पाहुणे - रावळे (भाग 5)

 
फेसबुकवर मैत्रिणींनी काढलेले पक्ष्यांचे फोटो बघून मी दोन इच्छा व्यक्त केल्या होत्या. एक म्हणजे मुनियाचं बाळ पाहायला मिळावं आणि दुसरी म्हणजे वर्षातून एकदा येणाऱ्या 'गोरली'  (Rose finch) चं लवकर दर्शन व्हावे. 
म्हणतात ना, 'भगवान देता है तो छप्पर फाडके देता है'। तसंच काहीसं आज माझ्या बाबतीत घडले. आज रविवार असल्यामुळे सकाळी जरा उशिराच उठले. काही वेळेस जरा समंजस माणसाप्रमाणे वागायला हवे. माझ्या खुडबुडीने नवऱ्याची झोपमोड होऊ नये म्हणून निमूट अंथरूणावर लोळत पडले होते. साधारण आठ वाजता आयता चहाचा कप हातात आला. एक मात्र खरे, पाय जायबंदी झाल्यामुळे नवऱ्याकडून सेवा करण्याची आयती संधी चालून आली. 
हं तर मी काय म्हणत होते? 
चहा पीत असताना नेहमीच उंबराच्या झाडावर माझी नजर टेहळणी करत असते. पूर्व दिशेला असलेल्या उंबराच्या झाडावर येणारा पक्षी पटकन लक्षात येत नाही. मगर हमारी पारखी नजर का कमाल देखो। साधारण बुलबुलाच्या आकाराएवढा तो पक्षी डोक्याला गुलाल फासून आला होता. 'अरेच्चा, हा तर  Rose finch!' असे ओरडत मी ओट्याच्या दिशेने धावत सुटले अन् धावता धावता  म्हणजे खुरडत चालत नवऱ्याला, 'लवकर कॅमेरा आणा' अशी सूचना दिली. तोपर्यंत मोठ्या हिमतीने ओट्यावर बसकण मारली. 'Rosefinch' चा चेहरा सुस्पष्ट दिसू लागला. 'गुलाबी चटक'. जणू गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतून नुकताच परतलेला. अंगभर गुलाल पसरलेला. कुणी याला 'गोरली' पण म्हणतात. त्याची छबी कॅमेऱ्यात कैद करावी म्हटलं, परंतु  रात्रभर सुस्तावलेल्या कॅमेऱ्याने फोकस करण्याआधीच हे महाशय पानांआड गुल झाले.  तीन नाही पण दोन डोळ्यांना दर्शन झाले. आता पुढचे दोन - चार दिवस Rosefinch लवाजम्यानिशी पाहुणचाराला येतील या समाधानातच ओट्यावरून खाली उतरले. 
पेपर वाचून झाल्यावर अस्मादिकांची स्वारी गळ्यात कॅमेरा अडकवून हॉलच्या खिडकीच्या दिशेने धडपडत निघाली. स्थानापन्न झाल्यावर चहुबाजूस सावध नजर फिरवली. नेहमी पलिकडच्या तारेवर बसणारी खवलेधारी मुनियाची जोडी डोक्यावरच्या तारेवर बसलेली होती. त्यातला एक 'मुनिया' जरासा अस्वस्थ होऊन समोरच्या सिल्व्हर ओकच्या झाडावर उतरला. आत बाहेर करत उडाला. दुसर्‍या मुनियाचीही तशीच अवस्था होती. लालभडक तोंडलीवर नवीन पाहुणा आला या आनंदात माझा कॅमेरा सज्ज झाला. पण तो तोंडलीवर काही येईना. तेवढ्यात कॅमेऱ्याच्या चौकटीत बाळमुनियांचे आगमन झाले. 'मुनिया'ची जोडी आपले बाळ मला दाखवायला घेऊन आल्याचे पाहून मी सातव्या आसमानात उडाले. "सच्चे दिलसे माँगी मुराद पुरी होती है" या म्हणीचा प्रत्यय आला.
सिंहगड व्हॅलीत, विद्यापीठाच्या परिसरात व पाषाण-लेकला भेटलेली 'नीलिमा' (Tickell's blue flycatcher) आमच्या परिसरात दिसते. तिच्या पिलाला डोळे भरून पाहावे असे खूप वाटायचे. निळे डोके, निळीशार पाठ अन् गळ्याला केशर-पिवळी अशी 'नीलिमा' आकर्षक दिसते. परंतु ती बहुधा माझ्यावर रुसली असणार. तरातरा येते व तरातरा निघून जाते. पिलूही तसेच. पण ती आज चक्क संध्याकाळी जमिनीवर उंडारताना पाठमोरी दिसली. बघता बघता झेप घेऊन माझ्या समोरच्या फांदीवर येऊन बसली. जरा वेळ तोंड दाखवून आली तशी निघून गेली. 
पाठीवर अंगार घेऊन फिरणारा छोटा निखार व गरम (लाल) डोक्याचा शिंपी हे दोन्ही पक्षी मला खूप सतावतात. फोटो काढून घ्यायला अजिबात राजी होत नाही. अत्यंत चळवळे, अतिउत्साही. एका जागेवर अजिबात थांबत नाही. एक चांगला फोटो मिळावा ही या पामराची इच्छा कधी पूर्ण होईल देवजाणे. 
सिंहगड व्हॅलीत सर्वप्रथम भेटीस येणारा पक्षी म्हणजे करडा धोबी. आपल्या आसपास सतत शेपटी खाली वर बडवीत फिरत असतो. पाण्याच्या आसपास आढळणारा हा पक्षी जेव्हा समोरच्या टेरेसवर व तिथून कडुनिंबाच्या झाडावर बसला, ते पाहून मी 'आ' वासला. सिंहगड व्हॅलीत गेले असतानाच माझा पाय फ्रॅक्चर झाला. तेव्हा त्याची भेट न घेताच परत आले. म्हणून तोच मला भेटायला आला असावा, ही कल्पना कितीही हास्यास्पद वाटली तरी सुखावह निश्चित होती.
यंदा ही पाहुणे मंडळी माझ्यावर खुश आहे. कितीतरी नवीन पाहुणे पाहायला मिळाले. त्यात 'कृष्ण थिरथिरा' (Black Redstart), 'Yellow eyed babbler', 'Plain Prinia', 'फुलटोचा' ('Pale billed flower pecker'),  'जड चंचू फुलटोचा' (Thick billed flower pecker), 'Crimson Backed Sunbird' (पक्षी अभ्यासकांच्या मते वेस्टर्न घाटात दिसणारा पक्षी पुण्यात पाहायला मिळणे हे रेकॉर्ड आहे.), 'तितर' (Grey francolin), आणि आताचा 'करडा धोबी' (Grey wagtail) ही मंडळी अकरा वर्षात पहिल्यांदाच आमच्या परिसरात पाहायला मिळाली. इतर पक्ष्यांची संख्याही नेहमीपेक्षा विपुल आहे. 
बुलबुल, तांबट, दयाळ, कोकीळ, कबुतर, चिमण्या, शिंपी यांची बाळं अगोदर पाहिली.  परंतु चष्मेवाला, वल्गुली, सुगरण, मुनिया यांची बाळं पहिल्यांदाच पाहायला मिळाली.
या व्यतिरिक्त इथे नानाविध फुलपाखरे पाहायला मिळतात. 
खरोखर असा समृद्ध परिसर लाभणं, त्यातली जीवसंपदा पाहायला मिळणं हे नशीबच. 
परंतु यांसाठी वृक्षतोडणी न करता त्यांची राखण करणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.

