पाहुणे -रावळे (भाग ७) : ग्रेट भेट
तो आला... तो आला.
तो आल्याची वार्ता एका व्हाट्सअप ग्रुपवर कळली आणि सगळीकडे आनंदाला उधाण आलं. आम्हाला त्याला भेटायची फार उत्सुकता होती. मागच्या वर्षी भेटीचा योग आला नव्हता, म्हणून यावर्षी भेटायचेच हे मनाशी पक्के ठरवले होते. 2022 मध्ये तो 31 मे ला आला होता. 2023 मध्ये 3 जूनला आला होता आणि आत्ता यावर्षी 30 मे लाच आला. त्याच्या या नियमित व नियोजित भेटीचं आम्हाला नेहमीच अप्रूप वाटते.
बरं हा पाहुणा दुरून येणार म्हणून त्याच्या भेटीचे जरा विशेष कौतुक. थेट नैऋत्य भारतातून मजल दर मजल करीत हे महाशय ताम्हिणीला सुखरूप पोहोचले होते. श्रीलंका व बांगलादेशातही यांचा अधिवास असतो. एवढ्या लांबचा प्रवास करून यायचं म्हणजे काय चेष्टा आहे का! एवढी मोठी भरारी घ्यायची म्हणजे तुमच्या पंखांत बळ असायला हवे. म्हणूनच त्याच्याबद्दल जरा जास्तच आदर वाटतो.
बरं याची भेट घ्यायची म्हणजे तारीख व वेळ निश्चित करावी लागते. त्यासाठी त्याचे यजमान म्हणजे 'रामदास येनपुरें'शी संपर्क साधला. हे यजमान म्हणजे धडाडीचे कार्यकर्ते बरं का! आलेल्या पाहुण्यांची सरबराई करण्यात त्यांचा हात कोणी धरणार नाही. आमच्या ह्यांना शनिवार, रविवारी सुट्टी असते म्हणून सुट्टीचा दिवस उपलब्ध होईल का याची विचारणा केली. आमच्या सुदैवाने रविवारी 2 जून 2024 ला सकाळी 7:30 वाजेची वेळ निश्चित झाली.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं 'ताम्हिणी' गाव पुण्यापासून 75 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे भल्या पहाटे 5:30 वाजता जामानिम्यासहित प्रयाण केले. गुगल महाशयांनी 7:10 पर्यंत पोहोचू असे दर्शविले. चांदणी चौकातून भूगाव, मुळशी ह्या गावांच्या सीमा ओलांडत निघालो.
सह्याद्रीच्या पर्वतरांगातून जाणाऱ्या वळणदार, गुळगुळीत रस्त्यावर आमची गाडी सुसाट धावत होती. एका बाजूला आकाशाला भिडू पाहणारे उंच उंच पहाड तर दुसऱ्या बाजूला पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बुभुक्षित तलाव साथ करीत होता. नुकतेच दिनदर्शिकेने मे महिन्याला निरोप देत जून महिन्याचे स्वागत केले होते. त्यामुळे सूर्यदेवाने आपला अंगार कमी करून प्रेमाचा शिडकावा केला होता. आकाशातले नितळ ढग डोंगरमाथा उतरून खाली येऊ बघत होते.
आमच्यासारखे निसर्ग सहलीला निघालेले शौकीन प्रवासी जागोजागी गाड्या थांबवून फोटो काढताना दिसत होते. आम्ही मात्र हा मोह आवरून इप्सित स्थळी, वेळेत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील होतो. बरोबर 7:15 वाजता 'ताम्हिणी निसर्ग खोपट्या'त (Tamhini Nature Nest) उभे होतो. अचानक 'शिळकरी कस्तुर'ची परिचित सुमधुर सुरावट कानावर पडली व आम्ही मंत्रमुग्ध झालो. आत प्रवेश करताच रामदासने आमचे हसून स्वागत केले. त्याच्या आजूबाजूला बघ्यांची अनपेक्षित गर्दी पाहून आम्ही जरा चकित झालो. आमच्या दिमतीला त्याने एक मदतनीस दिला व भेटीसाठी खास उभारलेल्या शामियान्यात (लपण) आम्हाला बसव, असा आदेश दिला.
