईटातून हि चांगलें शोधण्याची प्रव्रूत्ति ...हें अधिक भावले .खरंतर वर्नित् पक्ष्याच्या नावाचा प्रथमच कर्ण प्रवेश झाला़.
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद संदीप. शेवटचा संदर्भ नीट कळला नाही, कदाचित ऑटोकरेक्शनचा घोळ झाला असावा.
हटवाखूप सुंदर लेख
हटवासुंदर शबद रचना👌👌ढापण शबद धूळयाची आठवण करून गेला.
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद 😊🙏
उत्तर द्याहटवाछान!
उत्तर द्याहटवावंदना खूप सुंदर लेख! तुझं पक्षी निरिक्षण कौतुकास्पद!
उत्तर द्याहटवातू फारच नशिबवान आहेस वन्दना! पायाला दुखापत झाली याचा संधीमधे रूपान्तर करुन फ़क़त एक़ा खिड़कीतुन पक्षिजगाचे निरीक्षण चालू केलेस!
उत्तर द्याहटवाआणि खरोखर ते सर्वपक्षी तुलाच भेट देणयास येत आहेत✅🍀