पाहुणे_रावळे : भाग 6
आज चार आठवड्याच्या कैदेतून पायाची सुटका होण्याचा दिवस. सुटका करून घ्यायची तर कारागृहाच्या भिंतीवर करवत फिरवणारा कोणीतरी निष्णात हवाच ना. त्यासाठी हॉस्पिटल गाठले. बर्याच प्रयत्नांती त्यात यश आले व बिचाऱ्या पायाची सुटका झाली.
घरी यायला जरा उशीरच झाला. जेवण करून जरा कुठे सोफ्यावर टेकले तोपर्यंत रेणुकाने (माझी मदतनीस) आवाज दिला, "ताई, ताई, इकडे या ना. नवीन पक्षी दिसतो." भांडे घासता घासता नवीन पाहुण्यावर तिची नजर गेली होती. माझ्या सानिध्यात राहून तिचेही पक्षी ज्ञान चांगलेच विकसित झाले आहे, त्यामुळे मी तिच्यावर विश्वास ठेवून नुकत्याच स्वतंत्र झालेल्या पायाला गोंजारून किचनच्या खिडकीकडे कूच केली. जाता जाता टेबलावरचा कॅमेरा गळ्यात घालायला विसरले नाही. खिडकीतून डोकावून पाहिले तर समोरच्या टेरेसवर निळा कस्तूर (Blue rock thrush) मिश्कील हसत होता. कालच तर याची आठवण काढली होती. ARAI च्या टेकडीवर लोकांना दिसतो आहे म्हटल्यावर आपल्याकडे हा नक्कीच येईल असे वाटले होते. दरवर्षी हिवाळ्यात येणारा हा पाहुणा यावेळी जरा लवकर आला हे पाहून आश्चर्यचकित झाले. माझी चौकशी करायला तर आला नसेल ना? मला आता चालायला येतं की नाही ते बघायला आला असावा.
फरक इतकाच की नेहमी येणारा 'तो'असतो, परंतु कार्यबाहुल्यामुळे त्याने आज 'तिला' पाठवले असावे. 'तो' आणि 'ती' कसे कळले हा प्रश्न मनात आला असेलच. दुरून पाहिले तर करड्या रंगाचा हा पक्षी तेवढा मनात भरत नाही. परंतु दुर्बिणीतून किंवा कॅमेऱ्यातून बघाल तर त्याच्या सौंदर्यावर मोहित होण्यावाचून राहणार नाही. नराच्या करड्या पंखावर निळाईची पखरण असते आणि मादीच्या करड्या पंखावर फक्त निळसर झाक असते. पक्षी-जगतात नर अधिक आकर्षक असतात हेच खरे. तिला पहिल्यांदाच भेटल्याचा आनंद काय वर्णावा! तिनेही इकडे तिकडे उड्या मारून माझ्या भेटीने आनंद झाल्याचे जाहीर केले. खिडकीच्या तावदानात स्वतःला बघून फारच मखडत होती. इकडे तिकडे मान मुरकून लचकत लचकत चकरा मारत होती. मधेच एकदा शेपटीचे पंख पसरून उभी राहिली. एवढेच नव्हे तर तिने सुरेल आवाजात चक्क माझ्यासाठी गाणेही म्हटले. त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, गातांना ती आपली छाती फुलवत होती. जसे संवादिनीच्या भात्यात हवा भरल्यावरच त्यातून सूर निघतात तद्वत ती गाताना छातीत हवा भरून घेत असावी असे वाटले. तब्बल २०/२२ मिनिटे ती थांबली. मला मनसोक्त फोटो काढू दिले. 'मी परत येईन', असे आश्वासन देऊन तिने हसत हसत निरोप घेतला.
मागच्या अनुभवावरून 'तो' तीन आठवडे मुक्कामाला होता. आताही 'ही' साधारण तेवढाच कालावधी राहील या आनंदात झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पहिला विचार तिचाच. ती कुठे असेल? काल 'ती' उंबराच्या दिशेने झेपावली होती, म्हणून माझी नजर तिथेच तिला शोधत होती. चहा-पाणी करायचं म्हणून गॅसच्या ओट्याजवळ उभी राहिली, तेवढ्यात खिडकीच्या बाजूला पंखांची फडफड दिसली. दुसऱ्यांदा परत तोच भास झाला. काही कळायच्या आत 'ती' माझ्यासमोर खिडकीत येऊन बसली. मी अवाक झाले. मला जेवढी तिची ओढ होती तेवढीच तिलाही असावी का?
८/१० वर्षापूर्वी 'निळ्या कस्तूर'ला पहिल्यांदा जिथे पाहिले होते त्याच ठिकाणी ही 'सावळ कस्तुरी' दिसल्याचे अप्रूप वाटत होते. फ्रेंड्स पार्क सोसायटीचे रो हाऊस त्यांचे आवडते ठिकाण असावे. मागच्या वेळी 'निळा-कस्तूर' माझ्या टेरेसवरही येऊन गेला होता. झाडांपेक्षा गच्चीवर, parapet wall वर याला विशेष आवडते. म्हणूनच त्याला 'Blue Rock Thrush' हे साजेसे नाव मिळाले असणार.
मार्च महिन्यात मांडवीला (खडकवासल्याच्या धरणाची मागची बाजू) गेलो होतो. तेथून जवळच डोंगरावर जर्सेश्वरच्या पुरातन शिव-मंदिरात गेलो. दर्शन घेतल्यावर तिथे विसावा घेत असताना मंदिराच्या घुमटालगतच्या भिंतीवर याला बघून आश्चर्य वाटले. त्याची छबी कॅमेऱ्यात बंदिस्त करू म्हटलं तर बॅटरी डाऊन झाली होती. जवळच माळरान आहे, तिथे बरेच पक्षी दिसतात. त्याचेही फोटो काढता यावे म्हणून बॅटरी चार्ज करणे आवश्यक होते. मांडवीच्या रेसॉर्टला परत गेलो. बॅटरी चार्ज करून पुन्हा जर्सेश्वरकडे निघालो. पार्किंगमधून गाडी काढत असताना हा हिरो तिथल्या छतावर बसलेला दिसला. जणू तो माझ्याच भेटीला आला होता. निर्व्याज मनाने मागितलेली इच्छा पूर्ण होते, याचे प्रत्यंतर आले. भुलेश्वरच्या मंदिर परिसरात सुद्धा याची भेट झालेली आठवते. असा हा निळा - कस्तूर. त्याचा माझा ऋणानुबंध तसा जुनाच आहे.
वंदना लोखंडे
21/10/2022
Informative information 🤩
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवाWow that's nice
उत्तर द्याहटवासुंदर वर्णन केले आहे एका पाहुण्यांचे
खूप खूप धन्यवाद 🙏
हटवाताई सुंदर वर्णन केले आहे
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद 😊
हटवासुंदर
उत्तर द्याहटवामनःपूर्वक आभार 🙏
हटवामस्तच..!! 👌👌
उत्तर द्याहटवा