जरा वाकूनच तिथे प्रवेश केला. बघतो तर तिथे मुंबईचे श्री. राजन व श्री. कैलास अगोदरच स्थानापन्न झाले होते. या दूरस्थ पाहुण्याचे निरीक्षण करता यावे म्हणून 'अहों'नी खास ठेवणीतली दुर्बीण बाहेर काढली. या भेटीची क्षणचित्रे टिपण्यासाठी व चित्रफित करण्यासाठी मी आपला कॅमेरा ट्रायपॉड वर लावून सुसज्ज झाले. समोर नैसर्गिक झुडुपांच्या छायेत एक छोटेसे कृत्रिम तळे काठोकाठ भरलेले दिसत होते. पाहुण्याच्या स्वागतासाठी जवळच एक सुंदर कमान रोवली होती. बरोबर 7:30 वाजता 'नारिंगी कस्तुर' आमच्या स्वागतासाठी हजर झाला. त्याच्या फिकट केशरी वर्णाला निळसर रंगाची झूल व डोळ्याभोवतीच्या काळ्या पांढऱ्या पट्ट्यांमुळे त्याचे व्यक्तिमत्त्व उठून दिसत होते. त्याच्या या लोभस सौंदर्याची मोहिनी उपस्थितांवर झाली नाही तर ते नवलच. ऐटदार चालीने तळ्याच्या काठी फेरफटका मारत असताना अचानक त्याच्या सखीने हजेरी लावली. 'सोने पे सुहागा' असा तो क्षण होता. थोड्याच वेळात प्रमुख पाहुणे दाखल होतील असे सांगून ते दोघे नजरेआड झाले.
आणि तो क्षण येऊन ठेपला. ज्याच्या भेटीसाठी इतक्या दूरवर आलो होतो, त्याचे आगमन झाले. आमच्याकडे एक प्रेमळ दृष्टीविक्षेप टाकत त्याने आसन ग्रहण केले. त्याची एवढीशी छबी बघून आम्ही पुरते घायाळ झालो. याचसाठी केला होता अट्टाहास... असा तो क्षण होता. त्याचे ते राजबिंडे रुपडे पाहून सर्वांनी तोंडात बोटे घातली. एखाद्या राजाला शोभेल असा त्याचा रुबाब होता. या खास पाहुण्याचे नाव जाणून घेण्याची आपली उत्सुकता शिगेला पोहोचली असणार! 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' असा हे 'तिबोटी खंड्या'. इंग्रजीत सांगायचे तर 'Oriental Dwarf King Fisher'. याला तीनच बोटे असतात म्हणून त्याचे नाव तिबोटी खंड्या. आपल्याकडच्या 'खंड्या', 'बंड्या', 'कवड्या धीवर' यांचा हा भाऊबंद. त्यांच्या सारखीच लांबलचक चोच, परंतु तिचा गडद केशरयुक्त गुलाबी रंग सर्वांपेक्षा निराळा व मोहक. त्याच्या पोटाचा पिवळाधमक वर्ण पाठीवरच्या गडद निळ्या व गुलाबी रंगांच्या पिसांत अतिशय लोभस दिसत होता. निळा, पिवळा, गुलाबी, सगळे Vibrant colours. गुलाबी मस्तक, पिवळ्या गळ्यावर पांढऱ्या शुभ्र पिसांचा झुबका व काळ्या रंगाचा डोळा. अजब रसायन. जणू परमेश्वराने निवांत क्षणी मनापासून बनवलेली एक सुंदर कलाकृती. त्याचे गुलाबीचटक पाय व आखूड गुलाबी शेपूट, सारखी वर खाली हलताना बघून खूप गंमत वाटली. पक्षीप्रेमी कौतुकाने त्याला color bomb म्हणतात, ते उगीच नाही. खांदे वर उडवून संवाद साधण्याची त्याची लकब विलोभनीय होती. जवळ जवळ अर्धा तास आमच्याशी त्याचा वार्तालाप चालला होता. त्याच्या मोहक हालचालीतून नाना कळा दृष्टीस पडल्या. तेवढ्यात 'शिळकरी कस्तुर' वेळ संपली असा इशारा देऊन गेला. मी 'पुन्हा येईन' असे एखाद्या मंत्र्यासारखे आश्वासन देऊन 'तिबोटी खंड्या'ने रजा घेतली.