वंदना लोखंडे 
०८/१०/२०२२

एक विनंती - लेख कसा वाटला याबद्दलचा आपला अभिप्राय आपण इथे (टिप्पणी) नोंदवू शकतात.
-----------------------------------

टिप्पण्या

  1. खूप छान लेखन झालेले आहे अतिशय सुंदर फोटोग्राफ्स आहेत आणि लेखन देखील तितकेच अप्रतिम आणि मार्मिक झालेले आहे आवडले दोन्हीही धन्यवाद!!

    उत्तर द्याहटवा
  2. तुझी पक्षांची मैत्री घट्ट होतं आहे. ते बोलावलेस आणि ते येतात. हुलकावण्या देऊन वाट बघायला लावतात. छान पक्षी छान फोटो. तुझं घर असं आहे की उंचावर खूप पक्षी येत असतील... घरात बसून आनंद घेतेस.. मस्त!! वंदना

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर लेख...फोटोही खूप सुंदर! वंदना हा तुझा छंद खूप छान आहे !

    उत्तर द्याहटवा
  4. मी डाॅ.रेखा देशमुख, वंदना तुझे पक्षांवरचे लेख देखणे व वाचनीय ,मनाला आनंद देतात.नवी माहिती कळते .एकंदर करोनानी चारीबाजुची सृष्टी सुधारलीय ( मानवाच्या कमी अधक्षेपामुळे व प्राणी पक्षीही फुलपाखरे जरा वाढली आहेत .असे वाटते .

    उत्तर द्याहटवा
  5. वंदना, पक्षांची करून दिलेली ओळख खुपच प्रशंसनीय. तुझ्या शैलीत वाचतांना जणू काही मी स्वतः डोळ्यांनी बघत आहे असे सतत वाटत होते.

    उत्तर द्याहटवा
  6. नवी नवी बाळे आणि फुलपाखरांचे स्वागत लेखनशैली नेहमीप्रमाणे मस्तच

    उत्तर द्याहटवा
  7. शब्दातीत आहे. शब्दांचा वरदहस्त लाभलाय तुला. तू लिहीती रहा. आम्ही त्याचा भरभरून आनंद घेत राहू. अशी पक्षीमित्र सखी लाभणं भाग्याचे आहे

    उत्तर द्याहटवा
  8. It’s unbelievable to know that these specific types of birds come straight to your window in the urban city like Pune! You are so fortunate! Stay blessed! Keep showering your love n care for this beautiful nature.. hope many get inspired by reading these blogs!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझी विठाई

स्मृती पाखरे ९ : उखळ -मुसळ

माझी वारी