तेवढ्यात रामदास नाश्ता तयार आहे सांगायला आला. आपल्याला खूप काहीतरी गवसले अशा आनंदात सगळे उठत असतानाच पुन्हा खंड्याचे आगमन झाले. तेही आपल्या गृहमंत्र्यासमवेत. सखी सहचारिणी. या सुखद धक्क्यातून सावरायला आम्हाला थोडा वेळ लागला. पटकन कॅमेरा चालू करून त्यांची दोघांची एकत्रित छबी टिपण्याचा प्रयत्न केला. खंड्याने थोडक्यात आपल्या पश्चिम घाटात येण्याचे प्रयोजन सांगितले. एक चांगली जागा बघून थोड्याच दिवसात आपल्या पिलांसाठी घर बांधण्याचा मानस व्यक्त केला. चार महिन्यांनी आपल्या पिलांसमवेत पुन्हा मूळ ठिकाणी जाणार असे ठासून सांगितले.
एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागले होते. गरम गरम नाश्ता बाहेर वाट बघत होता. छानशा वाफाळलेल्या पोह्यांवर ताव मारला. गरम चहाचे घोट पोटात रिचवले. थोड्याशा इकडच्या तिकडच्या, शिळोप्याच्या गप्पा झाल्या. बोलण्याच्या ओघात चार वाजेनंतर खंड्या पु:नश्च भेटीला येऊ शकतो असे अधिकृत सूत्रांकडून कळले. त्याची वाट बघणे क्रमप्राप्त होते, म्हणून पुन्हा जागेवर येऊन बसलो. बाहेर गोड गळ्याचा 'शमा' व जाड्या भरड्या आवाजाच्या 'कुर्टुक'ची जुगलबंदी रंगली होती. मधूनच मर्कटरावांचा हूप हूप आवाज येत होता.
अचानक किरमिजी रंगाच्या सूर्यपक्ष्याची छवि नजरेस पडली. त्याला पहिल्यांदाच पाहत होते. त्याने माझ्या पुढ्यात यावे यांसाठी त्याला कळकळीने विनंती करत होते. परंतु आपल्या रूपाचा गर्व असलेला हा 'सह्याद्री शिंजीर' पानांआडून शीळ घालत जरा दूरच उभा राहिला. खाली मातीत 'ठिपकेवाला होल्या'ची जोडी खाद्य टिपताना दिसली. नंतर दोघे तळ्यावर येऊन पाणी पिऊन गेले.
बराच वेळ शांततेत गेला. अचानक च्याॅव च्याॅव करत 'रानभाईं' चा घोळका आला. ते ही संख्येने सात होते. जणू सातभाईच. प्रचंड गलका चालला होता. कोणी पाणी पिण्यात मग्न, तर कोणी पिसे साफ करण्यात, तर कोणी छोट्याशा उंचवट्यावर तोऱ्यात उभे होते. तशात 'ठिपकेवाला पहाडी सातभाई' जोडीने हजर झाला. मनमुराद पाण्यात डुबक्या मारून उन्हाने होणारी काहिली त्यांनी शमवली. नंतर सगळे आले तशा वाटेने निघून गेले. बराच वेळ झाला तरी कोणाची चाहूल लागत नव्हती. रामदास कधी जेवायला बोलावेल याची वाट बघत होतो. साधारण दीड वाजता गरम गरम जेवणावर ताव मारला. सुकी बटाट्याची भाजी, मटारची उसळ, मऊसूत पोळ्या, गरम गरम भात व त्यावर रुचकर फोडणीचे वरण असा झक्कास बेत होता. जेवत असताना जवळच्या झाडांवर महाराष्ट्राचा राज्य प्राणी 'शेकरू'ची हालचाल दिसली. अर्थातच कॅमेऱ्याच्या ऐवजी हातात घास असल्यामुळे त्याची छबी टिपता आली नाही.
ताजेतवाने होऊन आम्ही पुन्हा तपश्चर्येला 'लपणा'त बसलो. हो ही पण एक प्रकारची तपश्चर्याच. पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकरी जसा पायी वारी करून पंढरपूरला पोहोचतो, तसेच आम्ही पक्षी वेडे, पक्ष्यांच्या भेटीसाठी रानवाटा तुडवतो. त्यांच्या दर्शनासाठी आसुसलेले असतो. एकदाचं दर्शन झाले की मन प्रसन्न होते. परमेश्वर भेटल्याची अनुभूती मिळते. पक्षी बघण्यासाठी 'लपणा'त बसणे ही पण एक तपश्चर्याच. जास्त हालचाल करायची नाही. जराही कुजबूज करायची नाही. त्यामुळे पक्षी येत नाही अशी रामदासची कडक सूचना असते. (पक्ष्यांचे फोटो काढताना हातही झाकलेले असावेत हा नवीन पाठ मला मिळाला.) एका जागी तासनतास बसून पक्ष्यांची वाट बघणं म्हणजे तसं संयमाचं काम. बरं ते येतीलच अशी खात्रीही नसते. नशीबाचा भाग म्हणून ती गोष्ट स्वीकारली जाते. तरीही वारंवार इथे येणाऱ्या पक्षीवेड्यांची संख्या कमी नाही.
3 वाजेच्या सुमारास 'अहो' म्हणू लागले, "आपल्याला पाहिजे त्या पक्ष्यांचे दर्शन झाले. आता आपण पुण्याकडे परत जायला हरकत नाही." परंतु या भेटीचा संध्याकाळचा समारोप म्हणजे नयनरम्य सोहळा असतो. सगळ्या पक्ष्यांचे जणू संमेलनच. तो पाहिल्यावरच निघायचे असे मी ठामपणे सांगितले.
चार वाजले तरी पक्षी येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. भिरभिरणारे लाल , निळे चतुर, Blue Mormon (महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू) व काळे-पिवळे भुंगे लक्ष वेधून घेत होते. साडेचारच्या सुमारास 'लालगाल्या बुलबुल'ची जोडी आमची विचारपूस करायला आली. आमच्या सख्ख्या शेजारींचे भाऊबंदच ते. त्यांच्या पाठोपाठ लालबुड्या बुलबुलची जोडीही आली. नेहमीचेच, ओळखीचे असले म्हणून काय झाले, पण त्यांचे फोटो काढायला आळस केला नाही.
साधारण 5 वाजता सातभाई पुन्हा पाण्यावर आले. भरपूर दंगा केला. त्यांच्या पाठोपाठ 'शिळकरी कस्तुर' निवांत येऊन बसला. यथावकाश जलाशयात स्नान करून, कमानीवर एकटाच पिसे झटकत बसला. तेव्हा त्यांच्या पिसांची हालचाल एखाद्या पंख्यासारखी सुंदर, मोहक दिसत होती. तसं बघायला गेलं तर हा निळा कावळाच जणू. परंतु त्याच्या चमकदार निळ्या रंगाची भुरळ मनाला पडते. त्याची सुमधुर शीळ ऐकली की मन प्रसन्न होते. त्याचा जोडीदारही आसपास शीळ घालत फिरत होता. त्यांच्या दर्शनाने मन तृप्त झाले. बराच वेळ तो एकाच जागेवर बसून होता. आता त्याचे फोटो काढूनही कंटाळा आला होता. तेव्हा अचानक आपला स्मार्ट 'तिबोटी खंड्या' त्याच्या शेजारी विराजमान झाला. मग काय पटापट सगळ्यांचे कॅमेरे त्याची छवि टिपण्यासाठी सरसावले. घरट्यासाठी जागा शोधत वणवण भटकणारा तो जीव निमूटपणे आमच्या पुढ्यात येऊन बसला. जणू काही त्याच्या आजच्या कामाचा आढावा द्यायला तो उत्सुक होता. उन्हाने गांगरलेल्या खंड्याने विलक्षण चपळाईने पाण्यात सूर मारला. डोळ्याचे पाते लवते न लावते तोच तो कमानीवर पाठमोरा होऊन बसला. इवल्याश्या शेपटीला हलकासा झटका देत, मला फोटो काढण्याची संधी न देता आमच्याकडे पूर्ववत तोंड वळवून बसला. पाण्यात सूर मारणे व परत मूळ जागेवर जाऊन बसणे असा छान खेळ रंगला. गोड गळ्याचा 'शमा' का येत नाही असा मनात विचार आला, तोच तो पुढ्यातल्या कमानीवर येऊन बसला. हो तोच होता. काळाशार वर्ण, गडद केशरी छाती, काळ्याशार लांबलचक शेपटीवर आतून पांढऱ्या शुभ्र पिसांचे आखूड अस्तर. अशी ती छबी. शेपटी खाली सोडून आमच्याकडे तोंड करून बसली. अहाहा! काय वर्णू मी त्याचा रुबाब! क्षणिक काळासाठीची ती पोज कॅमेऱ्यात कैद करण्यात मी अपयशी ठरले. त्यानेही मनसोक्त जलक्रीडा केली. पाण्यात डुबकी मारत असताना उडालेले तुषार म्हणजे हवेत उडवलेल्या स्फटिकांची माळच जणू. एकाच वेळी 'शिळकरी कस्तुर', 'तिबोटी खंड्या' व 'शमा' यांना एकत्रित बघण्याचा योग म्हणजे मणि-कांचन योगच. सकाळी ओझरते दर्शन देऊन गेलेली जांभळी लिटकुरी (नीलमणी) अजून कशी येत नाही असे मनात म्हणते तोवर ती बया पुढ्यात येऊन बसलेली दिसली. आज मी जे मागत होती ते मला मिळत होते की काय? मनात इच्छा होती म्हणूनच 'नारिंगी कस्तुर'ची जोडी पुन्हा जलविहारासाठी आली. लगोलग 'ठिपके वाल्या पहाडी सातभाई'ची जोडी पण "हम भी कुछ कम नही" अशा अविर्भावात पाण्यात आत बाहेर करत होती. तशातच सकाळपासून ज्याने तोंड दाखवलं नाही तो 'तपकिरी गालाचा फुलवेटा' चक्क जोडीने हजर झाला. जोडीने येणाऱ्या या पक्ष्यांचे भारी नवल वाटले. जणू काय या प्रिय पाहुण्याच्या भेटीला सहपरिवार ही पक्ष्यांची मांदियाळी जमली होती. मात्र नेहमीचा 'पिवळा बुलबुल' व 'लाल चकोत्री' जरा सुद्धा फिरकले नाही, म्हणून थोडे आश्चर्य वाटले. एव्हाना पावणे सात झाले होते. मंदावलेल्या सूर्यप्रकाशात फोटो क्लिक करायला कॅमेराही नाराज होता, म्हणून पक्ष्यांची रजा घेणे शहाणपणाचे वाटले. 'तिबोटी खंड्या'ला त्याच्या नियोजित कामासाठी शुभेच्छा देत व त्याची बाळं पाहण्यासाठी पुन्हा येऊ असे आश्वासन देत जड अंतःकरणाने निरोप घेतला. आपल्या सामानाची आवराआवर करून संध्याकाळी 7:15 वाजता 'ग्रेट भेट' झाली या आनंदात व पुढच्या शनिवारी 'नवरंग'ची भेट घेण्यासाठी कर्नाळा गाठावे का अशा विचारात पुण्याकडे प्रयाण केले.
वंदना लोखंडे
05/06/2024
Orange headed thrush - नारिंगी कस्तूर
Oriental dwarf king fisher (ODKF) - तिबोटी खंड्या
Spotted Dove - ठिपकेवाला होला
Malabar Whistling thrush - शिळकरी कस्तुर
Black Naped Monarch female जांभळी लिटकुरी (नीलमणी)
Puff throated babbler - ठिपकेवाला पहाडी सातभाई
Red whiskered bulbul - लालगाल्या बुलबुल
Vigor's sunbird - किरमिजी रंगाचा सूर्यपक्षी (सह्याद्री सूर्यपक्षी)
White cheeked barbet - कुर्टुक (कुकडूक्या)
White rumped Shama - शमा
Jungle babbler- रानभाई
Red vented bulbul - लालबुड्या बुलबुल
Brown cheeked Fulveta - तपकिरी गालाचा फुलवेटा
Red spurfoul - लाल चकोत्री, छोटी रानकोंबडी
Indian Giant squirrel - शेकरू
Hide - लपण (पक्षी निरीक्षणासाठी लपून बसण्याची जागा)
खूप सुंदर लेख आणि पक्षीगण❤❤
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद 😊
हटवाSo cute & beautiful birds 🤩😱
उत्तर द्याहटवाNice article
Sundar Likhan👌👍
Thank you so much 😊
हटवाकाकू, खूप छान..!!👌👌
उत्तर द्याहटवादिप्ती धन्यवाद गं 🥰
उत्तर द्याहटवाखुप सुंदर लेख लिखाण, bird फोटोज सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर आहे.. लेख पण, पक्षी पण आणि photos पण 😍
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद 🥰
हटवाKhup abhyas purna mahiti aani lekh vandana .keep it up !!
उत्तर द्याहटवाधन्यवाद संदीप 😊
हटवाउत्तम, विस्तृत लेख, सुरेख फोटो
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवा